Summer Special Face pack: उन्हानं आग होणाऱ्या, खाजणाऱ्या त्वचेसाठी उपाय हवा असतो. केवळ पंख्याखाली, कुलरसमोर किंवा एसीत बसून उपयोगाचं नाही. किंवा चेहऱ्याला बर्फ लावून मिळणारा फायदाही तात्कालिक असतो . त्वचेला आतून थंडाव्याची गरज असते. थंडाव्यासोबतच ऊन, घाम आणि गरम हवेनं निर्माण होणाऱ्या त्वचेच्या समस्यांवर उपाय करणंही गरजेचं असतं.
Image: Google
सौंदर्य तज्ज्ञ पूजा गोयल यासाठी काकडी, कोरफड , बटाटा, टरबूज आणि चंदन पावडर या नैसर्गिक घटकांचा वापर करुन चार प्रकारचे लेप तयार करण्याचा सल्ला देतात. या लेपांमुळे उन्हाळ्यात त्वचेला हवा असणारा गारवा मिळतो. त्वचेच्या समस्या दूर होतात.
काकडीचा लेप
काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. काकडीतल्या पाण्यानं त्वचेला थंडावा मिळतो. त्वचेवर तजेला आणि ताजेपणा दिसतो. काकडीचा लेप तयार करण्यासाठी काकडी किसून घेऊन त्याचा रस काढावा. काकडीच्या रसात 1 चमचा कोरफड गर मिसळून तो चांगला एकजीव करुन घ्यावा. हा लेप चेहरा आणि मानेस लावून 20-25 मिनिटं ठेवावा. नंतर चेहरा थंडं पाण्यानं धुवावा. या लेपानं चेहऱ्याच्या त्वचेस थंडावा मिळतो.
काकडीमध्ये अ, क जीवनसत्वं असतात तसेच त्यात असलेल्या ॲण्टिऑक्सिडस्ण्टसमुळे त्वचा मऊ आणि ताजी तवानी होते. या लेपात वापरल्या जाणाऱ्या कोरफडच्या गरात ॲण्टि एजिंग आणि माॅश्चरायझिंग घटक असतात. यामुळे त्वचेला थंडाव्या सोबतच ओलसरपणा मिळतो. त्वचेची माॅश्चरायझिंगची गरज पूर्ण होवून त्वचा ओलसर, मऊ आणि उजळ होते.
Image: Google
बटाट्याचा लेप
उन्हाळ्याच्या काळात त्वचेला बटाटा लावल्यानं फायदा होतो. बटाट्याचा वापर केल्यानं त्वचा चमकते आणि ताजी तवानी दिसते. बटाट्याचा लेप तयार करण्यासाठी बटाट्याची सालं काढून बटाटा किसून त्याचा रस काढावा. या रसात थोडं कच्चं दूध घालावं. दोन्ही चांगलं एकत्र करुन हा लेप चेहऱ्यास लावावा. 15 मिनिटं लेप चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. उन्हाळ्यात आठवड्यातून तीन वेळा हा लेप लावल्यास चेहऱ्यावरील डाग निघून जातात. या लेपातील कच्च्या दुधामुळे चेहऱ्याचं माॅश्चरायजिंगही होतं. त्वचेला गारवा मिळण्यासोबतच बटाट्याच्या लेपानं त्वचा उजळते.
Image: Google
चंदनाचा लेप
चंदनाचा प्रकृतीधर्म हा थंड असल्यानं उन्हानं चेहऱ्यावर येणारे मुरुम पुटकुळ्या, चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी चंदनाचा उपयोग होतो, यासाठी एका वाटीत चंदनाची पावडर घालावी. त्यात 1 चमचा गुलाब पाणी घालावं. दोन्ही चांगलं मिसळून घेऊन लेप चेहऱ्यास लावावा. 15 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. हा लेप लावल्यानं त्वचेस छान थंडंगार वाटतं. हा लेप धुतल्यानंतर चेहऱ्यास माॅश्चरायजिंग करणं आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चंदनाची पावडर फायदेशीर ठरते. तर या लेपातील गुलाब पाण्याचा फायदा थंडाव्यासोबतच त्वचा उजळण्यासाठी होतो.
Image: Google
कलिंगडाचा लेप
कलिंगडात 95 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळेच कलिंगडाचा लेप चेहऱ्यास लावल्यानं त्वचा ओलसर होवून चेहऱ्यास थंडावा मिळतो. कलिंगडामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. कलिंगडाचा लेप तयार करण्यासाठी कलिंगडाच्या फोडी चांगल्या कुस्करुन घ्याव्यात. कुस्करलेलं कलिंगड हलका मसाज करत चेहरा आणि मानेस लावावं. 20 मिनिटानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. टरबूजाच्या लेपामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं. त्वचा घट्ट आणि उजळ होण्यास फायदा होतो.