प्रत्येकाचं आपलं असं एक स्कीन केअर रुटीन असतं. हे रुटीन फॉलो केलं की आपली त्वचा छान राहते हे आपल्याला माहित असतं. त्यामुळे कितीही गडबडीत असलो, बाहेर असलो तरी आपण शक्यतो ही रुटीन चुकवत नाही. स्कीन केअर रुटीन नियमीतपणे व्यवस्थित फॉलो केले तर आपण कायम सुंदर दिसू शकतो. एखाद्या सणाला किंवा समारंभाला जाताना अचानक आपला चेहरा किती खराब झालाय असा ताण आपल्याला येत नाही. त्यामुळे आधीपासूनच आपण आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेतलेली असेल ऐनवेळी चेहरा खराब झाल्यावर आता काय करायचे असा प्रश्न पडणार नाही (Tips for Glowing Skin on Occasion of Dasra).
दसऱ्यासारख्या सणाला आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावं यासाठी आपण काही ना काही प्लॅन करतो. कधी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटस घेतो तर कधी ब्रँडेड उत्पादने वापरुन चेहऱ्यावरचे पिंपल्स, सुरकुत्या आणि डाग झाकण्याचा प्रयत्न करतो. पण य़ा सगळ्यापेक्षाही आपण बाह्य सुंदतरेसोबतच आतून चांगले असलो तर त्याचा आपल्या दिसण्यावर आणि असण्यावर अधिक चांगला परिणाम होऊ शकतो. म्हणूनच प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आपल्याला आतून स्वच्छ होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींविषयी सांगतात.
१. डीटॉक्सिफाय
त्वचा सुंदर राहण्यासाठी किंवा शरीर शुद्ध होण्यासाठी त्याचं डीटॉक्सिफिकेशन होणं अतिशय गरजेचं असतं. आवळा, मंजिष्ठा, हळद आणि कडुलिंब यांमुळे रक्तशुद्धी होण्यास मदत होते. या सगळ्या गोष्टींमुळे रक्तातील टॉक्सिन ओढले जाते आणि त्यामुळे नकळत त्वचा सुद्ध राहण्यास मदत होते.
२. त्वचेचा ओलावा जपा
उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा एरवीही शरीराची शुष्कता कमी करायची असेल तर जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थ आहारात घ्यायला हवेत असे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे त्वचेलाही ओलाव्याची आवश्यकता असून नैसर्गिक पद्धतीने हा ओलावा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोरफडीच्या गराचा यासाठी अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच त्वचेची विविध कारणाने होणारी जळजळ किंवा आग कमी होण्यासही कोरफडीच्या गराचा फायदा होतो.
३. तेलाने मसाज
इव्हीनिंग प्राईमरोज ऑईलमध्ये ओमेगा ६ फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे या तेलाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेचा कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते. इतकेच नाही तर त्वचेवर एकप्रकारचा ग्लो येण्यासही याचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचा सॉफ्ट दिसण्यास मदत होते आणि एकूणच त्वचेचा पोत सुधारतो.