Join us  

चारचौघात लाज आणते डोक्यातली खाज, डोक्याला झालेलं इन्फेक्शन बरं करणारे हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 3:45 PM

ऋतु बदलला की त्याचा परिणाम म्हणून डोक्यात खाज येते. पावसाळ्यात तर दमट वातावरण आणि पावसात भिजलं की ओलं राहाणारं डोकं यामुळे डोक्यात खाज येतेच. ही खाज घालवण्याचे सोपे उपाय आहेत. करुन तर पहा!

ठळक मुद्देडोक्यातली खाज घालवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लिंबाचा रस आणि गुलाब पाण्याचं मिश्रण.टी ट्री ऑइल आणि खोबरेल तेल एकत्र करुन त्याने केसांच्या मुळाशी मसाज केल्यास खाजेपासून त्वरित आराम मिळतो. पेपरमिण्ट ऑइलचा उपयोग मेहेंदीला रंग आणण्यासोबतच डोक्यातली खाज घालवण्यासाठीही होतो.

डोक्यात खाज आली की राहावत नाही आणि हात केसात जातात. पण चारचौघात डोकं खाजवणं हे बरं दिसत नाही. आणि एकटे असलो तरी डोकं खाजायला लागलं की वैतागायला होतं. डोक्यात खाज येण्याची अनेक कारणं आहेत. पण ऋतु बदलला की त्याचा परिणाम म्हणून डोक्यात खाज येते. पावसाळ्यात तर दमट वातावरण आणि पावसात भिजलं की ओलं राहाणारं डोकं यामुळे डोक्यात खाज येतेच.वैताग आणि लाज आणणारी ही डोक्यातली खाज घरगुती सोपे उपाय करुनही जाते. कोणत्याही प्रकारची रसायनं वापरण्यापेक्षा केस आणि टाळु या दोन्हींच्या सुरक्षेसाठी घरगुती उपाय सुरक्षित असतात.

गुलाबपाणी आणि लिंबू

 

डोक्यातली खाज घालवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लिंबाचा रस आणि गुलाब पाण्याचं मिर्शण. ते तयार करण्यासाठी तीन चमचे लिंबाचा रस आणि तीन चमचे गुलाब पाणी घ्यावं. ते व्यवस्थित एकत्र करावं. हे मिश्रण बोटांनी डोक्याला हलका मसाज करत लावावं. एक तास ते तसंच राहू द्यावं आणि मग सौम्य शाम्पूनं केस धुवावेत.हे मिश्रण डोक्याला लावल्यावर सुरुवातीला सौम्य आग झाल्यासारखी वाटते. कारण हे मिश्रण केसांच्या मुळाशी आणि डोक्याच्या त्वचेला खाज निर्माण करणार्‍या जिवाणूंना मारत तेथील त्वचेचा पीएचच्या स्तरात समतोल आणतो. थोड्या वेळानं ती अग शांत होते. केस धुताना सौम्य शाम्पू वापरणं गरजेचं अहे. आणि त्यानंतर कंडीशनर अवश्य लावावं. सलग तीन ते चार दिवस हा उपाय केल्यास डोक्यातली खाज निघून जाते.

टी ट्री ऑइल आणि खोबरेल तेल

टी ट्री ऑइल आणि खोबरेल तेल एकत्र करुन त्याने केसांच्या मुळाशी मसाज केल्यास खाजेपासून त्वरित आराम मिळतो. घरात जर टी ट्री ऑइल असेल तर डोक्यातल्या खजेवर इतर काही उपाय करण्याची गरज नाही. हे मिश्रण तयार करण्यासाठी दोन चमचे खोब र्‍याचं तेल आणि त्यात दोन थेंब टी ट्री ऑइल घालावं. ते चांगलं घोळून ते मिश्रण बोटांनी केसांच्या मुळाशी हलका मसाज करत लावावं. टी ट्री ऑइल आणि खोबर्‍याच्या तेलाचं मिर्शण डोक्याला लावलं की 40 मिनिटं ते डोक्याला राहू द्यावं. नंतर शाम्पूनं केस धुवावेत. डोक्यातली खाज पूर्ण जाण्यासाठी सलग तीन ते चार दिवस हा उपाय करावा.

पेपरमिण्ट ऑइल

 

हाताला जेव्हा मेहेंदी लावली जाते तिला रंग चढण्यासाठी पेपरमिण्ट ऑइलचा वापर केला जातो. त्यामुळे बहुतेकांच्या घरात हे तेल सहज उपलब्ध असतं. या तेलाचा उपयोग मेहेंदीला रंग आणण्यासोबतच डोक्यातली खाज घालवण्यासाठीही होतो.हे तेल डोक्याल लावण्यासाठी आवळा/ खोबरेल किंवा बदाम यापैकी जे उपलब्ध असेल ते घ्यावं. एका वाटीत दोन तीन चमचे तेल घ्यावं. जितके चमचे तेल घेतलं तेवढेच पेपरमिण्ट ऑइलचे थेंब त्यात टाकावेत. उदा दोन चमचे खोबरेल तेल घेतलं असेल तर त्यात दोन थेंब पेपरमिण्ट ऑइल घालावं. हे चांगल एक्त्र करावं. हे मिश्रण बोटांच्या सहाय्यानं केसांच्या मुळांशी हलका मसाज करत लावावं. अर्धा तास ते तसंच राहू द्यावं. आणि मग सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. या उपायानेही डोक्यातली खाज लगेच जाते.