उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांनी त्वचेचं नूकसान होतंच. तुम्ही घरी असा किंवा बाहेर उन्हाळ्याचा जाच त्वचेला होतोच. प्रखर ऊन, घाम आणि वातावरणातलं प्रदूषण यामुळे त्वचेचं नुकसान होवू नये म्हणून आपण खूप जपतो त्वचेला. पण ओठांची मात्र विशेष काळजी घेत नाही. पण उन्हाळ्यात ओठांनाही असते विशेष काळजीची गरज. ती जाणीवपूर्वक घ्यायला हवी. ओठांची त्वचा अगदीच पातळ असल्यानं उन्हाळ्यात ओठांना संरक्षणाची गरज असते. आणि नेमकं तेच न मिळाल्यानं ओठ काळे, कोरडे पडतात.
आपल्या त्वचेत मेलानिन हे रंगद्रव्य असतं. हे रंगद्रव्य सूर्याचा प्रकाश शोषून घेतात आणि अतीनील किरणंही. त्यामुळे त्वचेचं संरक्षण होतं. पण ओठांमधे मेलानिन हा घटक अगदीच कमी असतो. आणि म्हणूनच उन्हाळ्यात ओठांचा गुलाबी रंग, मऊपणा जपण्याची सर्वात जास्त गरज असते.
ओठांची काळजी का आणि कशी घ्यायची?
-ओठांची त्वचा अगदीच पातळ असते. त्यामुळे सूर्यापासून संरक्षणाची ओठांना सर्वात जास्त गरज असते. ओठांची काळजी घेणं म्हणजे ओठांना लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस लावणं नव्हे. ओठांची काळजी घेण्यासाठी किमान ३० एसपीएफ असलेलं लिप बामच आवश्यक असतो. आपल्या त्वचेत सीबम नावाचं नैसर्गिक तेल स्त्रवत असतं. ज्यामूळे आपली त्वचा ही ओलसर राहाते. पण सीबम हे ओठाच्या त्वचेत स्त्रवत नाही. आणि म्हणूनच ठराविक कालावधीनंतर ओठांना ओलाव्याची आणि आर्द्रतेची गरज असते. आणि म्हणूनच सूर्यापासून संरक्षण करणाऱ्या लिपबामची मधून मधून गरज असते.
- ओठ ओलसर ठेवण्यासाठी अनेकजण सतत ओठ जीभेनं ओले करत राहातात. पण ओठांवरची ही लाळ सुकल्यानंतर ओठ पांढरे आणि नंतर काळे पडतात. त्यामुळे ओठ अशा पध्दतीनं ओले करण्यापेक्षा दर दोन तासांनी न चुकता ओठांना लिप बाम लावावा.
- दिवसभर ओठांवर लिपस्टिक असली तरी रात्री झोपतांन ती पूर्ण काढून टाकणं गरजेचं असतं. रात्री ओठांना मॉश्चरायझरची गरज असते. ती गरज लीप बाम मधून पूर्ण होते. रोज रात्री झोपताना लीप बाम लावावा.
- ३० एसपीएफचा लिपबाम हा केवळ आपल्या ओठांचं सूर्याच्या अती नील किरणांपासून संरक्षण करतं असं नाही तर ओठ ओलसर ठेवण्यासही मदत करतं. लिपबामचा वापर ही ओठांची मुख्य गरज आहे . ती वेळीच ओळखून ओठ सुरक्षित ठेवले तर ते सुंदर राहातील.