केसांची एखादीच बट पांढरी झाली किंवा पुढचे थोडेसेच केस पांढरे झाले अशा काही ना काही तक्रारी आपल्याला असतात. अशावेळी केस कलर करणे हा त्यावरील सोपा आणि झटपट उपाय असल्याने आपण तोच करतो. पण एखाद्या बटेला किंवा फक्त पुढच्याच केसांना कलर करायचा असेल तर आपण पार्लरमध्ये जाणे टाळतो. घरच्या घरी कोणाकडून तरी हा कलर लावून घेणे किंवा स्वत:च्या हातानेच कलर करणे याला आपण प्राधान्य देतो.
आता घरी कलर करणे म्हणावे तितके अवघड नसते. पण आपल्याला त्यातल्या काही नेमक्या गोष्टी माहित असतील तर हे केसांना कलर करण्याचे काम सोपे आणि चांगले होऊ शकते. पाहूयात केसांना कलर करताना कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात (Tips for Applying Hair Color at Home).
१. कलर लावताना २ आरसे गरजेचे
घरी केसांना कलर करणे आपल्यासाठी नवीन असेल तर मागच्या केसांना कलर करणे आपल्याला थोडे अवघड पडू शकते. आपल्याला मागच्या बाजूचे नीट दिसत नसल्याने याठिकाणचे पांढरे केस तसेच राहण्याची शक्यता असते. अशावेळी पुढे एक आरसा आणि मागच्या बाजूला एक आरसा घेतल्यास कलर करण्याचे काम काही प्रमाणात सोपे होते.
२. त्वचेला कलर लागू नये म्हणून
केसांना कलर करताना अनेकदा आपल्या केसांच्या खाली असलेल्या त्वचेलाही कलर लागतो. इतकेच नाही तर आपल्या कपाळाच्या पुढच्या भागावर, कानापाशीही हा कलर लागतो. केस धुतले तरी हा कलर जातोच असे नाही. त्यामुळे त्याचे डाग काही काळ तसेच दिसतात. असे होऊ नये म्हणून कपाळ, कानाच्या आजुबाजूला, मानेवर थोडी पेट्रोलियम जेली किंवा व्हॅसलीन लावावे, त्यामुळे हा कलर चिकटत नाही.
३. कलर धुण्याता शाम्पूआधी लावा कंडीशनर, कारण..
केसांना कलर लावून झाला की ठराविक वेळाने आपण केस धुतो. त्यावेळी आपण आधी केसांवर पाणी घालतो आणि नंतर त्यांना शाम्पू लावतो. शाम्पू झाल्यावर आपण कंडीशनर लावून केस पुन्हा धुतो. असे न करता हा क्रम थोडा बदलायला हवा. कलर लावलेल्या केसांवर आधी कंडीशनर लावावा. त्यानंतर शाम्पू लावून केस धुवावेत. यामुळे केसांचा पोत तर चांगला राहीलच पण कलरही केसांवर नीट बसण्यास याची मदत होईल.