कढीपत्त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे कढीपत्ता अधिकाधिक प्रमाणात सेवन करावा, असे आहारतज्ज्ञ नेहमीच आवर्जून सांगतात. कोणत्या पदार्थात किती आणि कसा कढीपत्ता घालायचा, हे तर बहुसंख्य महिलांना माहितीच आहे. त्यामुळे आता कढीपत्त्यापासून वेगवेगळे फेसपॅक कसे बनवायचे, याची माहिती आपण घेऊया.
कढीपत्त्याचे फायदे
- कढीपत्त्याच्या नियमित सेवनामुळे आणि फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेवर पिंपल येणे जवळपास बंद होते.
- ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपलमुळे काळे डाग किंवा व्रण पडलेले आहेत, त्यांनी नियमितपणे कढीपत्त्याचा फेसपॅक लावला तर निश्चितच हे काळे डाग जाऊ शकतात.
- कढीपत्ता रक्तशुद्धीकरण करण्याचे काम करतो. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारून हळूहळू त्वचा चमकदार होऊ लागते.
- कढीपत्त्याचा फेसपॅक त्वचेला ओलावा देत असल्याने आणि त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असल्याने चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होत जातात. तसेच कोरडी त्वचाही व्यवस्थित मॉईश्चराईज होते.
- त्वचेवरील अतिरिक्त तेल कढीपत्त्याचा फेसपॅक शोषून घेतो. त्यामुळे ऑईली त्वचेची कटकट दूर होते.
कढीपत्ता फेसपॅक बनवायचा कसा ?
१. कढीपत्ता आणि हळद फेसपॅक
त्वचेसाठी हा फेसपॅक अतिशय उत्तम आहे. बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ न देणे, हे कढीपत्ता आणि हळद या दोघांचेही वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा फेसपॅक लावला तर पिंपल आणि डाग चटकन नाहीसे होतात. हा फेसपॅक बनविण्यासाठी कढीपत्त्याची पाने आणि एखादा तास पाण्यात भिजविलेले हळकुंड एकत्रितपणे वाटून घ्या. हळकुंड नसल्यास कढीपत्त्याच्या पानांमध्ये हळद टाका आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हा फेसपॅक चेहऱ्याला पसरवून लावा आणि १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.
केसांच्या सगळ्या समस्यांवर सोपा उपाय, कढीपत्ता ! हा हेअर मास्क लावूनच पहा...
२. कढीपत्ता आणि लिंबू फेसपॅक
हा फेसपॅक बनविण्याची पद्धतही अत्यंत सोपी आहे. यामध्ये कढीपत्त्याची २० ते २५ फ्रेश पाने वाटून घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा एक टेबल स्पून एवढा रस टाका. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर १५ मिनिटे ठेवा आणि त्यानंतर हळूवार हाताने पाणी मारून चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावर जर फोड असतील तर लिंबामुळे थोडे इरीटेशन होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या.
३. कढीपत्ता आणि मुलतानी माती
कढीपत्त्याची पाने बारीक करून त्यात मुलतानी माती टाका. या मिश्रणात एक टी स्पून गुलाबजल मिसळा आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा. यामुळे त्वचेचा पोत सुधारताे आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
४. कढीपत्ता आणि मध व दही
कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये एक चमचा दही, एक चमचा मध टाकून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल जाते आणि त्वचा उजळते.