Join us  

Summer Special : उन्हात चेहरा टॅन होतो, रॅश येते, स्किन प्रॉब्लेम? ४ स्टेप्स, चेहरा फ्रेश, डोक्याला 'ताप' नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 11:30 AM

Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत घामोळ्या किंवा पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे, टॅन होणे, काळे चट्टे पडणे याबरोबरच कधी त्वचा खूप तेलकट होते तर कधी त्वचा एकदम कोरडी पडते, यावर काय उपाय कराल....

ठळक मुद्देशरीराचं आणि त्वचेचं तापमान बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी पाणी पिणे अतिशय आवश्यक असते. जास्त मेकअप उन्हाळ्याच्या दिवसांत टाळलेलाच चांगला. 

थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते म्हणून आपण त्वचेची जितकी काळजी घेतो तितकी आपण उन्हाळ्यात घेत नाही. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत सतत येणारा घाम आणि उन्हामुळे होणारे टॅनिंग याचा त्वचेवर विपरित परिणाम होतो. यामुळे उन्हाळ्यातही त्वचेच्या समस्या उद्भवतात. उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी (Summer Special)ज्याप्रमाणे जास्तीत जास्त पाणी पिणे, उन्हात जाताना डोके, डोळे यांना कव्हर करणे असे उपाय आपण करतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी (Skin Care Tips) घ्यायची हे आपल्य़ाला माहित असायला हवे. उन्हाळ्याच्या दिवसांत घामोळ्या किंवा पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे, टॅन होणे, काळे चट्टे पडणे अशा समस्या उद्भवतात. याबरोबरच कधी त्वचा खूप तेलकट होते तर कधी त्वचा एकदम कोरडी पडते. आता या सगळ्या समस्यांसाठी नेमके काय करायचे याचे सोपे उपाय पाहूया...

(Image : Google)

१. प्रखर सूर्यकिरणे थेट त्वचेवर पडणार नाहीत याची काळजी घ्या

उन्हाळ्यात सूर्यकिरणांची प्रखरता खूप जास्त असते. अशावेळी सूर्यकिरणे अंगावर पडली तर त्वचा काळवंडणे, लाल होणे, त्वचेवर फोड येणे अशा समस्या उद्भवतात. त्वचा डिहायड्रेट होऊन खूप कोरडी पडते. अशाप्रकारच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून गरज नसताना उन्हात बाहेर पडू नका. अगदीच बाहेर पडायचे असेल तर स्कार्फ, कॅप आणि गॉगल यांचा न विसरता वापर करा. त्यामुळे त्वचेचा थेट सूर्यकिरणांशी संपर्क येणार नाही. आपला स्कार्फ कॉटनचा आणि हलक्या रंगाचा असेल याची काळजी घ्या.

२. न विसरता सनस्क्रिन लावा

घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे. फक्त उन्हाळ्यातच नाही तर एरवीही सनस्क्रीन लावायला हवे. सनस्क्रीनमुळे त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होते. यातही चांगल्या कंपनीचे आणि एसपीएफ ३० पेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन लोशन लावायला हवे. घराबाहेर पडण्यापूर्वी १५ ते २० मिनीटे आधी सनस्क्रीन लोशन लावावे. त्यामुळे त्वचेला सूर्यकिरणांचा त्रास होत नाही. 

३. उन्हाळ्यात हेवी मेकअप टाळा

उन्हाळ्याच्या दिवसांत हेवी मेकअप टाळा. कारण उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो आणि आपल्या त्वचेची रंध्रे उघडली जातात. मेकअप केल्यास या रंध्रांमध्ये मेकअपचा थर जाऊन बसतो आणि त्वचेला मोकळी हवा मिळत नाही. तसेच रंध्रांमधून केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधने त्वचेच्या आतल्या थरात गेल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जास्त मेकअप उन्हाळ्याच्या दिवसांत टाळलेलाच चांगला. 

४. भरपूर पाणी प्या

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून पाणी पिणे ज्याप्रमाणे आवश्यक असते त्याचप्रमाणे त्वचेच्या आरोग्यासाठीही जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराचे डिहायड्रेशन होऊ शकते तसेच त्वचेचेही डिहायड्रेशन होऊ शकते. शरीराचं आणि त्वचेचं तापमान बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी पाणी पिणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे उन्हाळयाच्या दिवसांत त्वचा चांगली राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. पाण्याबरोबरच नारळ पाणी, आवळा सरबत, लिंबू सरबत, फ्रूट ज्यूस यांचा आहारात नक्की समावेश करायला हवा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल