दुचाकी चालवणाऱ्या महिलांना हातांचं टॅनिंग होण्याचा त्रास वारंवार होतो. गाडीवर जाताना आपण चेहरा व्यवस्थित कव्हर करतो, डोळ्यांनाही गॉगल लावतो आणि हात झाकले जावेत म्हणून अगदी सनकोटदेखील घालतो. पण जशी गाडीची स्पीड वाढते, तसा सनकोट हातावरून मागे सरकत जातो आणि मग हाताची बोटे, तळवा आणि हाताचा काही भाग काळा पडतो. व्हॅक्सिंग केलं की हाताचं टॅनिंगदेखील निघून जातं. पण बऱ्याच महिला साधारणपणे महिन्यातून एकदा हॅण्डवॅक्स करतात. म्हणून व्हॅक्सिंग होईपर्यंत वाट पाहण्याची काही गरज नाही. हाताचं टॅनिंग कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करून बघा. यामुळे निश्चितच काळवंडलेले हात उजळतील आणि त्यासोबतच मऊ, चमकदारही होतील.
हाताचे टॅनिंग काढण्यासाठी काय करावं...
१. डाळीच्या पिठाचा सोपा उपाय
हरबरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन हा सौंदर्य शास्त्रातला एक महत्वाचा पदार्थ. डाळीच्या पिठाचा उपयोग करून तुम्ही हाताचं टॅनिंग अगदी लगेचच काढू शकता. हा उपाय करण्यासाठी एका बाऊलमध्ये तीन टेबलस्पून डाळीचं पीठ घ्या. यामध्ये ३ टेबलस्पून दही टाका. यामध्ये अर्धा चमचा गुलाब जल टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून त्याची पेस्ट तयार करा. हा लेप दोन्ही हातांवर चोळा आणि ५ ते १० मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर चोळून- चोळून हातावरचे पीठ काढून टाका. डाळीचे पीठ हे नॅचरल स्क्रबर आहे. या उपायामुळे हातावरचा मळ निघून जातो आणि हात स्वच्छ दिसू लागतात. तसेच दह्यामुळे हात चमकदार होतात.
२. लिंबाचा रस आणि बटाटे
लिंबू आणि बटाटे यांना नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या उपायानेही हाताचे टॅनिंग कमी होते अणि हात उजळ दिसू लागतात. सगळ्यात आधी २ बटाटे उकडून घ्या. ते स्मॅश करून एका बाऊलमध्ये टाका. यामध्ये आता एक लिंबू पिळा. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि दोन्ही हातांवर चोळून लावा. हे मिश्रण सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. बटाट्याचा रस किंवा उकडलेल्या बटाट्याचे पाणी हातावर चोळल्यानेही लगेचच परिणाम दिसून येतो.
३. मध, कणिक आणि लिंबू
३ टेबलस्पून गव्हाचे पीठ म्हणजे कणिक एका बाऊलमध्ये घ्या. यामध्ये दोन टेबलस्पून मध आणि दोन टेबलस्पून लिंबाचा रस टाका. हे मिश्रण तुमच्या हातांवर लावा. मिश्रण सुकत आले की साधारण ५ ते १० मिनिटांनी हात चोळून हे मिश्रण काढून टाका. या पद्धतीने हाताचे नैसर्गिक पद्धतीने स्क्रब होईल आणि कणिक व मध यांच्या गुणांमुळे हात मऊ पडतील.
४. दही आणि टोमॅटो
या दोन्ही पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे या दोन्हींचा लेप एकत्रित करून हातांवर चोळला तर टॅनिंग निघून जाते आणि त्वचा चमकदार होते. एक मध्यम आकाराचा टोमॅटो किसून घ्या आणि त्याचा रस करा. यामध्ये तीन टेबलस्पून दही टाका. हा लेप हातावर लावा. ५ ते १० मिनिटानंतर लेप सुकत येईल. त्यानंतर तो चाेळून चोळून काढून टाका. हा उपाय केल्याने लगेचच हाताची त्वचा उजळलेली दिसेल. हातावरची डेड स्किन निघून गेल्याने हात मऊ होतील.
५. पपईची जादू पहा
बऱ्याचदा घरी असे होते की पपई चिरली की लगेच सगळी खाल्ली जात नाही. काही पपईचे तुकडे उरतात. मग ते शिळे झाल्यामुळे आपण ते सरळ फेकून देतो. पण असे करू नका. हे तुकडे सरळ उचला आणि तुमच्या हातावर चोळा. पपईमध्ये खूप जास्त प्रमाणात नैसर्गिक एन्झाईम्स आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. हे त्वचेचा पोत सुधारण्यासाठी मदत तर करतातच पण त्यासोबतच त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने पोषण करतात. म्हणूनच हातावरचे टॅनिंग काढून टाकण्यासाठी पपई हा एक उत्तम उपाय आहे.
ही काळजी देखील घ्या
घरातून बाहेर पडताना आपण चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेताे. त्या तुलनेत हाताकडे जरा दुर्लक्षच होते. त्यामुळे जर उन्हात जायचे असेल तर हातानांही सनस्क्रिन लोशन लावायला विसरू नका. घराबाहेर पडण्याच्या १० ते १५ मिनिटे आधी हातावर एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा जास्त असणारे सनस्क्रिन लोशन लावावे.