त्वचेच्या सर्व समस्यांवर ब्यूटी पार्लर आणि ब्यूटी क्लिनिक्समधे उपाय आहेत. पण त्यामुळे कायमस्वरुपी फरक पडतो का? हे मात्र नक्की नसतं. शिवाय वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी लागतात. पण हे सर्व टाळून आपण आपल्या हातातल्या आणि आवाक्यातल्या उपायांकडे का? बघत नाही? आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांवरचे उपाय स्वयंपाक घरातल्या धान्याच्या आणि डाळी साळींच्या डब्यात दडलेले आहेत. त्वचेची काळजी घेण्यासाठी लाल मसूर डाळीचा उपयोग हा नवीन शोध नाही. फार पूर्वीपासून मसूर डाळ ही त्वचेची निगा राखण्यासाठी वेगवेगळ्या लेपांच्या स्वरुपात वापरली जाते.
लाल मसूरचा फायदा संपूर्ण शरीरालाच होतो. पण या डाळीचा फायदा त्वचेला जास्त होत असल्याचं आढळून आलं आहे. मसूरच्या डाळीत अॅण्टिऑक्सिडण्टस असतात. फ्री रॅडिकल्समुळे ( मूक्त मूलक) त्वचेचं होणारं नूकसान भरुन काढण्यास हे अॅण्टिऑक्सिडण्टस मदत करतात. मसूर डाळीच्या पिठामुळे आपल्या त्वचेची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मसूर डाळीत असलेले पोषक तत्त्वं, जीवनसत्त्व आणि खनिजांमुळे मसूर डाळीचं पीठ उत्तम क्लिन्जर म्हणून काम करतं. आणि म्हणूनच मसूर डाळीच्या फेस पॅकमुळे चेहेऱ्याच्या त्वचेवरील घाण, दूषित घटक निघून जातात. शिवाय मसूर हे एक्सफोलिएटर म्हणूनही काम करतात. त्याचा उपयोग चेहेऱ्यावरील मुरुम, पुटकूळ्या आणि ब्लॅकहेडस घालवण्यासाठी होतो. मसूरमधे असलेल्या नैसर्गिक ब्लिचिंग तत्त्वामूळे मसूर डाळीच्या पिठाचा नियमित वापर केल्यास चेहेऱ्याची त्वचा उजळते. मसूर डाळीमधील पोषक घटकांमुळे चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या जातात. एजिंगच्या खुणाही नाहिशा होतात. चेहेऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मसूर डाळ फायदेशीर असते. मसूर डाळीच्या फेसपॅकमधे थोडी हळद मिसळून घातल्यास चेहेरा उजळण्यासोबतच चेहेऱ्यावरचे डागही निघून जातात. मसूर डाळीच्या लेपामुळे त्वचेचं पोषण होतं आणि चेहेऱ्यावरील आर्द्रता टिकून राहाते. चेहेऱ्यावर तेज येतं, चेहेरा चमकतो. मसूर डाळ आणि मसूर डाळीच्या फेसपॅकचे एवढे फायदे असताना त्वचेची काळजी घेण्यासाठी महागडे उपचार करण्याची खरंच गरज आहे का? हे एकदा स्वत:लाच विचारुन पाहा.
मसूर डाळीचे गुणी लेप
मसूर डाळ आणि कच्च्या दुधाचा लेप मसूर डाळीचं थोडं पिठ कच्च्या दुधात घालावं. ते चांगलं एकत्र करावं. त्याची घट्ट पेस्ट तयार करावी. हा स्क्रब हलक्या हातानं मसाज करत चेहेऱ्याला लावावा. वीस मिनिटानंतर चेहेरा गरम पाण्यानं धुवावा. परिणाम दिसण्यासाठी आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा.
मसूर डाळ- दूध - गुलाब पाण्याचा लेपकच्चं दूध आणि थोडं गूलाब एकत्र करावं. या मिश्रणात रात्रभर थोडी मसूर डाळ भिजत घालावी. सकाळी याची दाटसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेऱ्यास लावावी. चेहेरा मऊ मुलायम होण्यासाठी आणि त्वचेचं भरण पोषण होण्यासाठी हा लेप वीस मिनिटं ठेवावा. आणि मग पाण्यानं धुवून काढावा.
मसूर डाळ आणि खोबरेल तेलाचा लेपमसूर डाळीचं पिठ खोबरेल तेलात घालावं. त्यात एक चिमूट हळद आणि थोडं दूध घालावं. हे मिश्रण चेहेऱ्यास लावावं. पाच मिनिटांनी हळुवार स्क्रब करत ते काढून टाकावं. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास उत्तम परिणाम दिसातात.
मध आणि मसूर डाळीचा लेपमसूर डाळीत आर्द्रता राखणारे घटक असतात. तर मधामुळे त्वचेतील ओलसरपणा टिकून राहातो. म्हणून मध आणि मसूर डाळीचा लेप लावणं गरजेचं आहे. यासाठी मधात मसूर डाळीचं पिठ घालावं. तयार झालेल्या मिश्रणाचा लेप चेहेऱ्यास लावावा. पंधरा मिनिटं तो लेप ठेवावा. मग गरम पाण्यानं चेहेरा धुवावा.
बेसन आणि मसूर डाळीचा लेपउन्हामुळे रापलेली, काळवंडलेली त्वचा नैसर्गिकरित्या उजळवण्यासाठी बेसन आणि मसूर डाळीचा पॅक उत्तम ठरतो. शिवाय या लेपामूळे चेहेऱ्याची त्वचा स्वच्छ होते.सौंदर्य तज्ज्ञ मसूर डाळीतल्या पोषक घटकांमुळे या डाळीच्या पिठाचा वापर रोज करण्याचा सल्ला देतात. त्वचा उत्तम रितीनं जपण्यासाठे लाल मसूर हा उत्तम पर्याय आहे हेच खरं !