केसांची योग्य काळजी घेणं सध्या या धावपळीच्या जगात अनेकांना जमत नाही आहे. पूर्वी आपली आई आणि आजी ज्याप्रमाणे आपल्या केसांची निगा राखत असत त्याप्रमाणे काहींना जमत नाही. केसांची काळजी फक्त टाळूवर तेल लावून मसाज करणे इतके सोपे नाही आहे. योग्य पोषक आहार शरीरात जाणे देखील तितकेच महत्वाचे आहे. बहुतांश वेळा घरातील साहित्य देखील केसांची योग्य काळजी घेण्यासाठी मदत करतात. काही हेअर मास्क, हेअर पॅक देखील केसांवर प्रभावी ठरत आहे.
तांदूळ व तांदळाचं पाणी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. तांदळाच्या पाण्यात असलेले नियासिन केसांच्या कूपांना मजबूत करते आणि टाळूला योग्य रक्तपुरवठा करण्यास मदत करते. त्यामुळे तांदूळ आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. आज आपण शिजवलेल्या तांदळापासून हेअर मास्क कसा बनवायचा हे पाहणार आहोत. कमी साहित्यात बनणाऱ्या या हेअर मास्कमुळे केसांना नवी चमक मिळते. केस चमकदार, घनदाट आणि काळेभोर दिसतात.
ग्लॉसी हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारं साहित्य
शिजवलेला भात
केळ
एलोवेरा जेल
३ व्हिटामिन - ई कॅप्सुल
खोबरेल अथवा इतर कोणतेही तेल
ग्लॉसी हेअर मास्क बनवणे व वापरण्याची पद्धत
एका बाऊलमध्ये शिजवलेला भात, केळीचे तुकडे, एलोवेरा जेल, ३ व्हिटामिन - ईच्या कॅप्सुल आणि खोबरेल अथवा इतर तेल मिक्स करा. हे मिश्रण चांगले मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्या. मिश्रण वाटल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
आता केसांना चांगले तेल लावा. तेल लावल्यानंतर हे तयार हेअर मास्कचे मिश्रण केसांवर लावा. टाळूपासून ते केसांच्या टोकापर्यंत हे हेअर मास्कचे मिश्रण लावा. मिश्रण लावल्यानंतर केस सामान्य पाण्याने धुवून काढा.
आपण हा हेअर मास्क आठवड्यातून एक वेळा लावू शकता. याने केस सुपर ग्लॉसी, सिल्की आणि चमकदार दिसतील.