सध्या सगळीकडेच एवढं कडाक्याचं ऊन आहे, की त्यामुळे त्वचा टॅन होण्याचा म्हणजे त्वचा काळवंडण्याचा खूप त्रास होतो आहे. ज्यांना कामामुळे भर उन्हातच बाहेर जावं लागतं, अशा सगळ्यांनाच टॅनिंगचा त्रास होतो. चेहऱ्यासकट हात, मानही काळे दिसू लागतात. टॅनिंग कमी करून त्वचा पुन्हा स्वच्छ करून उजळवायची असेल तर आंब्याच्या सालींचा खूप उत्तम उपयोग करता येईल. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी सोबतच ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे त्वचेसाठी आंबा खरोखरंच अतिशय उपयुक्त ठरतो.
आंब्याचे गुणधर्म (benefits of mango for skin)
- आंब्यामध्ये बीटा कॅरेटीन आणि व्हिटॅमिन ए खूप जास्त प्रमाणात असतात.
- आंब्यामध्ये असणारे कॅरेटोनाॅईड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात.
- शरीराला आणि त्वचेला डिहायड्रेटेड ठेवण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
- आंब्यामध्ये नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असल्याने तो त्वचेला टवटवी देण्यासाठी उपयुक्त ठरतो.
त्वचेसाठी कसा करावा आंब्याच्या सालींचा वापर (how to use mango for skin?)
१. टॅन झालेल्या त्वचेवर आंब्याची सालं नुसती घासली तरी त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
२. आंब्याची सालं मिक्सरमधून फिरवून वाटून घ्या. त्यामध्ये थोडेसे दही टाका. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. १० ते १५ मिनिटांनी लेप वाळला की चेहरा धुवून टाका. टॅनिंग कमी होऊन त्वचा लगेचच उजळलेली दिसेल.
३. आंब्याचा रस २ चमचे घ्या. त्यात चिमुटभर बेकींग सोडा टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि चेहऱ्याला हलक्या हाताने ५ ते ७ मिनिटे मसाज करा. मसाज झाल्यानंतर लगेचच चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
४. आंब्याच्या सालांवर थोडासा मध आणि थोडी कॉफी पावडर टाका. चेहरा ओला करा. त्यानंतर मध आणि कॉफी पावडर टाकलेले साल चेहऱ्यावर घासा. चेहरा उत्तम प्रकारे स्क्रब होईल. टॅनिंग तर कमी होईलच पण त्वचाही मऊ आणि तुकतुकीत दिसू लागेल.