Join us  

Tips for hair strietning : केस स्ट्रेटनिंग करायचं ठरवताय? निर्णय घेण्यापूर्वी लक्षात घ्या ३ गोष्टी..नाहीतर केसांचे वाटोळे नक्की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 1:08 PM

Tips for hair strietning : कुरळे किंवा बाऊन्सी केस असलेल्यांना केस सरळ करायचे असतात. पण स्ट्रेटनिंग करणे ही जशी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे तशीच केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ही महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा स्ट्रेटनिंग करताना लक्षात ठेवायलाच हव्यात अशा गोष्टी...

ठळक मुद्देतुम्हाला केसांशी निगडीत काही समस्या आहेत का याबाबत योग्य ती माहिती दिलेली केव्हाही चांगली त्यामुळे स्टायलिस्टला ट्रीटमेंट करणे सोपे जाईल. प्रॉडक्ट, येणारा खर्च, लागणारा वेळ, नंतरची काळजी घेण्याची पद्धत याबाबत योग्य ती माहिती घेऊन मगच स्ट्रेटनिंगची ट्रीटमेंट घेतलेली केव्हाही चांगली.  

ज्यांचे केस कुरळे असतात त्यांना सरळ केस आवडतात आणि ज्यांचे सरळ असतात त्यांना कुरळे आवडतात. पूर्वी आपले केस जसे आहेत तसे आवडून घेण्याशिवाय पर्याय नव्हता पण आता तंत्रज्ञानाच्या साह्याने सरळ केसांना कुरळे करण्याची आणि कुरळ्या केसांना सरळ करण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही केसांची स्टाईल करु शकता. ज्यांचे केस कुरळे किंवा थोडे बाऊन्सी आहेत त्यांनी केस सरळ करुन घेण्याचे फॅड सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये स्ट्रेटनिंग, रिबाऊंडनींग, केरेटीन अशा बऱ्याच वेगवेगळ्या ट्रीटमेंटस केसांवर केल्या जातात (Tips for hair strietning) .

केस सरळ केल्यामुळे त्यांची चमक वाढते, सिल्की असल्यासारखे दिसतात आणि कोरडेपणा कमी होतो असे आपल्याला वाटते. तसेच स्ट्रेटनिंग केल्यानंतर केसांना फारसा मेंटेनन्स लागत नाही म्हणून सध्या बऱ्याच तरुणींची स्ट्रेटनिंगला पसंती असल्याचे दिसते. पण अशाप्रकारे केसांवर रासायनिक ट्रीटमेंटस केल्याने नेमके काय नुकसान होते (Hair care tips) हे समजून घेणे आवश्यक आहे. पाहूयात स्ट्रेटनिंग करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याविषयी...

(Image : Google)

१. केमिकल्समुळे केस कमकुवत होतात, त्यामुळे त्याबाबत योग्य ती माहिती घ्या

केसांचा नैसर्गिक आकार किंवा पोत बदलायचा असेल तर त्यावर केमिकल्सचा भडीमार केला जातो. ही केमिकल्स आपल्या केसांना झेपतातच असे नाही. त्यामुळे केसांची वाट लागण्याची शक्यता असते. सुरुवातीला जरी स्ट्रेटनिंग केल्यावर केस खूप छान मुलायम किंवा चमकदार दिसले तरी नंतर मात्र केसांचा पोत बिघडतो आणि केस होते त्याहून वाईट होतात.

२. विश्वास असलेल्या चांगल्या सलूनमध्येच ट्रीटमेंट घ्या

सध्या बाजारात पार्लरींग किंवा स्टायलिंग करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. पण आपण नियमित ज्याठिकाणी जातो अशा आपल्या ओळखीच्या ठिकाणीच महागडी आणि आपल्या सौंदर्याशी निगडीत असलेली ट्रीटमेंट घेतलेली केव्हाही चांगली. कारण अनेकदा अशाप्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये कोणत्या प्रकारची प्रॉडक्ट वापरली जात आहेत, त्यामुळे आपल्या केसांची काय हानी होऊ शकते याबाबत आपल्याला माहित नसते. त्यामुळे प्रॉडक्ट, येणारा खर्च, लागणारा वेळ, नंतरची काळजी घेण्याची पद्धत याबाबत योग्य ती माहिती घेऊन मगच स्ट्रेटनिंगची ट्रीटमेंट घेतलेली केव्हाही चांगली.  

(Image : Google)

३. स्टायलिस्टला तुमच्या केसांचा पोत, इतिहास याबाबत माहिती द्या

आपण केसांवर याआधी कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या आहेत का की आपण पहिल्यांदाच अशाप्रकारच्या ट्रीटमेंटस घेणार आहोत याबाबत स्टायलिस्टला माहिती द्यायला विसरु नका. याबरोबरच तुमच्या केसांचा पोत नेमका कसा आहे, तुम्हाला केसांशी निगडीत काही समस्या आहेत का याबाबत योग्य ती माहिती दिलेली केव्हाही चांगली त्यामुळे स्टायलिस्टला ट्रीटमेंट करणे सोपे जाईल. तुम्हाला कोणत्या गोष्टीची अॅलर्जी असेल तर तेही स्टायलिस्टला सांगा जेणेकरुन तुमच्या केसांना किंवा त्वचेला, डोळ्यांना ट्रीटमेंटनंतर कोणताही त्रास होणार नाही.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी