लिपस्टिक ही आता मेकअपचा भाग राहीली नसून रोज लावण्याची गोष्ट झाली आहे. बाहेर जाताना, ऑफीसला जाताना किंवा एखाद्या समारंभाला जाताना आपण आवर्जून लिपस्टिक लावतो. लिपस्टीकमुळे आपल्या ओठांचा भाग उठून दिसतो. स्वत:वर वेगवेगळे प्रयोग करणं आवडणाऱ्या महिला कधी वेगळ्या रंगाची लिपस्टिक ट्राय करतात तर कधी आयलायनर. यातही आपण कधी फिकट लिपस्टिक वापरणे पसंत करतो तर कधी गडद रंगाची. गडद लिपस्टिक चांगली दिसत असली तरी लावताना आपल्यावर कितपत खुलेल, ती कशी लावायला हवी, ओठांवर गडद रंग लावताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी माहिती असणे आवश्यक आहे (Tips For Using Dark Lipstick).
केवळ आवड म्हणून आपण काहीतरी लावायचो आणि त्यामुळे आपलं सगळ्यांमध्ये हसं व्हायचं असं नको व्हायला. प्रत्येक लिपस्टीकच्या शेडचा आपला असा एक ग्रेस असतो. त्यामुळेच ती लिपस्टीक आपण योग्य पद्धतीने कॅरी करणे महत्त्वाचे असते. गडद रंगाची लिपस्टीक आपल्याला थोडा बोल्ड लूक देते. त्यामुळे अशाप्रकारची लिपस्टिक आपण एखादी पार्टी किंवा फंक्शनमध्ये लावू शकतो. औपचारीक ठिकाणी म्हणजेच ऑफीस, बिझनेस मिटींग अशाठिकाणी गडद लिपस्टिक लावणे टाळायला हवे.
१. आपण लावत असलेली लिपस्टिक गडद असेल तर आपल्या चेहऱ्याचा इतर मेकअप आपण बॅलन्स करायला हवा. म्हणूनच मेकअप करताना आपण लावत असलेल्या सगळ्या गोष्टी एकमेकांना मॅच करतील अशाच निवडायला हव्या, नाहीतर सगळ्या मेकअपचाच विचका होण्याची शक्यता असते.
२. आपण जेव्हा ग़डद रंगाची लिपस्टिक लावतो तेव्हा आपल्याला आपले ओठ हायलाईट करायचे असतात. लिपस्टिक लावण्याआधी ओठ फाटले असतील किंवा कोरडे झाले असतील तर स्क्रबरच्या साह्याने ते एकसारखे करुन घ्यावेत. त्यानंतर ओठांना मॉईश्चरायजर लावावे. हे सगळे झाल्यावरच लिपस्टिक लावायला हवी.
३. गडद रंगाची लिपस्टिक लावताना ओठांना त्या शेडच्या जवळ जाणाऱ्या लायनरने आऊटलाईन करणे अतिशय आवश्यक आहे. कारण लायनर न लावता लिपस्टिक लावली तर आपल्या ओठांचा आकार खराब दिसण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर आपल्या ओठांमधून लिपस्टिक वाहत आहे किंवा बाहेर येत आहे असे वाटते.
४. गडद लिपस्टिक लावताना आपण डोळ्यांचा मेकअप अतिशय लाईट किंवा न्यूड ठेवायला हवा. अशावेळी आपण संध्याकाळच्या एखाद्या कार्यक्रमाला जात असाल तरी डोळ्यांना ग्लिटरी आय शॅडो, आय लायनर लावणे टाळा. तसेच एकूण चेहऱ्यालाही कमीत कमी मेकअप करा, त्यामुळे तुमचा लूक सोबर दिसेल. ५. तुमच्या ओठांचा आकार जास्त मोठा असेल तर तुम्ही गडद रंगाची लिपस्टिक लावणे टाळायला हवे. कारण त्यामुळे आपले ओठ आणखीनच विचित्र दिसू शकतात. तसेच दिवसा शक्यतो गडद रंगाची लिपस्टिक लावणे टाळलेले केव्हाही चांगले. रात्रीच्या एखाद्या पार्टीला आपण गडद रंगाच्या कपड्यांवर गडद लिपस्टिक नक्की कॅरी करु शकतो.