Join us  

Summer Special : केसांना खूप घाम येतो, चिकचिक होते? ५ उपाय, केसांच्या घामाचा त्रास कमी, केस दिसतील सिल्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 12:43 PM

Summer Special : केसांची, केसांच्या खालच्या त्वचेची काळजी घेणेही या काळात अतिशय आवश्यक असते. पाहूयात उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची काळजी कशी घ्यायची....

ठळक मुद्देकेस ब्लो ड्राय करण्यापेक्षा ते टॉवेलने पुसावेत आणि जास्तच ओलसर झाले असतील तर ते धुवावेत. स्कार्फ घेताना तो सुती कापडाचा, फिक्या रंगाचा असेल याची काळजी घ्यायला हवी. 

उन्हाळा म्हणजे घाम आणि चिकचिक. आपल्याला अंगाला जसा घाम येतो तसाच उन्हाळ्यात केसांमध्ये घाम येऊन केस ओले होऊन जातात. डोळ्यात घामाच्या धारा वाहायला लागल्या की आपल्याला कसंतरी होतं. यामुळे खाज येणे, घाम जास्त वेळ राहीला तर केस चिकट होणे आणि केसांत फोड येणे, वास येणे अशा समस्या उद्भवतात (Summer Special ). आपण कितीही फॅन आणि एसीमध्ये बसलो तरी उन्हाळ्याच्या दिवसांत घाम तर येतोच आणि त्यामुळे आपल्याला नकोसेही होते. उन्हाळ्यात आपण त्वचा टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रिन लावणे, अंगात किंवा चेहऱ्यावर काहीतरी बांधून बाहेर पडणे अशी काळजी घेतो. तशीच केसांची, केसांच्या खालच्या त्वचेची काळजी घेणेही या काळात अतिशय आवश्यक असते. पाहूयात उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची काळजी (Hair Care Tips) कशी घ्यायची....

(Image : Google)

१. केस ठराविक काळाने धुवा 

केसांत घाम आला की केसांमुळे तो तिथेच मुरतो. हा घाम टिपणे किंवा पुसणे केसांमुळे शक्य नसते. अशावेळी घाम तसाच राहिल्याने केस चिकट होतात. केस चिकट झाले की आपला सगळा लूकच बदलतो. तसेच घामामुळे केसांत खाजही येते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत केस आठवड्यातून दोन ते तीन वेळा आवर्जून धुवावेत. 

२. केस घट्ट बांधणे 

उन्हाळ्यात केस गळ्यात असतील तर आपल्याला जास्त गरम होते. एरवी आपण स्टाईल म्हणून केस मोकळे सोडत असलो तरी उन्हाळ्यात मात्र आपण केस मोकळे ठेवू शकत नाही. त्यामुळे घामघाम होऊ नये म्हणून आपण केस डोक्यावर बांधतो. अशावेळी हाय पोनी घालणे हा एक पर्याय असू शकतो. तसेच केस जास्त मोठे असतील तर केसांचा आंबाडा बांधणे किंवा केसांना वरच्या बाजूला क्लिप लावणे असे करता येते. पण यामध्ये केस जास्त घट्ट बांधू नयेत. त्यामुळे केस तुटण्याची भिती असते. तसेच केस खूप घट्ट बांधून ठेवल्यास काही वेळाने डोकं जड होण्याची किंवा दुखण्याचीही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केस वर बांधायचे असतील तरी हलके बांधा आणि ठराविक वेळाने ते मोकळे करत राहा. 

३. ब्लो ड्रायिंग टाळा

केस घामाने ओले होतात म्हणून अनेकदा ब्लो ड्राय केले जातात. मात्र सतत ब्लो ड्रायरचा वापर करणे केसांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. ब्लो ड्रायरमुळे केस तुटू शकतात. तसेच केस जास्त कोरडे होतात आणि केसांचा पोत बिघडतो. त्यामुळे केस ब्लो ड्राय करण्यापेक्षा ते टॉवेलने पुसावेत आणि जास्तच ओलसर झाले असतील तर ते धुवावेत. 

(Image : Google)

४. केसांवर थेट ऊन पडणार नाही याची  

उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडताना स्कार्फ किंवा टोपीचा वापर करावा. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आरोग्याबरोबरच त्वचा, केस यांवरही परिणाम होत असतो. त्यामुळे केस खराब होऊ शकतात. मात्र स्कार्फ घेताना तो सुती कापडाचा, फिक्या रंगाचा असेल याची काळजी घ्यायला हवी. 

५. आहार

उन्हाळ्यात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी ज्याप्रमाणे आपण पाणी, सरबते, ज्यूस यांचे जास्तीत जास्त सेवन करतो त्याचप्रमाणे केसांसाठीही ते आवश्यक असते. कलिंगड, खरबूज यांसारखी पाणीदार फळे, काकडी व इतर भाज्या यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असेल तर घाम व इतर समस्या नियंत्रणात राहतात आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीसमर स्पेशल