Join us  

2 मिनिटात केस धुवा, वापरा ड्राय शाम्पू! झटपट केस धुणारा शाम्पू लावण्याची सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 4:17 PM

घाईच्या आणि आणीबाणीच्या वेळेस केस स्वच्छ करण्याचा सोपा उपाय म्हणजे ड्राय शाम्पू. पाण्याचा वापर न करता केस स्वच्छ करण्याची क्षमता ड्राय शाम्पूमध्ये (dry shampoo) असते. 

ठळक मुद्देड्राय शाम्पू हा पावडरच्या स्वरुपात असतो. स्प्रे सारखा तो केसांवर वापरला जातो.

शाम्पूमुळे केस धुणं पूर्वीच्या तुलनेत खूप सोपं, सहज आणि कमी वेळखाऊ झालं आहे. पण शाम्पूनं केस धुवायचे म्हटले तरी थोडा वेळ लागतोच. शिवाय केस धुतल्यानंतर ते वाळण्यासाठी थोडा वेळ घेतातच. नेमक्या घाईच्या वेळेत केसांना तेल लावणं, केस धुणं वाळवणं हे जरा जिकरीचं होतं. तर कधी अचानक एखादा कार्यक्रम ठरतो आणि केस स्वच्छ नसतात. शाम्पू करण्यासाठी वेळ नसतो. तर कधी केस धुण्यासाठी हातात वेळ असतो पण पुरेसं पाणी नसतं, तर कधी प्रवासात केस अस्वच्छ झालेत हे लक्षात येतं.. अशा घाईच्या आणि आणीबाणीच्या वेळेस  केस स्वच्छ करण्याचा सोपा उपाय म्हणजे (dry shampoo) ड्राय शाम्पू . पाण्याचा वापर न करता केस स्वच्छ करण्याची क्षमता ड्राय शाम्पूमध्ये (dry shampoo benefits ) असते. केसांना ड्राय शाम्पू  (how to use dry shampoo) लावल्यास आपण नेहेमीसारखे केस धुतल्याची जाणीव होते , केस स्वच्छ होतात आणि वेळ निभावली जाते. 

Image: Google

ड्राय शाम्पू म्हणजे?

ड्राय शाम्पू हा शाम्पूचा हायब्रिड प्रकार आहे. शाम्पूचा असा प्रकार जो वापरताना पाण्याची आवश्यकता नसते. पाणी न वापरताही केसांमधला तेलकटपणा, चिकटपणा निघून जातो. ड्राय शाम्पू हा पावडरच्या स्वरुपात असतो. स्प्रे सारखा तो केसांवर वापरला जातो. ड्राय शाम्पू तयार करताना काॅर्न स्टार्च किंवा राइस स्टार्च यांचा उपयोग केलेला असतो. ड्राय शाम्पू पावडरमुळे केस तेलकट आणि चिकट करणारे केसातील सीबम  शोषले जातात. ड्राय शाम्पूनं केस धुतल्याचा फील येत असला तरी केस फक्त वरवरच स्वच्छ होतात. त्यामुळे केवळ ड्राय शाम्पू वापरुन केस स्वच्छ ठेवता येत नाही. ते मधून मधून धुणं गरजेचंच असतं. 

केस न धुता, ब्लो ड्रायर न वापरता , हेअर स्टाइलर वापरुन स्टाइल न करता केस झटपट सेट करण्याचा उपाय म्हणजे ड्राय शाम्पू वापरणं.  ड्राय शाम्पूतील अल्कोहोल किंवा स्टार्च हे घटक केसातील तेल आणि घाम शोषून घेतात. केसातलं अतिरिक्त तेल शोषलं गेल्यामुळे केस धुतल्याप्रमाणे स्वच्छ होतात. ड्राय शाम्पूमध्ये सुगंधी घटक असल्यानं ड्राय शाम्पू वापरल्यावर छान फ्रेशही वाटतं. 

Image: Google

ड्राय शाम्पू कसा वापरावा?

केसांवर ड्राय शाम्पू वापरण्यच्या तीन स्टेप्स आहेत. 

1. ड्राय शाम्पू वापरताना केस आणि ड्राय शाम्पू यातलं अंतर चार किंवा सहा इंच एवढं लांब असावं. ड्राय शाम्पू केसांवर नाही तर केसांच्या मुळावर स्प्रे करावा. स्प्रे करताना हळू हळू स्प्रे करावा यामुळे शाम्पू मर्यादित प्रमाणात वापरला जातो.

2. ड्राय शाम्पू केसांवर फवारला की बोटांच्या सहाय्यानं केसांच्या मुळाशी मसाज करावा. यामुळे केसातील तेल शोषलं जातं. ड्राय शाम्पू करुन झाल्यावर केसांना सेट करण्याची आवश्यकता वाटल्यास ब्लो ड्रायरनं केस सेट करावे. यामुळे केसांचा व्हाॅल्यूम वाढतो.

3. बोटांनी केसांच्या मुळांशी मसाज करुन झाल्यानंतर ब्रशनं किंवा कंगव्यानं केस विंचरावेत.

Image: Google

ड्राय शाम्पूनं केस विना झंझट झटपट स्वच्छ होत असले तरी ड्राय शाम्पूचा अती वापर केसांसाठी घातक ठरतो. कारण ड्राय शाम्पूचे घटक केसांच्या मुळांशी राहातात. ते जास्त प्रमाणात साठून राहिल्यास केसाच्या मुळाशी असलेली रंध्रं बंद होतात. यामुळे केसांची वाढ खुंटते. म्हणूनच ड्राय शाम्पू आठवड्यातून एकदा किंवा फार तर दोनदा वापरण्याचाच सल्ला तज्ज्ञ देतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स