कामाच्या घाईत मधेच एखाद्या विशेष कार्यक्रमाला जावं लागतं. अशा वेळेस कपडे, दागिने यांची निवड करणं सहज होतं. पण चेहेर्याचं काय करायचं हा प्रश्न उरतोच. चेहेर्यावरचं तेज गेलेलं असतं, थकलेल्या चेहेर्यावर वयाच्या खुणाही डोकावत असतात. मेकअपचा पर्याय हाताशी असतो, पण चेहेर्याची त्वचा जर खूपच खराब झालेली असेल तर मेकअपही खूप काही चांगला परिणाम करु शकत नाही. पार्लरमधे जाऊन काही जुजबी उपाय करण्याइतका वेळही हाताशी नसेल तर मूड जाऊ न देता एक उपाय करावा. स्वयंपाकघरात जावं. फ्रिज उघडावा आणि त्यातून एक टमाटा बाहेर काढावा.
Image:- Google
आता या टमाट्यानं काय होणार?असा प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे टमाट्याच्या सहाय्याने चेहेर्यावरची हरवलेली चमक परत येते. चेहेरा फ्रेश होतो. याच टमाट्याचा उपयोग चेहेर्यावरच्या वयाच्या खुणा घालवण्यासाठीही करता येतो.
टमाटा अर्धा चिरुन तो चेहेर्यावर घासल्यास त्वचा एक्सफोलिएट होते, चेहेर्यावरची मृत त्वचा निघून जाते, खराब झालेली त्वचा स्वच्छ होते. चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्यांचे डाग असतील तर ते घालवण्यासाठी, त्वचा निरोगी करण्यास,सैल त्वचा घट्ट करण्यास टमाट्याचा खूप उपयोग होतो. काळवंडलेला चेहेरा उजळवण्यासाठी, उन्हानं त्वचेवर आलेला काळेपणा घालवण्यासाठी चेहेर्यावर टमाटा लावणं फायदेशीर ठरतं.
Image:- Google
त्वचेसाठी टमाटा फायदेशीर का?
टमाट्यात असलेल्या ब जीवनसत्त्वात अँण्टि एजिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म चेहेर्यावरच्या सुरकुत्या, डोळ्याखालची काळी वर्तुळं, घालवतात. टमाट्यामुळे त्वचेखाली कोलॅजन निर्मितीला प्रोत्साहन मिळतं. कोलॅजन हे त्वचेतील प्रथिनं आहे जे त्वचेचा पोत सुधारण्यास, त्वचा तरुण ठेवण्यास उपयोगी असतं. टमाटा चेहेर्याला लावून त्वचेस जो ओलावा मिळतो त्यामुळे त्वचा मऊ मुलायम होते. चेहेर्याचा रंगही उजळतो.
चेहेर्याला टमाटा कसा लावावा?
1. टमाटा धुवून त्याचे दोन भाग करावेत. चिरलेला टमाटा चेहेर्यावर घासावा. किंवा टमाट्यामधे इतर गोष्टी मिसळून त्याचा लेप करुन चेहेर्यावर लावावा. जर त्वचा तेलकट असेल तर टमाट्याचा रस घ्यावा. त्यात दोन चमचे मुलतानी माती आणि एक चमचा गुलाब पाणी घालावं. हा लेप चेहेर्याला लावून तो 15 मिनिटं ठेवावा. चेहेरा धुताना हात ओले करुन त्याने चेहेरा स्क्रब कातो त्यापध्दतीने हळूवार घासावा आणि पाण्यानं चेहेरा धुवावा. टमाट्याच्या रसात थोडं बेसन घालूनही पॅक तयार करता येतो. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं.
2. त्वचा जर कोरडी असेल तर टमाटा किसणीने किसून घ्यावा. किसलेल्या टमाट्यात तीन चार थेंब बदामाचं तेल आणि एक छोटा चमचा दही घालावं. लेप जरा दाटसर करण्यासाठी यात थोडं मसूर डाळीचं पीठ किंवा बेसन घालावं. हा लेप आठवड्यातून किमान तीन वेळा पंधरा मिनिटं चेहेर्याला लावून ठेवावा. टमाट्याच्या या उपायानं कोरडी त्वचाही चमकदार होते.
Image: Google
3. एकदम पिकलेला लाल टमाटा घ्यावा. एक चमचा टमाट्याचा रस आणि एक चमचा काकडीचा रस घ्यावा. या रसात थोडे ओटस घालावेत. हे मिश्रण नीट मिसळून घेऊन ते चेहेर्यावर लावावं. चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या असल्यास टमाट्याचा हा लेप खूप परिणामकारक ठरतो.
4. टमाट्याचा रस घ्यावा. त्यात खोबर्याचं तेल आणि दही घालावं. हा लेप चेहेर्यास लावावा. पंधरा मिनिटांनी चेहेरा साध्या पाण्यानं धुवावा. यामुळे चेहेर्यावर ओलावा निर्माण होतो.