सारिका पूरकर गुजराथी
‘विवाह’ चित्रपटात शाहीद कपूर नायिकेला अर्थात पूनमला म्हणतो, ‘शादी के वक्त लडकिया थोडी बावली हो जाती हैं.. वजन घटाने मे लग जाती हैं.. लेकिन तुम ऐसा बिलकुल मत करना.. दो-चार किलो बढ जाए तो भी फिक्र नहीं..!’ मात्र केवळ लग्न ठरल्यावरच नाही, आता तर वर्षभर मुलींच्या डोक्यात सुंदर दिसण्याचा भुंगा पिंगा घालत असतो. सकाळी ब्रश करण्याच्या वेळेपासून त्यांचा आरशाशी संवाद सुरू होतो. या दरम्यानचजाणवू लागते की, त्यांच्या स्कीनचे पोत व्यवस्थित नाही. केस जरा जास्तच पातळ आहेत किंवा जास्तच ‘कर्ली’ आहेत किंवा मग खूपच सिल्की आहेत. कमरेचा घेर वाढतोय. अमूक ड्रेस घातल्यावर फार बारीक दिसते, सांगाडा म्हणून कोणी चिडवायला नको म्हणून वजन वाढवायला हवे. नाक जरा जास्तच पसरट दिसतेय. दातातली फट वाढतेय. मग त्यावर व्हाटसपीय ग्यानही मिळते, यावर एकच पर्याय त्यांना आपलासा वाटतो तो म्हणजे ब्यूटी सर्जरी. त्यात गल्लीबोळात सर्जरी करणारे क्लिनिक उघडू लागल्याने ॲक्सेस सोपा झाला. मात्र धोक्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. या ब्युटी सर्जरीचे काहींना साइड इफेक्ट्सही सहन करावे लागतात.त्यामुळे काही गोष्टी माहित असलेल्या बऱ्या.
कोणत्या सर्जरी केल्या जातात?
डोक्याच्या केसांपासून पायाच्या तळवे, नखापर्यंत प्रत्येक अवयव सुंदर करण्यासाठी आज सर्जरी केल्या जाऊ लागल्या आहेत. नाकाचा आकार बदलणं, चरबी कमी करणं यासाठीच्या सर्जरींचे प्रमाण मोठं आहे.
लिपोसुक्शन : ही सर्जरी शरीरावरील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी करून घेतली जाते. हनुवटी, पोट, नितंब, मांडी, खांद्याची मागची बाजू या भागावरील चरबी या सर्जरीने प्रामुख्याने काढली जाते.लठ्ठपणा झटकन घालवण्यासाठीचा पर्याय म्हणून युवती याकडे बघताहेत.
फेसलिफ्ट : त्वचेवरील सुरकुत्या आणि सैल पडलेली त्वचा तुमचे वय सांगत असते. म्हणूनच टाइट, प्लेन त्वचा मिळवण्यासाठी ही सर्जरी केली जाते. यातही ब्रो लिफ्ट (पापणीजवळची त्वचा) नेक लिफ्ट (मानेजवळची त्वचा), आयलीड रिपेअर (पापणीचा आकार बदलणो) अशा सर्जरीज् केल्या जातात. शास्त्रीय भाषेत या सर्जरीज्ना ‘हिटिडेक्टॉमी’ म्हटले जाते.
हिनोप्लास्टी : बसके नाक धारदार करणं किंवा पोपटासारखे नाक असेल तर त्याचा अणकुचीदारपणा कमी करणं. थोडक्यात ‘नोझ शेपिंग’साठी ही सर्जरी केली जाते. सध्याच्या सर्वच बॉलिवूड ‘दिवाज्’ने ही शस्त्रक्रिया केलेली दिसून येत असल्यामुळे सर्वात पॉप्युलर सर्जरी म्हणून ती ओळखली जाते.
लिप सर्जरी : काहींचे ओठ इतके पातळ असतात की, वरचा किंवा खालचा ओठ दिसतच नाही तर काहींचे ओठ प्रमाणापेक्षा जाड असतात. अशा वेळी प्रमाणबद्ध ओठांसाठी ही सर्जरी केली जाते. याला ‘लिप्स ऑगमेन्टेशन’ म्हणतात.
डर्मल ग्राफ्टिंग : चेहऱ्यावर व्रण, डाग असतील तर या सर्जरीद्वारे ते घालवून त्या भागाला उभार दिला जातो. त्यामुळे त्वचा ताजी, तुकतुकीत दिसते.
डिम्पल क्रिएशन : हसल्यावर गालावर पडणारी खळी हे सौंदर्याचेच प्रतीक अनेकांना आपल्या गालावर अशी खळी हवी असते.
स्माइल डिझायनिंग : प्रसन्न हास्य तुमचे व्यक्तिमत्त्वच बदलून टाकते; परंतु दात जर पिवळसर असतील, वेडेवाकडे, पुढे आलेले असतील तर हेच हास्य तुमचा पचका करते. म्हणूनच सध्या स्माइल डिझायनिंगचा ट्रेंड सेट झालाय. अर्थात डेंटिस्टच हे करतात.
बोटॉक्सबोटय़ूलिनपासून एक विशिष्ट औषध तयार करून ते शरीराच्या काही भागांवरील सुरकुत्या घालवण्यासाठी वापरले जाते.या सर्व शस्त्रक्रिया ॲनेस्थेशिया देऊन, तर काही इंजेक्शन देऊन केल्या जातात. काही शस्त्रक्रिया त्वचेचा छोटासा भाग काढून केल्या जातात. काही शस्त्रक्रियांना 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागतो, तर काहींसाठी 3 ते 9, 3 ते 5 सीटिंग आवश्यक असतात.
हे आहेत धोके..कॉस्मेटिक सर्जरी करताना प्रमुख धोका आहे तो रिजेक्शन ऑफ इम्प्लांटचा.. अर्थात ज्या काही नवीन सुधारणा करायच्या आहेत, त्या तुमच्या बॉडीने, स्कीनने न स्वीकारणं. तसेच काही इंद्रियांच्या आतून अथवा बाहेरून असे काही बदल होणं, की ज्यामुळे त्याच्या कार्यप्रणालीत बिघाड होऊ शकतो, ॲलर्जीआणि इन्फेक्शन होणं. वाढते वय, धूम्रपान, दारु पिणे या सवयींमुळे कॉस्मेटिक सर्जरी करताना असणाऱ्या धोक्यात वाढ होत जाते.