Join us  

त्वचेसाठी म्हणून खास आहार असतो का? नितळ त्वचा हवी तर आहारात हवेच ४ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 2:59 PM

सौंदर्यासाठी आहार-विहारही तितकाच महत्त्वाचा असतो...

ठळक मुद्देस्कीन केअर रुटीनमध्ये आहाराकडे विशेष लक्ष द्यासर्व गोष्टींच्या संतुलनाने तब्येतीबरोबरच सौंदर्यही राहील उत्तम

थंडीच्या दिवसांत चेहरा खरखरीत होतो. कितीही मॉइश्चरायझर लावले तरी थोड्या वेळात चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसायलाच लागतात. त्वचेची आग होणे, कोरडेपणामुळे तडतडणे, त्यावर मेकअप नीट न बसणे अशा समस्या या काळात भेडसावतात. आता त्वचा हा शरीराच्या वरचा भाग असल्याने आपल्याला वाटेल की त्यासाठी फक्त बाह्य उपचारच गरजेचे असतात. वेगवेगळे घरगुती पॅक आणि पार्लरमधील उपायांनी चेहरा नितळ होतो असे वाटल्याने आपण तशाच पद्धतीचे उपाय करत राहतो. पण या उपायांनी म्हणावा तसा फरक पडतोच असे नाही. पण आहारात काही महत्त्वाचे बदल केल्यास त्याचा तुमच्या त्वचेवर अतिशय चांगला परिणाम होतो. आता त्वचेसाठी असा काही आहार असतो का असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण हो त्वचा चांगली राहण्यासाठी आहारात काही छोटे बदल केल्यास त्याचा चांगला परीणाम दिसून येतो. वाढलेले वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून आपण एक ना अनेक उपाय करत असतो. पण आहाराबाबत योग्य ती काळजी घेतली तर आपल्या त्वचेशी निगडीत अनेक समस्या कमी होण्यास निश्चितच मदत होईल. केवळ आहारातच नाही तर हे पदार्थ त्वचेला लावल्यानेही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. 

१.    पाणी 

आपल्य़ा रोजच्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. शरीराला आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवण्याचे काम पाण्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने होते. जास्त पाणी प्यायल्याने त्वचा मुलायम, नितळ होण्यास मदत होते. पण पाणी कमी प्यायल्यास त्वचेचा कोरडेपणा, सुरकुत्या यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे दिवसभरात आपण पुरेसे पाणी पितो ना याकडे लक्ष द्या.

२.    फॅटी असिड 

ओमेगा ३ फॅटी असिड आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. हा घटक आक्रोड, जवस, सुकामेवा, पालेभाज्या, काही मासे यांमध्ये असतो. त्वचा नितळ आणि मऊ ठेवायची असेल तर हा घटक आहारात असायलाच हवा. त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यासाठी आणि तुम्ही जास्तीत जास्त तरुण दिसावे यासाठी ही फॅटी असिड आहारात असणे गरजेचे असते. 

३.    गाजर 

थंडीच्या दिवसांत बाजारात गाजर भरपूर प्रमाणात दिसतात. गाजरात बेटा केरोटीन आणि लायकोपिन हे घटक असतात. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. थंडीत उन्हाचा तडाखा जास्त नसला तरी अतिनील किरणे असतातच. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंटस असतात, त्यामुळे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते.

४.    पाणीदार फळे

थंडीच्या दिवसांत संत्री, मोसंबी य़ांसारखी क जीवनसत्तव असलेली फळे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. थंडीत उत्तम आरोग्यासाठी ही फळे खाणे अतिशय उपयुक्त ठरते. या फळांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनशक्ती सुधारते. पोट साफ असेल तर त्वचा नितळ दिसण्यास मदत होते. पाणीदार फळांमुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते आणि त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी