थंडीच्या दिवसात सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ती आपल्या त्वचेची. कारण अंग उलणे, पायावर भेगा पडणे, कोंडा होणे अशा एक ना अनेक तक्रारी थंडीमध्ये सुरू होतात. अशीच एक सर्वसामान्य तक्रार म्हणजे थंडीचा जोर वाढला की अंग काळवंडायला सुरूवात होते. ज्यांना बाहेर थंडीत जावं लागतं त्यांची त्वचा तर काळवंडतेच. पण ज्यांना फार काही घराबाहेर जाण्याचं काम पडत नाही, अशा लोकांची त्वचाही थंडीत काळवंडू लागते. उन्हाळ्यात त्वचेचं टॅनिंग होऊन त्वचा काळी पडणे आणि थंडीमुळे त्वचेवर परिणाम होऊन त्वचा काळी होणे, यात खूप फरक आहे.
ज्याप्रमाणे काही घरगुती उपाय करून आपण उन्हाळ्यातलं त्वचेचं टॅनिंग कमी करू शकतो, त्याचप्रमाणे थंडीमुळे काळवंडलेली त्वचाही घरगुती उपायांनी पुन्हा उजळवता येते. म्हणूनच त्वचा काळवडंली असेल तर मुळीच टेन्शन घेऊ नका. कारण काही अगदीच साधे सोपे घरगुती उपाय करून त्वचेचं काळेपण दूर करता येतं. यासाठी खूप जास्त वेळ देण्याचीही गरज नाही. केवळ ५ ते १० मिनिटांचा उपायही यासाठी पुरेसा ठरतो. घरगुती उपाय केल्यामुळे काळवंडलेली त्वचा तर उजळेलच, पण अधिक नितळ आणि तुकतुकीतही होईल.
काळवंडलेल्या त्वचेसाठी करून बघा हे उपाय१. कच्चे दूधकच्च्या दुधात असलेल्या नैसर्गिक फॅट्समुळे हिवाळ्यात त्वचेला चांगले पोषण मिळते. तीन टेबलस्पून कच्चे म्हणजेच न तापवलेले दूध घ्या. यामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस टाका. या मिश्रणाने त्वचेला ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्वचेचे काळवंडलेपण दूर होते. तसेच त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावा.
२. डाळीचे पीठहरबरा किंवा चणा डाळीचे पीठ त्वचेसाठी अतिशय पोषक असते. एक टेबलस्पून डाळीचे पीठ घ्या. त्यात अर्धा टेबलस्पून दही टाका आणि एक टीस्पून हळद टाका. या मिश्रणाची चांगली पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावण्यापुर्वी चेहरा थोडा ओला करून घ्या. त्यानंतर हे पीठ चेहऱ्यावर चोळून लावा. १० मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर लगेचच चेहऱ्याला मॉईश्चराईज करा.
३. संत्र्यांच्या सालांची पेस्ट किंवा पावडरसंत्र्यांची वाळलेली साले मिक्सरमधून फिरवा आणि त्याची पावडर करा. ही पावडर दूधात कालवा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा तजेलदार होईल. जर संत्र्यांची वाळलेली साले नसतील, तर संत्र्याचे साल बारीक बारीक चिरून घ्या आणि मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट करा. या पेस्टमध्ये थोडे दूध टाका आणि ती चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. त्वचेचा काळेपणा दूर होईल.
४. मसूर डाळीचे पीठमसूर डाळीचे पीठ देखील त्वचेचा काळेपणा घालविण्याचा एक उत्तम उपाय आहे. यासाठी दोन टेबलस्पून मसूर डाळीचे पीठ घ्या. यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून दही घाला आणि त्याची पेस्ट बनवा. चेहरा थोडा ओला करा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. २- ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. लगेचच फरक जाणवू लागेल.
५. चंदनचंदन हे त्वचेसाठी अमृताप्रमाणे काम करते. जर चंदनाचं खोड असेल तर ते सहानीवर उगाळा आणि ते चेहऱ्याला लावा. हा उपाय करण्यासाठी चंदनाची पावडर वापरली तरी चालेल. चंदनाच्या पावडरमध्ये थोडं दूध टाका. त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय दर एक दिवसाआड केला तरी चालेल.