Join us  

‘आज’ आपण खरंच मनापासून जगतो का? उद्याची आशा, कालची निराशा यामध्ये जगणं राहून गेलं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 6:51 PM

आज आपण जिवंत आहोत ही आनंदाची गोष्ट आहे, हेच आपल्या कधीच का लक्षात येत नाही? -प्रभात पूष्प

ठळक मुद्देआपल्याला रोज मिळणाऱ्या आजच्या भेटीचा मान ठेवायचा.

अश्विनी बर्वे

एखादी वस्तू कोणी आपल्याला दिली आणि त्या मागचे हृद्य आपल्याला ओळखता आले तर ती वस्तू एक आठवणीत राहील अशी  भेट ठरते. मग ती एखादी साधी वस्तू का असेना? पण वस्तू देण्यामागच्या भावना आपल्याला समजल्या नाहीत तर ती निव्वळ एक वस्तू राहते. भेट देणं आणि भेट घेणं यामागे खरी असते ती भावना. आठवून पाहा बालपणात मिळालेले एखादे पेन ही आपल्यासाठी महत्वाची  भेट वाटते. आपल्या पालकांनी, शिक्षकांनी, मित्रमांनी जे मनापासून भेट दिले त्यामागची भावना आपल्याला कळते. मोठं झाल्यावर जास्त अमूल्य वाटते. आपल्याला मिळालेली भेट ही केवळ वस्तू नसते तर, एक दृष्टीकोन असतो ,ज्याने त्या वस्तू मागच्या मनाकडे, भावनांकडे बघता येते.

(Image : google)

याच नजरेनं विचार केला तर आपला ‘आज’ ही आपल्याला मिळालेली भेट आहे. जी काही काळ असते मग भूतकाळ होते. आज ही अशी एक मौल्यवान भेट आहे, जी केवळ आपल्याला एका नैसर्गिक शक्तीकडूनच मिळते किंवा तीच शक्ती तुम्हांला सांगते की तुम्ही “काल” जिवंत होता. काल झोपलेला प्रत्येकजण आज सकाळी उठतोच असं नाही. आपण आज उठतो म्हणजेच आपल्याला मिळालेल्या त्या मौल्यवान २४ तासांच्या मागील निसर्गाचे हृद्य ओळखा. भेटवस्तूचा दुरुपयोग करणे म्हणजे ती भेट देणाऱ्याशी गैरवर्तन करण्यासारखे आहे. तेव्हा विचारा स्वत:ला आपण आजचे काय करतो?आपला आज ही आपल्याला निसर्गाने, नियतीने, देवाने तुम्ही ज्यावर श्रद्धा ठेवता त्यानं दिलेली जर भेट असेल तर आपण ती मनापासून स्वीकारतो का?आपण झडझडून कामाला लागतो का? आपण त्यातून काहीतरी सुंदर घडवतो का?हे प्रश्न आपण आपल्याला विचारायचे. आपल्याला रोज मिळणाऱ्या आजच्या भेटीचा मान ठेवायचा.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

टॅग्स :मानसिक आरोग्य