Join us  

Summer Skin Care Tips : उन्हात गाडी चालवल्याने हात काळे पडलेत? टॅनिंग घालवण्याचे ३ स्वस्त आणि नॅचरल उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2022 11:03 AM

Summer Skin Care Tips :महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय केले तर ते आरोग्यासाठी कधीही जास्त चांगले

ठळक मुद्देपपईमुळे त्वचा डीप क्लिन तर होतेच पण त्वचा ग्लो करण्यासाठीही पपईचा उपयोग होतो.  घरच्या घरी सोप्या उपायांनी हाताचे टॅनिंग निघू शकते, त्यामुळे महागड्या उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय केव्हाही चांगले

एकीकडे उन्हामुळे घामाच्या धारा लागल्यात तर दुसरीकडे ऊन इतकं जास्त आहे की या उन्हाचा चटका बसून त्वचा काळी पडते. असे असले तरी आपल्याला रोजची कामं करावीच लागतात. यातही आपण चालत किंवा दुचाकीवर बाहेर जात असलो तर उन्हाचा चटका बसल्याने आपली त्वचा काळी पडते म्हणजेच टॅन होते. ही सूर्यकिरणे इतकी प्रखर असतात की त्याचा थेट त्वचेवर परिणाम होतो (Summer Skin Care Tips). चेहऱ्याचे सौंदर्य सर्वात जास्त महत्त्वाचे असल्याने तो झाकण्यासाठी आपण स्कार्फ बांधणे, टोपी घालणे, गॉगल घालणे हे सगळे आवर्जून करतो. पण हातांची काळजी आपण घेतोच असे नाही.  मात्र उन्हामुळे हात इतके टॅन होतात की शरीराचा तेवढाच भाग अचानक काळा दिसायला लागतो. हातावरचे हे टॅनिंग काढण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय पाहूया...

(Image : Google)

१. दही, लिंबू आणि तांदूळ पॅक

१ मोठा चमचा दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा तांदळाचे पीठ हे एकत्र करुन चांगले मिश्रण तयार करायचे. हा लेप हात ज्याठिकाणी टॅन झाले आहेत तिथे लावायचा. ५ ते १० मिनीटांनी हा लेप घासून हातावरुन काढायचा. त्यानंतर हात पाण्याने स्वच्छ धुवायचे. हा प्रयोग नियमित केल्यास हातांचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल. दह्यामुळे ब्लिचिंग होते तर तांदळात त्वचा एक्सफॉलिएट करणारे गुणधर्म असतात. हे दोन्ही एकत्रित केल्याने त्वचेवरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते. 

२. कॉफी स्क्रब

एका बाऊलमध्ये १ चमचा कॉफी, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा दूध एकत्र करा. आता या मिश्रणाने हात ५ मिनीटे चांगले चोळा. त्यानंतर हात गार पाण्याने धुवून टाका. कॉफीमध्ये अॅंटीएजिंग गुणधर्म असल्याने टॅनिंग जाण्याबरोबरच त्वचा दिर्घकाळ चांगली राहण्यास याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास हातावरचे टॅनिंग कमी होण्यास मदत होते. 

(Image : Google)

३.पपई स्क्रब 

पपईचा गर आणि पपईच्या बिया एकत्र करुन या मिश्रणाने हात घासा. त्यामुळे त्वचेवरील काळेपणा दूर होण्यास अतिशय चांगला उपयोग होईल. बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांपेक्षा घरच्या घरी स्वस्तात करता येतील असे हे उपाय आपण सहज करु शकतो. पपईमुळे त्वचा डीप क्लिन तर होतेच पण त्वचा ग्लो करण्यासाठीही पपईचा उपयोग होतो.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीसमर स्पेशल