Join us  

Summer Specail : उन्हाळ्यात करा मधाचं फेशियल, चेहरा नितळ आणि त्वचेचंही पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 6:22 PM

उन्हाळ्यात त्वचेला द्या मधाचं पोषण; टॅनिंग घालवण्यासाठी करा समर स्पेशल हनी फेशिअल

ठळक मुद्देमधाच्या फेशियलमुळे त्वचा ओलसर होते. केवळ 20 मिनिटत चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला आणता येतो. त्वचेला आवश्यक असलेली पोषण मुल्यं मधाच्या फेशियलद्वारे मिळतात. 

उन्हाळ्यात ऊन आणि प्रदूषण यामुळे त्वचा खराब होते. चेहरा उन्हाळ्यात तेलकट होतो, काळवंडतो. त्वचा चांगली राहावी म्हणून अनेक ब्यूटी प्रोडक्टसचा वापर केला जातो पण पाहिजे तसा परिणाम भेटतच नाही. उन्हाळ्यात त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसण्यासाठी त्वचेची खोलवर स्वच्छता  आर्द्रता आणि पोषणाची गरज असते.  यासाठी नैसर्गिक सौंदर्योपचारांची गरज असते.

Image: Google

नैसर्गिक सौंदर्योपचारात मधाला महत्वाचं स्थान आहे. त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य टिकवण्याची क्षमता मधामध्ये असते. उन्हाळ्यात खास मधाचं फेशिअल केल्यास चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या, डाग, सुरकुत्या या समस्या दूर होतात.  मधाच्या फेशियलमुळे केवळ 20 मिनिटात चेहऱ्यावर तजेला येतो. घरच्याघरी समर स्पेशल हनी फेशियल करणं सोपं आहे. 

Image: Google

हनी क्लीन्जर

मधाचा वापर करुन चेहरा स्वच्छ करण्यासाठी 1 छोटा चमचा मध घ्यावं. त्यात 2 चमचे गुलाब पाणी मिसळावं. ते चांगलं एकजीव करावं. कापसाच्या बोळ्यानं हे मिश्रण चेहऱ्याला लावून चेहरा स्वच्छ करावा. 

Image: Google

हनी स्क्रब

हनी स्क्रब करण्यासाठी एका वाटीत 1 मोठा चमचा काॅफी पावडर आणि अर्धा चमचा मध घ्यावं, ते चांगलं मिसळावं. हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्याआधी चेहऱ्याला वाफ घ्यावी. वाफ घेतल्यानंतर काॅफी आणि मधाचं मिश्रण चेहऱ्याला गोलाकार मसाज करत लावावं. काॅफीमधील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात. 7-8 मिनिटं चेहऱ्याला हलका मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

हनी ग्लो मसाज

मधाने चेहरा उजळण्यासाठी एका वाटीत थोडी पपई कुस्करुन घ्यावी. त्यात छोटा चमचा मध घालावं. हे मिश्रण एकजीव करुन या मिश्रणानं 4-5 मिनिटं चेहऱ्याचा मसाज करावा. मसाज करताना खालून वर असा करावा. या मसाजमुळे त्वचा घट्ट होते. मसाज झाल्यावर चेहरा थंड पाण्यानं धुवावा.

हनी फेस पॅक

सर्वात शेवटी चेहऱ्यावर मधाचा फेस पॅक लावण्यासाठी एका वाटीत 2 चमचे बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ घ्यावं. त्यात 1 चमचा मध, थोडा लिंबाचा रस आणि 1 चमचा कच्चं दूध घालावं. हे सर्व चागलं मिसळून एकजीव करावं. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावं. हा लेप पूर्ण सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा.मधात असलेल्या नैसर्गिक आर्द्र गुणधर्मांमुळे त्वचेला ओलसरपणा मिळतो. त्वचेचं पोषण होतं.

Image: Google

मधाचं फेशियल केल्यानं त्वचा खोलवर स्वच्छ होते. चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते.उन्हामुळे आलेला काळवंडलेपणा निघून जातो. मधात असलेल्या दाह आणि सूजविरोधी गुणधर्मामुळे त्वचेचा दाह कमी होतो, त्वचेच्या पेशींचं झालेलं नुकसान भरुन निघतं. पेशी दुरुस्त करण्याचं काम मध करतं त्यामुळे मधाचं फेशियल केल्यानं चेहरा होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजी