केस विंचरण्यासाठी कंगवा हे महत्वाचे साधन आहे. कंगवा ही आपल्या आयुष्यात लागणारी सर्वात उपयुक्त गोष्ट आहे. केस विंचरण्यासाठी, केसांचे आरोग्य राखण्यासाठी, केसांतील गुंता सोडवण्यासाठी अशा विविध कारणांसाठी आपण रोज कंगव्याचा वापर करत असतो. पूर्वीच्या काळी केस विंचरण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर केला जात असे. परंतु बदलत्या काळानुसार या लाकडी कंगव्याची जागा सध्याच्या प्लास्टिक कंगव्यानी घेतली. आजही काही ठिकाणी शोभिवंत लाकडी कंगवे विकत मिळतात. तज्ज्ञ सांगतात केसांची योग्य निगा राखण्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक प्रसाधने आणि साधनांचा वापर करायला हवा. यासाठीच केस विंचरण्यासाठी लाकडी कंगवा वापरणे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.
आजकाल केस गळणे, तुटणे, रुक्ष होणे अशा अनेक तक्रारी सतत आपल्या कानांवर येत असतात. त्यावर उपचार म्हणून विविध प्रकारचे शॅम्पू , तेल, कंडीशनर वापरण्याचा सल्ला दिला जातो. एवढे सगळे उपाय करुनही काहीवेळा आपल्या केसांवर आपल्याला हवा तसा फरक दिसून येत नाही. काही अंशी केसांच्या या सतत उद्भवणाऱ्या समस्यांसाठी आपण वापरत असलेले प्लास्टिक किंवा धातूचे कंगवे देखील कारणीभूत असू शकतात. या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी लाकडापासून बनविलेले कंगवे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात(Surprising Benefits Of Using A Wooden Comb For Your Hair).
लाकडी कंगवे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर का असतात ?
लाकडी कंगवा हा लाकडासारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला असतो. आपले केस, स्कॅल्प आणि डोक्याची हाडे यांना लाकडी कंगवा वापरल्यामुळे आराम मिळतो. लाकडी कंगव्याने केस विंचरताना केसांचा जास्त गुंता होत नाही. लाकडी कंगवा वापरल्यामुळे केसांचा गुंता पटकन सोडवण्यास मदत होते. लाकडी कंगव्यामुळे त्वचेच्या इनफेक्शनचा धोका कमी होतो.
लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे :-
१. केसांच्या मुळांना तेल योग्य पद्धतीने मिळते :- केस लाकडी कंगव्याने विंचरल्यामुळे केसांना लावलेले तेल केसांच्या मुळांना योग्य पद्धतीने मिळते. कंगव्याला लागलेले अतिरिक्त तेल कंगव्याच्या लाकडामध्ये मुरते. प्लास्टिकच्या कंगव्याला मात्र या तेलामुळे चिकटलेल्या धुळ, माती अशा गोष्टी केसांमध्ये अडकतात. ज्यातून पुढे इनफेक्शनचा धोका निर्माण होतो. जर तुमचे केस कोरडे किंवा रुक्ष असतील तर लाकडी कंगव्यामुळे केसांचे जास्त नुकसान होत नाही.
२. रक्ताभिसरण सुधारते :- लाकडी कंगवा हा नैसर्गिक लाकडापासून बनलेला असल्यामुळे लाकडी कंगवा जास्त टोकदार नसतो. ज्यामुळे लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे आपल्या स्कॅल्पवर ओरखडे किंवा जखमा होत नाहीत. याउलट लाकडामुळे तुमच्या केसांच्या मुळांखालील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. लाकडाचे दात केसांच्या नाजुक मुळांना हळूवार मसाज करतात. ज्यामुळे आपल्या मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो. केसांच्या मुळांमधील रक्तप्रवाह सुधारल्यामुळे केस तजेलदार दिसतात.
३. केसांची वाढ होण्यास मदत होते :- तेल लावल्यावर केस लाकडी कंगव्याने विंचरल्यामुळे केसांच्या मुळांना मालिश होते. ज्यामुळे केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. केसांची घनता आणि लांबी यामुळे वाढू लागते. केस गळणे कमी होते आणि केस घनदाट व लांब होतात. लाकडी कंगव्यामुळे केसांच्या मुळांना चालना मिळते.
आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...
४. केसांतील कोंडा कमी करण्यास मदत करते :- आपल्याला जर केसांत वारंवार कोंडा होत असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण कोंडा हे केसांमध्ये होणाऱ्या इनफेक्शनचा एक भयंकर परिणाम आहे. नियमित लाकडी कंगवा वापरण्यामुळे हे इनफेक्शन होणं टाळता येऊ शकतं. शिवाय लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे केसांमधील कोंड्याचे कण बाहेर टाकले जातात. याउलट प्लास्टिकच्या कंगव्याला मात्र लाकडी कोंड्याचे कण चिकटून राहतात आणि दिवसेंदिवस इनफेक्शन वाढत जातं.
५. केसांना नैसर्गिक चमक येते :- लाकडी कंगवा केसांचा गुंता सोडवतो आणि त्यांना नैसर्गिक चमक मिळवून देतो. हे लाकडी कंगवे नैसर्गिक लाकडांपासून बनवलेले असल्यामुळे, लाकडी कंगव्यामुळे अॅलर्जी किंवा त्वचेच्या कोणत्याही समस्या उद्भवण्याची शक्यता नसते.