कांदा हा आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. एखादी ग्रेव्ही करण्यासाठी किंवा पदार्थाला छान चव यावी म्हणून आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आवर्जून कांदा वापरतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर कांदा थंड असल्याने आवर्जून खायला हवा असं सांगितलं जातं. कांदा चिरण्यासाठी आपल्याला त्याच्या वरची सालं काढून मग आतला कांदा वापरावा लागतो. ही सालं आपण कचऱ्यात फेकून देतो त्यामुळे ती वाया जातात. मात्र कांद्यामध्ये ज्याप्रमाणे पोषणमूल्य असते त्याचप्रमाणे या सालांमध्येही बरेच उपयुक्त घटक असतात (Usage of Onion Peels for Hair Care).
केसांच्या आरोग्यासाठी आपण काही वेळा कांद्याचा रस किंवा कांद्याचा रस असलेली उत्पादने वापरतो. त्याचप्रमाणे या सालींचाही केसांच्या आरोग्यासाठी वापर केल्यास त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. आपले केस छान दाट आणि लांबसडक असतील तर आपल्या सौंदर्यात भर पडते आणि आपण त्याच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करु शकतो. पाहूयात केस दाट व्हावेत आणि लांबसडक वाढावेत यासाठी या कांद्याच्या सालींचा नेमका कसा वापर करायचा.
कांद्याची सालं कशी वापरायची?
१. कांदा चिरल्यावर त्याची सालं फेकून न देता ती एकत्र करावीत आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्यात घालावीत.
२. हे भांडे गॅसवर ठेवावे आणि ही सालं चांगली उकळावीत, यामुळे या सालींचा अर्क पाण्यात उतरतो.
३. त्यानंतर सालींचा अर्क उतरलेले हे पाणी गाळणीने गाळून घ्यावे आणि गार होऊ द्यावे.
४. लालसर रंग आलेले हे पाणी गार झाल्यानंतर हे एका बाटलीत किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरावे.
५. केसांच्या मुळांना या पाण्याने चांगला मसाज करावा आणि केस २ तासांसाठी तसेच ठेवावेत.
६. नेहमीप्रमाणे केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाकावेत. आठवड्यातून १ ते २ वेळा हा प्रयोग करु शकता.
फायदे
कांद्यातील गुणधर्म या पाण्यात उतरल्याने आणि हे पाणी केसांच्या मुळांशी लावल्यास केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. हा सोपा आणि नैसर्गिक उपाय असल्याने आपण घरीही सहज हा उपाय करु शकतो. केसांचा पोत सुधारण्यास, केसांची वाढ होण्यास तसेच केस दाट होण्यास याची चांगली मदत होते. तसेच केस पांढरे होत असतील तरी नियमितपणे हे पाणी वापरल्यास पांढऱ्या केसांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.