उन्हाळ्यात चेहरा सतत खराब होतो. तेलकट दिसतो. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या, फोड येतात. चेहरा स्वच्छ व्हावा, तेलकटपणा निघून जावा यासाठी उपाय म्हणून चांगल्यात चांगलं क्लीन्जर कोणतं याचा आपण शोध घेत असतो. पण केमिकलयुक्त क्लीन्जरमुळे त्वचेतल्या नैसर्गिक घटकांना बाधा येऊन चेहऱ्याचं नुकसान होतं. उत्तम हे बाहेर नाही तर आपल्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. एक दोन नव्हे तर स्वयंपाकघरात उपलब्ध साहित्याचा वापर करत 5 प्रकारचे क्लीन्जर घरच्याघरी तयार करता येतात. या नैसर्गिक क्लीन्जरमुळे त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेच्या इतर समस्याही दूर होतात. घरात सहज उपलब्ध असलेल्या साधनातून क्लीन्जर तयार करणं अगदी सोपं आहे.
Image: Google
बेसन-दही क्लीन्जर
बेसन हा घरगुती सौंदर्योपचारातला महत्वाचा घटक. बेसनामध्ये प्रथिनं, जीवनसत्व, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस हे पोषक घटक असतात. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी बेसन हे उपयुक्त असतं. बेसनामध्ये मलईदार दही घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ आणि त्वचा माॅश्चराइजही होते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण काढूण टाकण्यासाठी बेसन आणि दह्याचं क्लीन्जर उत्तम आहे.
Image: Google
मध-लिंबू क्लीन्जर
मधामध्ये ॲण्टिऑक्सिडण्टस, ॲण्टिसेप्टिक आणि माॅश्चरायजिंग गुणधर्म असतात. त्वचा स्वच्छ करण्यासोबतच त्वचेत आर्द्रता निर्माण होण्यासाठी मधाचा उपयोग होतो. मधामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहातो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केल्यास चेहऱ्याची त्वचा दीर्घकाळ ओलसर राहाते, ती कोरडी पडत नाही. मधातील त्वचेस पोषक गुणधर्म खुलून येण्यासाठी मधात थोडं लिंबू घालावं. या मिश्रणामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो.मध आणि लिंबाचं क्लीन्जर करण्यासाठी एक चमचा मध घ्यावं. त्यात दोन तीन थेंब लिंबाचा रस घालावा. दोन तीन थेंब पाणी घालावं. या मिश्रणानं चेहऱ्याचा मसाज करावा. 4-5 मिनिटं मसाज केल्यावर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. नुसत्या मधाने चेहऱ्याचा मसाज करुन चेहरा धुतला तरी फायदा होतो.
Image: Google
ॲपल सायडर व्हिनेगर
चेहऱ्यावरील घाण आणि अशुध्द घटक काढून टाकण्यासाठी पाव कप पाणी घ्यावं. त्यात 2 मोठे चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घालावं. ते चांगलं मिसळून या मिश्रणानं चेहऱ्याचा हळूवार मसाज करावा. जेव्हा जेव्हा चेहरा धुवायचा असतो तेव्हा तेव्हा ॲपक सायडर व्हिनेगरच्या या मिश्रणानं चेहऱ्याचा मसाज करावा आणि चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
मुल्तानी माती-गुलाबपाणी क्लीन्जर
मुल्तानी मातीत त्वचेला थंडावा देणारे घटक असतात. मुल्तानी मातीमुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात. काळवंडलेपणा, मुरुम पुटकुळ्या यासारख्या समस्या मुल्तानी मातीच्या सहज आणि स्वस्त उपायानं दूर होतात. चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यासाठी, चेहऱ्यावर तजेला आणण्यासाठी मुल्तानी माती आणि गुलाब पाण्याच्या मिश्रणाचा उपयोग होतो. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा लेपासारखं लावून काही वेळ ठेवल्यास त्वचेची खोलार स्वच्छता होते.
Image: Google
ओट्स ताक क्लीन्जर
ओट्समध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. ओट्सच्या दाणेदार पोतामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. तसेच ताकामध्ये त्वचा ओलसर राखण्याचे , त्वचेला थंडावा देण्याचे गुणधर्म असतात. त्वचा स्वच्छ होण्यासोबतच त्वचेतलं माॅइश्चर टिकून राहाण्यासाठी ओटस आणि ताक एकत्र करुन त्याचा वापर चेहऱ्यासाठी करावा. ओट्समध्ये ताक घालून घट्टसर मिश्रण करावं. या मिश्रणानं चेहऱ्यावर हळूवार मसाज करावा. मसाज झाला की चेहरा थंड पाण्यानं स्व्च्छ धुवावा.