व्हॅक्सिंग ही सध्या अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. कधी पार्लरमध्ये जाऊन तर कधी घरात कोणाच्या मदतीने आपण हाता-पायांवर असणारे केस काढण्यासाठी व्हॅक्सिंग करतो. यामध्ये हॉट व्हॅक्स, कोल्ड व्हॅक्स, चॉकलेट व्हॅक्स यांसारखे बरेच प्रकार असतात. अंगावर असणारे नैसर्गिक केस काढताना त्रास तर होतोच. पण काहींची त्वचा इतकी नाजूक असते की अनेकींना व्हॅक्सिंगनंतर हाता-पायावर रॅशेस येणे, लाल होणे, बारीक पुरळ येणे अशा समस्या निर्माण होतात. (Tips For Post Waxing Care) त्वचेला नेहमीपेक्षा वेगळा ताण पडल्याने त्वचा अशाप्रकारे प्रतिक्रिया देत असते. अशावेळी त्वचा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आणि त्वचेला आलेला ताण घालवण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत हे समजून घ्यायला हवे.
१. कोरफड
कोरफड ही थंडावा देणारी एक नैसर्गिक मॉइश्चरायजर आहे. ताज्या कोरफडीचा गर आणि त्यामध्ये कॅलेंड्युला ऑईल घाला. या तेलात असणारे अँटीऑक्सिडंट त्वचेचा दाह कमी करण्यास मदत करते. हात स्वच्छ धुवून व्हॅक्सिंग झाल्यावर हाता-पायांना ज्याठिकाणी इरिटेशन होत आहे तिथे हे मिश्रण लावा. काही वेळ तसेच ठेवून वाळू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने हात धुवा आणि नेहमीचे मॉईश्चरायजर लावा. यामुळे त्वचेला व्हॅक्सिंगमुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.
२. बर्फाचा शेक किंवा कूल कंप्रेसर
हल्ली बाजारात हाडांना सूज आल्यावर लावण्यासाठी एक जेलची बॅग मिळते. ही बॅग साधारणपणे आपल्याकडे असतेच. ही बॅग एका टॉवेलमध्ये गुंडाळून त्याने हात आणि पायाला शेका. अशी बॅग नसेल तर चक्क बर्फ एका जाडसर टॉवेलमध्ये गुंडाळून तो हाता-पायांवर चोळा. त्यामुळे लालसरपणा, आग आणि फोडांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
३. काकडी
काकडी ही थंड असते, तसेच त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट त्वचेला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे व्हॅक्सिंगनंतर काकडीच्या फोडी त्वचेवर लावल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. काकडीचे काप करुन व्हॅक्सिंग करायच्या आधीच ती फ्रिजमध्ये ठेवून द्या. काकडीचे काप ठेवण्याबरोबरच काकडीची पेस्ट करुन ती त्वचेवर लावल्यास त्याचाही थंडावा मिळण्यासाठी चांगला फायदा होतो.
४. अॅपल सायडर व्हिनेगर
दाह होणाऱ्या त्वचेसाठी अॅपल सायडर व्हिनेगर अतिशय चांगले काम करते. व्हॅक्सिंगनंतर आंघोळ करणार असाल तर आंघोळीच्या पाण्यात हे व्हिनेगर टाकायचे. त्यामुळे त्वचेची आग कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर कापसावर हे व्हनेगर घेऊन ते त्वचेला सगळीकडे लावल्यास त्वचेचा दाह कमी होण्यास मदत होते.
५. दूध किंवा दही
दूध आणि दही हे थंड प्रकृतीचे पदार्थ असल्याने त्वचेची आग कमी करण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. कापसावर गार दूध घेऊन ते लाल झालेल्या किंवा आग होणाऱ्या ठिकाणी लावले तर त्यामुळे त्वचेचा दाह कमी होण्यास मदत होते. तसेच दह्यात प्रोबायोटीक गुणधर्म असल्याने त्वचेच्या समस्यांसाठी दहीही अतिशय उपयुक्त ठरते. हातावर ज्याठिकाणी फो़ड, रॅश आले असतील अशाठिकाणी दही लावून ठेवावे. ते वाळले की गार पाण्याने धुवून टाकावे आणि मग त्यावर मॉइश्चरायजर लावावा.