डोक्यावर लांबसडक केस हवेत पण हेच केस चेहऱ्यावर असले की मात्र वैताग येतो. सौंदर्यात अडथळा ठरणारे हे चेहऱ्यावरचे केस काढले नाहीत तर वाईट दिसतात. यामुळे विनाकारण तुम्ही आहे त्यापेक्षा आणखी सावळे दिसता. अशाप्रकारे चेहऱ्यावर केस असण्याची अनेक कारणे आहेत. अनुवंशिकता, हार्मोनमधील असंतुलन, गर्भनिरोधक औषधे, मेनोपॉज, सौंदर्यप्रसाधनांचा चुकीचा वापर आणि औषधांचे दुष्परिणाम यांचा त्यात समावेश होतो. केस असलेल्या चेहऱ्यावर सौंदर्यप्रसाधने लावायलाही अडचणी येतात. चारचौघात हे केस दिसतील याची लाज वाटते आणि मग त्यासाठी सतत पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग नाहीतर व्हॅक्सिंग करावे लागते. काही वेळा हे केस लपवण्यासाठी ब्लिचही केले जाते. पण यामध्ये असणाऱ्या रसायनांचा चेहऱ्यावर परीणाम होऊन त्वचेला त्याचा त्रास होऊ शकतो.
चेहऱ्वरील या केसांचे प्रमाण जास्त असते तर लेझर उपचार घेणाऱ्यांचेही प्रमाण सध्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण हे सगळे काम वेळखाऊ आणि आर्थिक ताण आणणारे आहे. एखादवेळी घाईने कुठे जायचे असेल आणि पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर मात्र चांगलीच अडचण होऊन बसते. अशावेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही ही समस्या दूर करु शकता. नैसर्गिक गोष्टींच्या वापरामुळे चेहऱ्यालाही कोणता त्रास होण्याची शक्यता नसते. तसेच तुमचे पैसे वाचायलाही याची मदत होते. आता घरच्या घरी काय केल्याने चेहऱ्यावरील केस निघण्यास मदत होते पाहूया...
साखर आणि लिंबू
१. एका वाटीत एक चमचा साखर घेऊन त्यात थोडे पाणी घाला
२. साखर विरघळल्यानंतर त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला
३. कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत तिथे लावा.
४. २० ते ३० मिनिटे चेहरा तसाच ठेवा, त्यानतंर गार पाण्याने चेहरा धुवा.
५. हा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करा. त्यामुळे चेहऱ्यावरील केस कमी होण्यास मदत होईल.
६. लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्यास काही वेळा जळजळ होऊ शकते, त्यामुळे आधी हे मिश्रण हातावर लावून पाहा आणि मगच चेहऱ्यावर लावा.
७. लिंबात सी व्हीटॅमिन असल्याने चेहऱ्यावर टॅनिंग असेल तर ते कमी होण्यासही मदत होते.
बेसन, दूध आणि हळद
१. दोन चमचे बेसन पीठ घेऊन त्यात थोडी हळद आणि कच्चे दूध एकत्र करा.
२. ही जाडसर पेस्ट चेहऱ्यावर एकसारखी लावा.
३. २० ते ३० मिनीटे हा मास्क चेहऱ्यावर तसाच ठेवा.
४. वाळल्यानंतर हा मास्क हाताने रगडून काढा, पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
५. बेसन पीठ थोडेसे जाडसर असेल तरी चालेल, जेणेकरुन चेहऱ्यावरील केस निघून येण्यास मदत होऊ शकेल.
६. दूधाबरोबरच सायीचा उपयोग केला तरीही चालेल म्हणजे चेहरा मुलायम होण्यास मदत होईल.
बटाटा आणि मसूर डाळ
१. मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करा.
२. बटाटा उकडून किसून स्मॅश करा, त्याची पेस्ट तयार होईल.
३. या दोन्ही पेस्ट एकत्र करुन त्याच एक चमचा मध आणि लिंबू घाला.
४. चेहऱ्यावर हे मिश्रण एकसारखे लावा.
५. १५ ते २० मिनिटांनी हे पूर्णपणे वाळल्यावर चेहरा कापडाने किंवा पाण्याने स्वच्छ करा.
६. हे आठवड्यातून दोन ते तीनवेळा केल्यास चेहऱ्यावरील केस कमी होण्यास मदत होईल.