पूर्वीच्या स्त्रियांचे केस किती छान लांब आणि दाट असायचे. त्यावेळी त्यांना आहारातून मिळणारे पोषण, तेलाची गुणवत्ता, प्रदुषणाचे प्रमाण, ताणतणाव या सगळ्याच गोष्टी आतापेक्षा खूप वेगळ्या होत्या. आपलेही केस दाट आणि लांबसडक असावेत असे मुलींना आजही वाटते. मात्र त्यासाठी नेमके काय करायचे हे मात्र आपल्याला समजत नाही. मग फॅन्सी किंवा रासायनिक उपचार करण्यापेक्षा आपली आजी पूर्वीपासून जे करत आली त्याच पद्धतीचे काही पारंपरिक उपाय केले तर? केसांना तेल लावणे ही अतिशय सामान्य गोष्ट वाटत असली तरी हे तेल लावण्याची पद्धत, त्या तेलातील घटक आणि त्यातून मिळणारे पोषण या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करुन केसांचा पोत बिघडवण्यापेक्षा घरच्या घरी आपल्या केसांसाठी खास तेल कसे तयार करायचे पाहूया (Traditional Hair Oil Recipe for thick and Long hairs)...
१. सगळ्यात आधी एका मोठ्या पातेल्यात १.५ कप खोबरेल तेल घ्यायचे.
२. हे तेल गॅसवर गरम करायला ठेवायचे आणि त्यामध्ये ४ ते ५ जास्वंदीची फुलं घालायची.
३. त्यात एक मूठभर कडीपत्त्याची पाने, ७ ते ८ जास्वंदीची पाने आणि २ चमचे मेहंदीची पाने व १ चमचा मेथ्या घालायच्या.
४. मग यामध्ये ८ ते १० ब्राम्हीची पाने आणि साधारणपणे १५ तुळशीची पाने घालायची.
५. हवे असल्यास किंवा आवडत असल्यास कोरफडीचे १ पान बारीक तुकडे करुन यामध्ये घाला.
६. साधारणपणे ३० ते ३५ मिनीटे हे सगळे मिश्रण बारीक गॅसवर चांगले उकळू द्या.
७. तेलातील सर्व घटकांचा रंग काळसर चॉकलेटी झालेला असेल. त्यानंतर गॅस बंद करा आणि हे तेल चांगले गार होऊद्या.
८. गार झाल्यावर हे तेल गाळून एखाद्या काचेच्या बरणीत किंवा डब्यात भरुन ठेवा आणि नियमितपणे केसांना लावा. हे तेल साधारण ६ महिन्यांपर्यंत चांगले टिकते.