उन्हाळा म्हटला की घाम, चिकचिक आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या इतर समस्या हे ओघाने आलेच. शरीराला पुरेशी हवा न लागल्याने, सतत येणाऱ्या घामामुळे किंवा त्वचेला थेट उन्हाचा तडाखा लागल्याने या काळात त्वचेच्या समस्या उद्भवतात (Summer Special). मग कधी खाज येणे, पुरळ येणे, त्वचेची आग होणे, त्वचेवर काळे, पांढरे, लाल डाग येणे अशा समस्या उद्भवतात. या गोष्टींमुळे आपण हैराण होऊन जातो. एकदा अंगाला खाज यायला लागली किंवा आग व्हायला लागली की आपल्याला अस्वस्थ व्हायला होते. ऑफीसमध्ये किंवा बाहेर असलो तर अशावेळी काय करायचे तेही कळत नाही. पण उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या आणि मुख्यत: घामोळे यांमुळे तुम्हीही वैतागले असाल तर त्यासाठी घरच्या घरी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया...
१. कपड्यांची निवड
उन्हाळ्याच्या दिवसांत कपडे घालताना शक्यतो सुती कपड्यांना प्राधान्य द्यावे. सिल्क, टेरीकॉट, जाड कापडाचे कपडे या काळात टाळावेत. कारण आधीच उन्हाने आपल्या अंगाची लाहीलाही होत असताना जाड करडे घातले तर त्वचेला हवा मिळत नाही. सुती कपड्यांमध्ये घाम शोषला जातो. इतर कापडांमध्ये घाम शोषला जात नसल्याने त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते.
२. घाम टिपावा किंवा पाण्याने स्वच्छ करावा
उन्हाळ्यात येणारा घाम हा अंगावर तसाच राहीला तर तो त्वचेत मुरतो आणि त्यामुळे याठिकाणी खाज येणे, पुरळ येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सतत घाम येणाऱ्या व्यक्तींनी घाम टिपणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. याशिवाय शक्य तितक्या वेळा पाण्याने तोंड धुणे, दिवसातून दोन ते तीन वेळा आंघोळ करणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. घाम टिपण्यासाठी रुमालाबरोबरच वेट टिश्यू किंवा वेट वाईप्सचाही चांगला उपयोग होऊ शकतो.
३. पावडरचा वापर
थंडीच्या दिवसांत आपण ज्याप्रमाणे त्वचेला कोरड पडू नये म्हणून कोल्ड क्रिम किंवा मॉईश्चरायझर वापरतो त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी राहावी यासाठी पावडरचा वापर करायला हवा. काखेत, जांघेत, मानेला असा ज्याठिकाणी जास्त प्रमाणात घाम येतो त्याठिकाणी अँटीसेप्टीक पावडर आवर्जून लावायला हवी. त्यामुळे त्वचा कोरडी राहण्यास मदत होते आणि आपण जास्तीत जास्त फ्रेश राहतो.
४. थंडावा देणारे उपाय
उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचेची आग होऊन अनेकदा पुरळं येतात आणि खाजही सुटते. अशावेळी त्याठिकाणी बर्फ चोळणे, मुलतानी मातीचा लेप लावणे, कोरफडीच्या गराचा लेप लावणे, काकडीच्या फोडी याठिकाणी ठेवणे असे उपाय करायला हवेत. मुलतानी माती, कोरफड, काकडी हे मूळात गार पदार्थ असल्याने त्वचेचा दाह कमी होण्यास याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्हाला पुरळ, घामोळे, खाज यांसारख्या समस्या भेडसावत असतील तर यातुम्ही या गोष्टी नक्की वापरू शकता. कडूलिंबाचा पालाही त्वचेच्या समस्यांसाठी अतिशय फायदेशीर असतो.
५. क्रीम
या सगळ्या गोष्टी करुनही तुमची घामोळ्यांची समस्या कमी होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादे क्रिम घामोळ्यांवर लावणे केव्हाही चांगले. मात्र यासाठी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे आवश्यक आहे.