Join us  

समर स्पेशल कोल्ड फेशियल: गारेगार फेशियलने चेहऱ्याला द्या सुंदर गारवा, पाहा कूल इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 6:09 PM

उन्हाळ्यात प्रकृतीनं थंडं असणाऱ्या नैसर्गिक घटकांचा वापर करुन कोल्ड फेशियल करणं महत्वाचं आहे.  घरच्याघरी कोल्ड फेशियल करुन चेहऱ्यास आवश्यक असणारा हेल्दी गारवा देता येतो. 

ठळक मुद्देकोल्ड फेशियल केल्यानं त्वचेस थंडावा मिळतो. कोल्ड फेशियलनं उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्यांना आळा बसतो. कोल्ड फेशियल केल्यास उन्हाळ्यात त्वचेची वेगळी काळजी घेण्याची गरज नसते. 

ऋतू बदलतो तशा शरीराच्या गरजा बदलतात. शरीराप्रमाणे त्वचेच्या गरजा देखील बदलतात. उन्हाळ्यात घाम, गरम वातावरण, प्रदूषण यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. या काळात त्वचेला थंडाव्याच्या गरज असते. त्वचेला आवश्यक तो थंडावा देऊन, त्याद्वारे त्वचेचं पोषण करुन त्वचेला आराम देता येतो. उन्हाळ्यात त्वचेच्या संरक्षणासाठी आणि सौंदर्यवृध्दीसाठी कोल्ड फेशियल करण्याचा सल्ला दिला जातो. कोल्ड फेशियल म्हणून अनेकजण त्वचेवर केवळ बर्फ घासतात. चेहऱ्यावर बर्फ घासल्यानं थंडावा मिळतो. पण उन्हाळ्यात  त्वचेस आवश्यक कूल इफेक्ट हा फक्त बर्फाने मिळत नाही. त्यासाठी प्रकृतीनं थंडं असणाऱ्या नैसर्गिक घटकांचा वापर करावा लागतो. यासाठी कोल्ड फेशियल करणं महत्वाचं आहे. कोल्ड फेशियल करण्यासाठी  आवश्यक सर्व साधनसामग्री घरातच उपलब्ध होते. सेलिब्रेटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर एक्सपर्ट रिया वशिष्ट घरच्याघरी समर स्पेशल कोल्ड फेशियल करण्याची सोपी पध्दत सांगतात.

Image: Google

कोल्ड फेशियल केल्यानं त्वचेला थंडावा मिळतो. त्वचा ताजी तवानी होते. उन्हाळ्यात अति घाम येणं, अनइव्हन स्किन टोन, काळपटपणा या समस्यांना कोल्ड फेशियल केल्यानं प्रतिबंध होतो. 21 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा कोल्ड फेशियल केल्यास उन्हाळ्याची काळजी म्हणून त्वचेसाठी वेगळं काही करण्याची गरज नसते.

कसं करावं कोल्ड फेशियल?

1. कोल्ड फेशियल करण्यासाठी आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. फेशियलच्या इतर स्टेप्समधून चेहरा स्वच्छ होतो म्हणून अनेकजणी क्लीन्जिंगची स्टेप टाळून फेशियल करायला सुरुवात करतात. ही बाब चुकीची असल्याचं रिया वशिष्ट सांगतात. फेशियल् करण्याआधी सौम्य क्लीन्जरच्या सहाय्यानं चेहरा स्वच्छ धुवावा.

Image: Google

2. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेची खोलवर स्वच्छता करणं आवश्यक असतं. यासाठी घरच्याघरी स्क्रबर तयार करता येतं. यासाठी काॅफी बिन्स घ्याव्यात. त्या मिक्सरमधून ओबडधोबड वाटाव्यात. किंवा काॅफीची जाडसर पावडर घ्यावी. त्यात गुलाब पाणी घालावं. हे मिश्रण हलक्या हातानं मसाज करत चेहऱ्याला लावावं. काॅफीमुळे चेहऱ्यावरील डाग आणि काळपटपणा निघून जातो. तर गुलाब पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.  फक्त या स्क्रबरनं चेहरा खूप घासू नये असा सल्ला रिया वशिष्ट देतात. 

Image: Google

3. स्क्रबरनं त्वचेची खोलवर स्वच्छता झाल्यावर त्वचेला थंडावा आणि पोषण देणाऱ्या मसाजची गरज असते. यासाठी  काकडी किसून घ्यावी. त्यात पिकलेली पपई कुस्करुन काकडी पपईचं मिश्रण चेहऱ्यास लावावं. दहा मिनिटांनी हात ओले करुन चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करावा. काकडीमुळे त्वचेस थंडावा मिळतो तर त्वचेच्या पोषणासाठी पपई सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. काकडी पपईचा लेप लावून मसाज केल्यानं उन्हानं त्वचेचा दाह होत नाही. या लेपानं त्वचा ओलसर राहाते. त्वचा कोरडी होवून सुरकुत्यांचा धोका निर्माण होत नाही.  काकडी पपईचा लेप लावल्यानंतर किमान 20 मिनिटं हलक्या हातानं मसाज करत राहाणं आवश्यक आहे. 

Image: Google

4.  मसाज केल्यानंतर चेहऱ्याला लेप लावणं आवश्यक आहे. हा लेप तयार करण्यासाठी एक छोटा चमचा मुल्तानी माती, एक छोटा चमचा चंदन पावडर घ्यावी. यात थोडं गुलाब पाणी घालून ते मिसळून घेऊन हा लेप चेहऱ्यास लावून 10-15 मिनिटं ठेवावा आणि नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. तसेच काकडी, पुदिन्याची पानं एकत्र वाटून त्यात बेसनपीठ घालून तयार केलेला लेप चेहऱ्यास लावला तरी चालतो.  या दोन्ही लेपांनी त्वचेस थंडावा मिळतो आणि त्वचेस पोषक गुणधर्मही मिळतात. 

Image: Google

5. चेहऱ्यास लावलेला लेप धुतल्यानंतर चेहरा रुमालानं टिपून घ्यावा. चेहऱ्यावर गुलाब पाणी  स्पे करावं. 10-15 मिनिटांनी चेहऱ्यास कोरफड जेल लावावी. अर्ध्या तासानं चेहरा स्वच्छ धुवावा. किंवा कोरफड जेल लावून ती रात्रभर चेहऱ्यावर राहू दिली तरी चालते. कोरफडमुळे उन्हानं त्वचेला झालेल्या जखमा भरुन निघतात. त्वचेला थंडावा मिळतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी