गणपती आणि गौरी काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत. एकीकडे डेकोरेशन, बाप्पाचा नैवेद्य या सगळ्याचे प्लॅनिंग सुरू असतानाच सणावाराला आपण छान दिसायला हवे असेही प्रत्येकीला वाटते. घरातली कामं, बाहेरची कामं, प्लॅनिंग, पाहुणेरावळे या सगळ्यामध्ये महिलांना पार्लरमध्ये जायला वेळ मिळतोच असे नाही. अशावेळी घरच्या घरीच काही सोपे उपाय करुन आपल्याला सौंदर्य खुलवण्याची वेळ येते. एरवी आपण फेस क्लिनिंग किंवा फेशियल करण्यासाठी पार्लरमध्ये जातो. पण आता वेळ नसल्याने घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून आणि नैसर्गिक पद्धतीने फेशियल कसे करता येईल पाहूया. यामध्ये आपण प्रामुख्याने टोमॅटोचा वापर करत असून चेहऱ्यावर ग्लो येण्यास या फेशियलचा अतिशय चांगला फायदा होतो. पाहूया हे फेशियल कसे करायचे (Tomato Facial At Home for glowing face)...
१. स्क्रब
टोमॅटो स्क्रबर म्हणून वापरण्यासाठी तो अर्धा कापायचा आणि त्याला साखर लावून तो चेहऱ्यावरुन सगळीकडे चांगला फिरवायचा. यामुळे त्वचेवरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते.
२. मसाज
स्क्रब झाल्यानंतर चेहऱ्याला चांगला मसाज करण्यासाठी टोमॅटोचा एक स्लाईस घ्यायचा आणि त्यावर मध घालायचा. हा स्लाईस चेहऱ्यावरुन सगळीकडे बराच वेळ फिरवायचा. यामुळे चेहऱ्याला मस्त ग्लो येण्यास मदत होते. मसाजनंतर चेहरा न धुता तसाच ठेवायचा.
३. फेस पॅक
पार्लरमध्ये आपल्या चेहऱ्याला ज्याप्रमाणे एखादा पॅक लावतात त्याचप्रमाणे आपण घरीही पॅक लावणार आहोत. यासाठी टोमॅटोवर कॉफी पावडर लावायची आणि ती चेहऱ्याला सगळीकडे चांगली चोळायची. हे मिश्रण साधारण १० मिनीटे चेहऱ्यावर ठेवायचे आणि मग चेहरा पाण्याने स्वच्छ धुवायचा.
अवघ्या ३ स्टेप्समध्ये आणि कमीत कमी पदार्थ वापरुन झटपट होणारे हे फेशियल तुम्ही घरी नक्की ट्राय करा. यामुळे ऐन सणावाराला चेहरा मस्ता ग्लोईंग दिसण्यास नक्कीच मदत होईल. तसेच हे सगळे पदार्थ नैसर्गिक असल्याने त्याचा त्रास होण्याचीही शक्यता नाही. मात्र तुम्हाला यातील कोणत्या पदार्थाची अॅलर्जी असेल तर मात्र हे फेशियल करणे टाळलेलेच केव्हाही चांगले.