उन्हाळा म्हटला की घाम आणि चिकचिक आलीच. कधी उकाडा कमी होतो आणि पाऊस पडतो असे झालेले असते. उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होतेच पण सगळ्यात महत्त्वाची आणखी एक समस्या म्हणजे केसांमधून हा घाम वाहतो आणि त्यामुळे केसांत खाज येते. ज्यांचे केस मोठे आहेत त्यांना तर हा उन्हाळा अक्षरश: असह्य होतो. मग वरच्या बाजूला केसांचा बुचडा बांधला की ते केस थेट दुसऱ्याच दिवशी खाली येतात. उन्हाळ्यामुळे केस चिपचिपीत तर होतातच पण प्रखर उन्हामुळे ते बेजान आणि कोरडेही होतात. यामुळे मग केसांत कोंडा होणे, केस गळणे, फंगल इन्फेक्शन होणे, फोड येणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात. केसांच्या मुळांना मोकळी हवा न मिळाल्याने अशाप्रकारचे त्रास उद्भवतात. कधी आपण ऑफीसमध्ये असतो तर कधी आणखी कुठे. अशावेळी डोक्यात खाज आली तर आपल्याला सहन होत नाही आणि नकळत आपला हात केसांत जातो. पण अशाप्रकारे केसात हात घालून खाजवणे चांगले दिसत नाही. अनेकदा जास्त जोरात खाजवल्यास याठिकाणी रक्त येणे, त्वचा निघून येणे अशा समस्याही निर्माण होतात. पण असे होऊ नये यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूयात...
१. कंगवा कोणाशी शेअर करु नका
आपण ज्याप्रमाणे आपला टूथब्रश कोणाशीही शेअर करत नाही त्याचपद्धतीने आपला कंगवाही कोणाशीच शेअर करायचा नाही. त्यामुळे विविध प्रकारची इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते.
२. एक दिवसाआड केस धुवा
आपले केस तेलकट असतील तर एकदिवसाआड केस धुणे हा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे केसांमध्ये तयार होणारे तेल निघून जाण्यास मदत होते. शाम्पूमुळे केस स्वच्छ होतात आणि केसांच्या मूळांशी खाज येत असेल तर त्याचेही प्रमाण कमी होते.
३. ओले केस बांधू नका
केस पूर्ण कोरडे करुन मग ते विंचरणे किंवा त्याची हेअर स्टाईल करणे ठिक आहे. पण अनेकदा आपण घाईघाईत ओले केस विंचरतो किंवा ओलेच केस बांधतो. मात्र असे केल्याने केसांमध्ये कुबटपणा राहण्याची शक्यता असते. तसेच ओलेपणामुळे केसांत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे खाज वाढू शकते.
४. दह्याने मसाज
दह्याने केसांच्या मूळांशी मसाज केला तर खाज दूर होण्यास मदत होते. इतकेच नाही तर हद्यामुळे केसांना एकप्रकारची चमक येते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना दह्याने मसाज करायला हवा.
५. कांद्याचा रस
कांद्याचा रस काढून तो कापसाच्या साह्याने केसांच्या मूळांशी सगळीकडे लावून ठेवा. त्यामुळे केसांच्या मूलांत होणारे इरिटेशन आणि खाज कमी होण्यास मदत होईल. हा रस मूळांना लावल्यानंतर २० मिनीटे तसाच राहू द्या. त्यानंतर हलक्या शाम्पूने केस धुवून टाका.
६. अंटीबॅक्टेरीयल तेलाचा वापर करा
केसांच्या मूळांशी घामाने इन्फेक्शन झाल्यानेच आपल्याला मूळांशी खाज येते. खाजवले की याठिकाणची त्वचा जळजळते आणि केसांच्या समस्या आणखी वाढतात. पण याठिकाणी असणारे इन्फेक्शन निघून जाण्यासाठी अंटीबॅक्टेरीयल तेलाचा वापर करायला हवा. यामध्ये आपण कडुलिंबाचे तेल, टी ट्री ऑईल अशा तेलांचा आवर्जून वापर करु शकतो.