Join us  

How to Apply Curd to Hair : केसांना दही लावताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; नाहीतर केस सिल्की, मुलायम होण्याऐवजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2022 12:51 PM

How to Apply Curd to Hair : केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय करत असाल तर त्याची योग्य ती पद्धत माहित करुन घ्या

ठळक मुद्देदही लावल्यानंतर केस स्वच्छ धुवून मगच विंचरावेत त्यामुळे केस सिल्की आणि शायनी होण्यास मदत होते. 

आपले केस सिल्की आणि मुलायम व्हावेत यासाठी आपण केसांना नेहमी काही ना काही लावत असतो. कधी बाजारात मिळणारी महागडी उत्पादने तर कधी घरगुती उपाय. केसांना आहारातून आणि वरुनही चांगले पोषण मिळावे यासाठी आपण हे प्रयत्न करतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या घरात दही आवर्जून असतेच. शरीरासाठी प्रोबायोटीक म्हणून दही जितके उपयुक्त असते तितकेच ते केसांच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त असते. केसांचे कंडिशनिंग करण्यासाठी दह्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. दह्यामध्ये असणारे लॅक्टीक अॅसिड केसांच्या मूळांना पोषण देण्यासाठी उपयुक्त असते. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांत खूप कोंडा झाला असेल, केस गळत असतील किंवा खूप रुक्ष झाले असतील तरी दही लावल्याने या समस्या दूर होतात (Tips For Applying Curd To Hair). पण असे घरगुती उपाय करताना त्याची योग्य ती पद्धत माहित नसेल तर त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे केसांना दही लावत असताना कोणती काळजी घ्यावी याविषयी...

(Image : Google)

१. दह्यात कोणताही घटक मिक्स करताना...

आपण केसांना नुसते दही लावण्यापेक्षा त्यामध्ये मध, लिंबू, अंडे, मेथ्या असे काही ना काही एकत्र करतो. पण आपल्याला केसांची नेमकी कोणती समस्या आहे हे लक्षात घेऊन मगच त्यामध्ये काही मिक्स करायला हवे. केस सिल्की आणि शायनी व्हावे असे वाटत असेल तर दह्यामध्ये अंडे एकत्र करुन हे मिश्रण केसांना लावायला हवे. तुम्हाला केसांत खूप कोंडा झाला असेल तर तो कमी करण्यासाठी दह्यात लिंबाचा रस घातल्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे आपली समस्या लक्षात घेऊन त्यानुसार उपाय करायला हवेत.

२. पॅच टेस्ट करा

त्वचेसाठी कोणतीही गोष्ट नव्याने वापरत असताना पॅछ टेस्ट करणे अतिशय आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे अनेकदा आपल्या त्वचेला एखाद्या गोष्टीमुळे हानी पोहोचण्याची शक्यता असते. दह्यामध्ये असणाऱ्या लॅक्टोजमुळे काहींना खाज येणे, आग होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे असे होण्याआधी डोक्याच्या लहान भागावर थोडे दही किंवा दह्याचे मिश्रण काही अॅलर्जी होत नाही ना हे तपासून मगच असे प्रयोग करायला हवेत. 

३. ताज्या दह्याचा वापर करा

अनेकदा आपण दही लावतो आणि त्याला वास येतो त्यामुळे कोणालाच ते खायला नको असते. मग महिला असे दही फेकून देण्याऐवजी ते केसांना लावतात. मात्र अशाप्रकारे वास येणारे किंवा जुने झालेले दही लावण्यापेक्षा ताजे दही केसांना लावणे केव्हाही चांगले. दह्याला वास येत असेल किंवा ते खूप जुने झाले असेल तर ते वापरु नये, असे दही केसांसाठी आणि डोक्याच्या त्वचेसाठीही ते चांगले नाही. 

(Image : Google)

४. योग्य पद्धतीने केस धुणे आवश्यक 

केसांत दही लावल्यानंतर ते योग्य पद्धतीने धुणे आवश्यक असते. काही महिला दही लावल्यानंतर केस नीट धुवत नसल्याने केस आणि डोके तसेच तेलकट आणि चिकट राहते. इतकेच नाही तर केसांतून दही नीट निघाले नाही तर केसांना एकप्रकारचा कुबट वास येतो. त्यामुळे दही लावल्यानंतर केस स्वच्छ धुवून मगच विंचरावेत त्यामुळे केस सिल्की आणि शायनी होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी