Join us  

सुंदर केसांसाठी पारंपरिक शिकेकाईचा उपाय; वापरा शिकेकाईचे 4 हेअरपॅक, केस होतील लांबसडक-काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 7:29 PM

शिकेकाईचा (soap pad for hair) केसांसाठी नियमित उपयोग केल्यास केसांमध्ये कोंडा होणं, केस पांढरे होणं या समस्यांचा धोका कमी होतो. केसांच्या विविध समस्या (how to make shikakai hair masks) सोडवण्यासाठी शिकेकाईचे चार हेअरपॅक (shikakai hair masks fo hair problems) मदत करतात.

ठळक मुद्देशिकेकाईमध्ये केस मुळापासून स्वच्छ करणारे आणि जिवाणूविरोधी घटक असतात म्हणूनच केस स्वच्छ होण्यासोबतच केस चमकदार होण्यासाठी, केस वाढण्यासाठी, दाट होण्यासाठी शिकेकाईचा उपयोग होतो.

निरोगी केसांसाठी शिकेकाई (soap pad for hair)  हा पारंपरिक उपाय आहे. शिकेकाईमध्ये (shikakai benefits for hair)  अ, क, ड, ई आणि के ही जीवनसत्वं असतात. शिकेकाईतील या गुणधर्मांमुळे शिकेकाईचा उपयोग केस धुण्यासाठी, केसांसाठी तेल तयार करण्यासाठी , केसांसंबंधीच्या विविध समस्या सोडवणारे हेअर मास्क  (shikakai hair masks)  तयार करण्यासाठी होतो. शिकेकाईमुळे केस वाढतात, केस तुटणं, गळणं या समस्या कमी होतात. शिकेकाईमध्ये केस मुळापासून स्वच्छ करणारे आणि जिवाणूविरोधी घटक असतात म्हणूनच केस स्वच्छ होण्यासोबतच केस चमकदार होण्यासाठी, केस वाढण्यासाठी, दाट होण्यासाठी  शिकेकाईचा उपयोग होतो. शिकेकाईचा केसांसाठी नियमित उपयोग केल्यास केसांमध्ये कोंडा होणं, केस पांढरे होणं या समस्यांचा धोका कमी होतो. केसांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शिकेकाईचे चार हेअर मास्क ( how to make shikakai hair masks)  मदत करतात.

Image: Google

केस मजबूत होण्यासाठी 

शिकेकाईमध्ये ॲक्टिव्ह काॅम्पोनन्ट असतात. हे घटक केसांच्या मुळांचं पोषण करतात. शिकेकाई पावडरमुळे केसांची मुळं मजबूत होतात. केसांना उंदरी लागत नाही. केस तुटत -गळत नाही. निरोगी केसांसाठी शिकेकाईचा चांगला उपयोग होतो. यासाठी शिकेकाई पावडर आणि ताजं दही यांचं मिश्रण केसांना आणि केसांच्या मुळांना लावावं. शिकेकाई आणि दह्याचं मिश्रण केसांना लावल्यानंतर ते 20-30 मिनिटं केसांवर राहू द्यावं. नंतर केस थंड पाण्यानं धुवावेत.  शिकेकाईचा हा हेअरमास्क नियमित केसांना लावल्यास केस मजबूत होतात आणि दाट होतात. 

केस काळेभोर राहाण्यासाठी

अनेक कारणांमुळे अकाली केस पांढरे होतात. शिकेकाई पावडरमधील गुणधर्मांमुळे केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. केस दीर्घकाळापर्यंत काळेभोर राहाण्यासाठी शिकेकाईची पावडर लोखंडाच्या कढईत पाण्यानं भिजवावी. सकाळी हे मिश्रण पाण्यामध्ये उकळावं. हे मिश्रण थोडं कोमटसर असताना त्याने केस धुवावेत. हा उपाय नियमित केल्यास केस काळेभोर राहातात आणि मजबूतही होतात. 

Image: Google

उवा -लिखा- कोंड्यांची समस्या घालवण्यासाठी

शिकेकाईचा पीएच स्तर कमी असतो. त्यामुळे शिकेकाई नियमित केसांना लावल्यास केसांमध्ये उवा लिखा होत नाही. शिकेकाईमध्ये जीवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी घटक असातात. त्यामुळे केसात उवा लिखा तर होत नाहीच शिवाय केसात कोंड्याची समस्या होत नाही. डोक्यात खाज येत नाही.  उवा लिखा कोंड्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय करताना अर्धा कप कापराचं तेल घ्यावं. त्यात 2 चमचे कडुनिंबाची पावडर, 1 चमचा तिळाचं तेल आणि 1 चमचा शिकेकाई पावडर घालावी. मिश्रण जर जास्तच घट्ट झालं तर त्यात थोडं तिळाचं तेल आणखी घालावं. हे मिश्रण केसांच्या मुळांशी हलका मसाज करत लावावं. हे मिश्रण केसांना लावल्यावर केसांमधून कंगवा किंवा फणी फिरवावी. नंतर  थोड्या वेळानं केस सौम्य शाम्पूचा वापर करत थंडं पाण्यानं धुवावेत.

Image: Google

डोक्यातली खाज जाण्यासाठी

शिकेकाईमध्ये दाहविरोधी आणि सूज विरोधी घटक असल्यामुळे डोक्यातल्या खाजेची समस्या घालवता येते.  यासाठी 2-3 चमचे ऑलिव्ह तेल, 1 मोठा चमचा दही, 2 मोठे चमचे शिकेकाई पावडर घ्यावी. हे सर्व नीट एकत्र मिसळून घ्यावं. हे मिश्रण केसांना आणि केसांच्या मुळांना मसाज करत लावावं. नंतर डोक्याला शाॅवर कॅप लावावी.  हा हेअरमास्क केसांना 40 मिनिटं ते एक तास लावावा. नंतर केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा  हा उपाय केल्यास डोक्यातल्या खाजेची समस्या दूर होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी