Join us  

बेसन-हळद-दह्याचं पारंपरिक उटणं, कॉस्मेटिक पेक्षा बेस्ट! अभिनेत्री जुही परमार म्हणते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 6:33 PM

कोणत्याही काॅस्मेटिक्सपेक्षा बेसन-हळद-दह्याचं पारंपरिक उटणं आहे बेस्ट. अभिनेत्री जुही परमारचाही आहे याच उटण्यावर विश्वास

ठळक मुद्दे त्वचेचे लाड करुन त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी बेसन हळद दह्याचं पारंपरिक उटणं प्रभावी आहे. 

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा असेल तर काॅस्मेटिक्सच्या मागे पळण्यात काहीच अर्थ नाही. जुनं ते सोनं मानून त्वचेसाठी पारंपरिक उपाय करायला हवेत याची जाणीव अभिनेत्री जुही परमारनं आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून करुन दिली आहे. स्वत: जुही देखील रविवारच्या निवांत दिवशी त्वचेसाठी काही स्पेशल करायचं असल्यास तिचं आवडतं देसी उटणं लावते. बेसन हळद आणि दह्याच्या या उटण्यानं चेहरा ताजा टवटवीत होतो. डेड स्कीन, ब्लॅक हेडस, व्हाइट हेडस, काळवंडलेपणा या त्वचेच्या अनेक समस्यांवर पारंपरिक उटण्याचा परिणाम प्रभावी आहे. जुही परमारनं ही पोस्ट शेअर करताना रविवारच्या दिवशी त्वचेचे लाड करण्यासाठी आपण हे उटणं लावत आहोत असं म्हटलं आहे. चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणणारं हे उटणं तयार करणं आणि लावणं अगदी सहज सोपं आहे. 

त्वचेचे लाड पुरवणारं हे उटणं तयार करण्यासाठी 1 चमाचा बेसन पीठ, 1 चिमूटभर हळद, 2 चमचे दही घ्यावं.  या तिन्ही गोष्टी नीट मिसळून घ्याव्यात. चेहरा आधी पाण्यानं धुवून रुमालानं टिपून घ्यावा. नंतर हे उटणं चेहऱ्याला हळूहळु मसाज करत लावावं. 4-5 मिनिटं मसाज केल्यानंतर हे उटणं 10-15 मिनिटं सुकू द्यावं. लेप सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. आठवड्यातून एकदा हे उटणं लावल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होवून चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो आणि तो विशेष म्हणजे टिकूनही राहातो.

Image: Google

बेसन, हळद आणि दही या तिन्ही गोष्टी त्वचेसाठी उपयुक्त आहेत. बेसन पीठ हे नैसर्गिक क्लीन्जर म्हणून ओळखलं जातं.  बेसनात जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. बेसन त्वचेतील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतं. बेसनामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलही शोषलं जातं, बेसनात ई जीवनसत्व आणि ॲण्टिऑक्सिडण्टस हे त्वचेस फायदेशीर गुणधर्म असल्यानं बेसन चेहऱ्यास लावल्यानं त्वचेचं रक्षण होतं. 

Image: Google

हळदीमुळे त्वचेची झालेली हानी भरुन निघते. चेहऱ्यावर तेज येतं. हळदीत दाहविरोधी गुणधर्म असतात,  तसेच हळदीमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस असल्यानं त्वचेवरील मुरुम पुटकुळ्या बऱ्या होतात. त्वचेवरील डाग निघून जातात. एजिंगचा धोकाही हळदीतील गुणधर्मांमुळे कमी होतो. तर दह्यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते. त्वचेवरील काळे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळं निघून जातात. त्वचेवरील रंध्रांचा आकार कमी होतो. त्वचेच्या सौंदर्याशी निगडित सर्व समस्यांवर उपाय म्हणजे हे पारंपरिक उटणं असल्याचा दाखला स्वत: सौंदर्य तज्ज्ञांनीही दिला आहे. जुही परमारने आपल्या पोस्टमधून या पारंपरिक उपायाकडे सौंदर्यप्रेमींचं लक्ष वेधलं आहे.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी