टाचा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग पण नेहेमीच दुर्लक्ष केला जाणारा. एरवी नखांच्या सौंदर्याचाही बारीक विचार करणारे टाचांच्या नीटनेटकेपणाकडे मात्र दुर्लक्ष करतात. टाचांना भेगा पडतात, टाचा अगदी फाटतात तरी त्यावर उपाय करण्याऐवजी त्या झाकण्याचा प्रयत्न केला जातो. आपण वरुन कितीही छान राहाण्याचा आणि दिसण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या टाचा जर भेगाळलेल्या आणि फाटलेल्या असतील तर मग सौंदर्यासाठीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. सौंदर्य केसांपासून पायांच्या नखांपर्यंत नाही तर टाचांपर्यंत पाहिलं जावं आणि जपलं जावं. टाचा सुंदर दिसण्यासाठीचा महत्त्वाचे नियम म्हणजे त्या फाटलेल्या नसाव्यात, टाचांना भेगा पडलेल्या नसाव्यात आणि टाचा अस्वच्छ नसाव्यात. आता तर पावसाळा आलाय,तेव्हा टाचांचं आरोग्य प्रामुख्यानं जपायला हवं. ते जपलं की टाचा बऱ्या होतील आणि सुंदरही दिसतील!
टाचांना भेगा का पडतात?
टाचांना भेगा या पायांचं सौंदर्य खराब करतात. शिवाय त्या जर जास्त प्रमाणात पडल्या असतील किंवा त्या फाटल्या असतील तर त्या दुखतातही. चालण्यासही त्रास होतो. टाचांना भेगा का पडतात हा प्रश्न पडतो? त्याचं सोपं उत्तर म्हणजे आपण जे चुकीचं खातो पितो त्याचा परिणाम टाचांवरही होतो आणि टाचा फाटतात. आहारातून शरीरास इ जीवनसत्त्वं, कॅल्शिअम आणि लोह गेलं नाही तर त्याची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून टाचांना भेगा पडतात किंवा टाचा फाटतात. त्यामुळे टाचांवर केवळ सौंदर्योपचार करुन भागत नाही तर खाण्यापाण्याची पथ्यंही पाळावी लागतात.
टाचांना मऊ मुलायम करण्यासाठी
टाचांना कॉस्मेटिक्स वापरुन चांगलं ठेवायचं असेल तर बोरोप्लस हे कॉस्मेटिक क्रीम लावावं. टाचांना भेगा असतील तर रोज रात्री आधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत आणि मग त्यावर हलक्या हातांनी क्रीम लावावं. हा उपचार नियमित केल्यास भेगा जातात. शिवाय घरातही पायात स्लीपर असू द्यावी म्हणजे टाचा फाटत नाहीत.
- ऑलिव्ह तेलाचा वापरानं टाचांची त्वचा मऊ होते. आठवड्यातून तीन वेळा ऑलिव्ह तेल हलक्या हातानं मसाज करत लावावं. या उपायानं काहीच दिवसात टाचा मऊ होतात.
- टाचांच्या भेगा घालवण्याचे उपाय करणं म्हणजे टाचांचं सौंदर्य जपणं नव्हे. टाचांची नियमित स्वच्छता करणंही गरजेचं आहे. यासाठी आठवड्यातून दोन वेळेस टाचा स्क्रबरने घासून व्यवस्थित स्वच्छ करायला हव्यात. पण म्हणून स्क्रबरने थेट टाचा घासू नये. आधी कोमट पाण्यात थोडं मीठ घालावं. या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. एक दहा मिनिटं तसं बसून राहिलं तर टाचा मऊ होतात. आणि मग स्क्रब ब्रश किंवा दगड यांच्या सहाय्यानं टाचा हलक्या हातानं घासाव्यात. टाचांवरचा मळ, घाण लगेच निघून जाते. पाय कोरडे पुसून घ्यावेत. आणि सर्वात शेवटी टाचांना खोबऱ्याचं तेल लावावं. या उपायानं टाचा स्वच्छ होतात आणि मुलायमही होतात.
- धुळीमुळे टाचांना भेगा पडतात. यासाठी रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवावेत. आणि मग लिंबाचा रस आणि साय एकत्र करुन ते मिश्रण टाचांना लावावं, हा उपाय् रोज केल्यानं भेगा जातात.
- तांदळाच्या पिठात स्क्रबचे गुणधर्म असतात. टाचांसाठी तांदळाच्या पिठाचं स्क्रब करताना एका भांड्यात तीब चमचे तांदळाच पीठ, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यावा. हे सर्व साहित्य नीट एकत्र करुन घ्यावं. आणि मग हे स्क्रब हलक्या हातानं घासत टाचांना लावावं. जर टाचा खूपच फाटलेल्या असतील तर पंधरा मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसावं. यामुळे भेगा मऊ पडतात आणि स्क्रबनं लवकर स्वच्छ होतात.
- जवाचं पीठ आणि थोड जोजोबा ऑइल घ्यावं. अंदाजे प्रमाण घ्यावं. आणि मग हे मिश्रण टाचांना लावावं. अर्ध्या तासासाठी हा लेप टाचांवर ठेवावा. आणि मग थंड पाण्यानं पाय धुवावेत. हा उपाय काही दिवस नियमित केल्यास टाचांच्या भेगा लवकर बऱ्या होतात.
- ग्लिसरीन आणि गुलाब पाणी यांचं मिश्रण एका बाटलीत भरुन रोज त्याचा उपयोग करु शकतो. यासाठी अर्धा बाटली गुलाब पाणी अर्धा बाटली ग्लिसरीन घ्यावं. यात थोडा लिंबाचा रस टाकावा. आणि हे मिश्रण बाटलीचं झाकण बंद करुन चागलं हलवून घ्यावं. रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून कोरडे करुन बाटलीतल्या मिश्रणानं टाचांना हलकी मसाज करत लावावं.
- रात्री झोपण्यापूर्वी एक मोठा चमचा खोबऱ्याचं तेल घ्यावं. ते थोडं गरम करुन घेतलं तरी चालतं. मग या तेलाचा मसाज तळपायांना करावी. आणि मग पायात सॉक्स घालून झोपावं. सकाळी उठल्यावर पाय पाण्यानं स्वच्छ धुवावेत. सलग दहा दिवस हा उपाय केल्यास टाचा नरम होतात. या उपायानं थकवाही कमी होतो.
- मध हे उत्तम मॉश्चरायझरही आहे. पायाची त्वचा आर्द्र ठेवण्यासोबतच तेथील त्वचेचं पोषणही मध करतं. यासाठी पाण्यात एक अर्धा कप मध घालावं. आणि त्या पाण्यात पाय बुडवून किमान वीस मिनिट बसावं. पाण्यातून पाय बाहेर काढल्यावर मऊ रुमालानं पाय कोरडे करुन घ्यावेत. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास टाचांवर चांगले परिणाम दिसतात.
- पिकलेलं केळ घ्यावं. ते कुस्करावं आणि मग ते टाचांवर लावावं. १५ मिनिटं ते तसंच राहू द्यावं आणि मग पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.
- एक मूठभर कडूलिंबाची पानं घ्यावीत. ती वाटून त्याची पेस्ट करावी. त्यात तीन चमचे हळद टाकून चांगली मिसळून घावी. टाचांना जिथे भेगा पडलेल्या आहेत तिथे ते लावावं. अर्धा तास ते तसंच ठेवून मग गरम पाण्यानं पाय धुवावेत आणि कोरडे करुन घ्यावेत.
- व्हॅसलीनद्वारेही टाचांच्या भेगांचा उपाय होवू शकतो. कारण व्हॅसलीनमुळे त्वचेचं मॉश्चरायझिंग चांगलं होतं. म्हणून पायांच्या भेगांसाठीही त्याचा उपयोग करता येतो. टाचांना रात्री व्हॅसलीन लावण्याआधी पाय गरम पाण्यानं धुवावेत. आणि मग कोरडे करुन नंतर व्हॅसलीन लावावं आणि पायात सॉक्स घालून झोपावं.
- टाचांच्या भेगा लवकर भरुन येण्यासाठी कोरफड जेलचा उपयोग प्रभावी ठरतो. यासाठी रात्री पाय धुवावेत. ते कोरडे करुन टाचांना कोरफड जेल लावावी. सॉक्स घालून झोपावं. हा उपाय नियमित केल्यास भेगा लवकर भरुन येतात.