Join us  

Summer Skin Problem : उन्हाळ्यात ड्राय स्किनचा त्रास, 5 सवयी बदला, त्वचा होईल मऊ-मुलायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 2:00 PM

Summer Skin Problem : उन्हाळ्यात त्वचा हिवाळ्यापेक्षाही कोरडी आणि रखरखीत होण्यास आपल्याच चुका कारणीभूत; मऊ मुलायम त्वचेसाठी 5 सवयी बदला

ठळक मुद्दे हार्श क्लीन्जरनं त्वचा कोरडी होते. उन्हाळ्यात माॅश्चरायझर त्वचेसाठी अमृत आहे. ऋतुप्रमाणे मेकअपची पध्दतही बदलायला हवी. 

Summer Skin Problem: ऋतूप्रमाणे खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. त्या बदलाव्याच लागतात नाहीतर मग आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. तसंच त्वचेबाबतही आहे. सर्व ऋतूत त्वचेसाठीचं एकच एक रुटीन ठेवलं तर त्याचं नुकसान त्वचेलाच होतं. ऋतुप्रमाणे त्वचेच्या गरजा बदलतात. बदललेल्या गरजेनुसार त्वचेच्या देखभालीचे नियमही बदलतात. पण याकडे दुर्लक्ष करुन त्वचेचं एकच एक रुटीन सदासर्वकाळ ठेवल्यास त्वचा निरोगी राहात नाही.

Image: Google

हिवाळ्यात त्वचेची गरज वेगळी असते. उन्हाळ्यातली त्वचेची गरज न ओळखून उन्हाळ्यातही हिवाळ्यातलं स्किन केअर रुटीन ठेवल्यास त्वचा खराब होते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी, रखरखीत पडल्यास त्याला ऋतू कारणीभूत नसून आपल्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरल्याचं समजावं. 

उन्हाळ्यात त्वचा कोरडी खरबरीत का होते?

Image: Google

1. त्वचा स्वच्छ होण्यासाठी क्लीन्जरचा वापर केला जातो. पण ऋतूप्रमाणे क्लीन्जरही बदलायला हवं. उन्हाळ्यात जर जास्त रसायनयुक्त असं हार्श क्लीन्जर वापरलं तर त्वचेवरील संरक्षक पापुद्र्याचं नुकसान होतं. हार्श क्लीन्जर वापरल्याने त्वचा कोरडी होते, त्वचेला खाज येते आणि त्वचा फाटतेदेखील. उन्हाळ्यात त्व्चा स्वच्छ करण्यासाठी सौम्य क्लीन्जरचा वापर करावा.

Image: Google

2.  उन्हाळ्यातही हिवाळ्याप्रमाणे एकदम गरम पाण्यानं आंघोळ केल्यास त्वचेचं नुकसान होतं. तसंही उन्हाळ्यात टाकीतलं पाणी गरम असतं. हे पाणी गिझर किंवा हिटरद्वारे आणखी गरम करुन वापरल्यास त्वचा कोरडी पडते. त्वचेवर फोड येतात. ब्लॅकहेडसची समस्या निर्माण होते. 

3. नितळ आणि निरोगी त्वचेसाठी एक्सफोलिएशन गरजेचं असतं. पण एक्सफोलिएशन रोज केल्यास  त्वचेला फायदा होण्याच्या जागी त्वचेचं नुकसान होतं. रोज एक्सफोलिएशन केल्यानं त्वचा खरबरीत होते. उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा वा दोनदाच एक्सफोलिएशन करावं. 

Image: Google

4. उन्हाळा आहे, अंगाला सारखा घाम येतो या कारणानं त्वचा माॅश्चराइज करण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण उन्हाळ्यात त्वचेला माॅश्चराइज न करणं म्हणजे त्वचेवर अन्याय करण्यासारखं आहे. उन्हाळ्यात पाण्यानं सारखा चेहरा धुतला जातो. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला माॅश्चराइज करणं आवश्यक आहे. यामुळे त्वचेला ओलसरपणा मिळतो. चेहऱ्याच्या त्वचेला माॅस्चरयझर आणि अंगाला बाॅडी लोशन लावणं आवश्यक आहे.  माॅश्चरायझर आणि बाॅडी लोशन न वापरल्यास त्वचा कोरडी होते, त्वचेचे पापुद्रे निघतात. आंधोळ केल्यानंतर, चेहरा धुतल्यानंतर त्वचा ओलसर असते तेव्हाच माॅश्चरायझर आणि बाॅडी लोशन लावल्यास त्वचेस त्याचा फायदा होतो.

Image: Google

5. ऋतुप्रमाणे मेकअपची पध्दतही बदलायला हवी.  मॅट मेकअप केल्यास चेहरा इतर मेकअपच्या तुलनेत चांगला दिसतो हे खरं. पण उन्हाळ्यातही मॅट मेकअप केल्यास त्वचा कोरडी होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर मेकअपचे जास्त थर दिल्यास त्वचा कोरडी होते. त्यामुळे उन्हाळ्यात ड्राय मॅट मेकअप ऐवजी लिव्किड ब्लश , लिक्विड हायलायटर यांचा वापर करावा. 

टॅग्स :त्वचेची काळजीसमर स्पेशलब्यूटी टिप्स