रोझ वॉटर म्हणजेच गुलाबजल हा आपल्या मेकअप किटमधील एक महत्त्वाचा घटक असतो. कारण रोझ वॉटरचे फायदेही खूप आहेत. स्कीन टोनर, मेकअप रिमुव्हर म्हणूनही रोझ वॉटर वापरले जाते. तसेच आता थकलेल्या डोळ्यांना आराम देण्यासाठीही रोझ वॉटरचा उपयोग होत आहे. डोळ्यांमधील उष्णता कमी करून डोळ्यांना थंडावा देण्याचे काम गुलाब जल करू शकते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी हा उपाय नक्की करून पहा.
रोझ वॉटर कसे लावायचे
सगळ्यात आधी तर रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. डोळे स्वच्छ धुतले जावेत आणि पाणी लागून त्यांना जरा थंड वाटावे हा त्या चेहरा धुण्यामागचा सगळ्यात मुख्य उद्देश. त्यानंतर गुलाबजल एका बाऊलमध्ये काढा आणि कापसाचे दोन बोळे करून ते त्याच्यात काही वेळ बुडवून ठेवा. हे बाऊल १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवली तरी चालेल. जेणेकरून गुलाब जल आणखी थंड होईल. यानंतर अगदी बेडवर पडल्यानंतर गुलाबजल मध्ये भिजलेले कापसाचे बोळे थोडे पिळून घ्या आणि ते तुमच्य डोळ्यांवर १० ते १५ मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल आणि थकवा कमी होण्यास मदत होईल.
रोझ वॉटरचे अन्य फायदे
१. चेहऱ्याची पीएच व्हॅल्यू मेंटेन होते
रोज वॉटरचा उपयोग क्लिंजर म्हणून केल्यास चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेची पीएच व्हॅल्यू योग्य प्रमाणात राखली जाते. तसेच उष्णतेमुळे रापलेली किंवा टॅन झालेली त्वचा उजळू लागते.
२. टोनर म्हणून वापरा रोझ वॉटर
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर अन्य कोणतेही केमिकल बेस टोनर वापरण्याऐवजी रोझ वॉटर वापरणे केव्हाही अधिक श्रेयस्कर ठरते. रोज वॉटरचा टोनर म्हणून वापर केल्याने काही दिवसातच त्वचेचा पोत सुधारल्यासारखा वाटतो. तसेच रोझ वॉटरचा मंद सुगंध आपल्याला दिवसभर फ्रेश ठेवतो.