Join us  

ब्रेकअप झालं म्हणून वीणाने शिवच्या नावाचा टॅटू पुसला? पण सावधान, टॅटू इरेज करणं सोपं नसतं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 12:35 PM

प्रेम सिद्ध करायचं तर काढ टॅटू, ब्रेकअप झाले की कर इरेज.. हा आरोग्याशी खेळ बरा नव्हे..काय काळजी घ्याल?

ठळक मुद्देटॅटू काढणे आणि तो इरेज करणे हे आपल्याला वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही.शिवच्या नावाच्या टॅटूच्या जागी झाडाच्या एका पानाचा नवीन टॅटू असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहेआपली त्वचा नाजूक असल्याने या सर्व गोष्टींचा त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते.

जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. मग रिलेशनमध्ये असल्यापासून निरनिराळ्या तऱ्हेने जोडीदाराला खूश केले जाते. तरुणांमध्ये सध्या टॅटू काढण्याचे म्हणजेच गोंदवून घेण्याचे बरेच फॅड पाहायला मिळते. हा टॅटू कधी हार्टसारख्या चिन्हाचा तर कधी प्रत्यक्ष जोडीदाराच्या नावाचा असतो. जोडीदाराची ज्याप्रमाणे तुम्हाला जन्मभर साथ लाभणार असते त्याचप्रमाणे हा टॅटूही तुम्ही कायम आपल्यासोबत बाळगणार असता. त्यामुळे तो काढताना पूर्ण विचारांती काढायला हवा. कारण टॅटू काढणे आणि तो इरेज करणे हे आपल्याला वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वापासून चर्चेत असलेली जोडी म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप. बिग बॉसच्या घरात आणि त्यानंतरही त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा होती. मराठी कलाविश्वात त्यांचे नाते जाहीर होते आणि त्यांनीही त्याबाबत कबूली दिली होती. वीणाने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शिवच्या नावाचा टॅटू काढला होता. नुकतेच तिने सोशल मीडियावर आपल्या एका ट्रीपचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिच्या हातावरील शिवच्या नावाचा टॅटू दिसत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले आणि त्यामुळे या दोघांमधील ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे शिवच्या नावाच्या टॅटूच्या जागी झाडाच्या एका पानाचा नवीन टॅटू असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पादुकोणनेही रणबीर कपूरसोबत रिलेशनमध्ये असताना RK असा टॅटू मानेवर मागच्या बाजूला काढून घेतला होता पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ती रणवीर सिंगच्या प्रेमात पडली आणि त्यांचे लग्नही झाले. आता पहिले रिलेशन संपल्यानंतर मात्र तिला हा टॅटू काढून टाकणे भाग पडले.  

टॅटू काढणे ही एक कला असून त्यासाठी तुम्हाला टॅटू पार्लर किंवा टॅटू स्टुडिओमध्ये जावे लागते. टॅटू काढण्यासाठी पूर्वी सुईने त्वचेवर कोरले जायचे, आता मात्र त्याची गन येत असून त्याने त्वचेवर आपल्याला हवी ती नक्षी किंवा अक्षरे काढून दिली जातात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची केमिकल आणि रंग वापरण्यात येतात. आपली त्वचा नाजूक असल्याने या सर्व गोष्टींचा त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. अशाप्रकारे हातावर, मानेवर, पाठीवर हा टॅटू कोरताना झालेल्या वेदना एकेकाळी तुमच्या प्रेमाची पावती देतात, पण तो काढायची वेळ आली तर? दिपिका, वीणा यांच्यावर ज्याप्रमाणे टॅटू काढून टाकण्याची म्हणजेच इरेज करण्याची वेळ आली तशी आपल्यावरही येऊ शकते. हा टॅटू नेमका कसा इरेज केला जातो आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात आणि काय काळजी घ्यायला हवी याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  

१. आपल्याला खरंच टॅटू रिमूव्ह करायचा आहे का याचा पूर्ण विचार करुन मगच पुढील उपचार नक्की करा. २. चांगल्या विश्वासू, चांगली साधने वापरत असलेल्या स्वच्छ ठिकाणहूनच टॅटू रिमूव्ह करुन घ्यावा.

३. टॅटू रिमूव्ह केलेल्या भागाची काळजी घ्या, ती स्वच्छ ठेवा. हा भाग ऊन, खारे पाणी यांच्याशी जास्त संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या

४. खाज, आग किंवा पुरळ अशी काही लक्षणं जाणवली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

५. तुमच्या त्वचेचा पोत, टॅटूतील रंग, टॅटू किती मोठा आहे, तो किती आतपर्यंत आहे यावर तुमची उपचारपद्धती ठरते, या सर्व गोष्टींची पुरेशी माहिती घ्या.

६. या प्रक्रियेसाठी वापरली जाणारी साधने महाग असल्याने टॅटू इरेज करण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी खर्चिक असते, खर्चाची तयारी ठेवा 

७. ही बराच वेळ लागणारी प्रक्रिया असूनही हा टॅटू पूर्णपणे जात नाहीच, त्याचा पुसटसा अंश शिल्लक राहतोच, याबाबत मनाची तयारी करा

८. लेझर उपचार घ्यायचे नसतील तर आधीचा टॅटू घालविण्यासाठी त्यावर नवीन टॅटू काढावा लगतो. त्यामुळे पुन्हा एकदा त्वचेच्या त्याच भागावर तुम्हाला टॅटू काढण्याच्या वेदना होऊ शकतात.

टॅटू काढणे वाटते तितके सोपे नाही...

टॅटू इरेज करण्याविषयी बोलताना ‘तराझवा स्टुडिओ’चे भूपेंद्र म्हणाले, एकदा काढलेला टॅटू नंतर रिमूव्ह करायचा असेल तर ते सोपे नाही. टॅटू रिमूव्ह करण्याची तीन कारणे असू शकतात. नात्यात ब्रेकअप झाले तर, डिझाइनचा कंटाळा आला तर आणि सरकारी किंवा इतर नोकरीच्या ठिकाणी टॅटू चालत नाही म्हणून टॅटू रिमूव्ह केला जातो. टॅटू कितीही काढायचा प्रयत्न केला तरी तो पुसट का होईना दिसतोच. टॅटू दोन प्रकारे रिमूव्ह केला जाऊ शकतो. यातील सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकार म्हणजे लेझर ट्रीटमेंट. हा उपचार तुम्हाला त्वचारोगतज्ज्ञ किंवा लेझर क्लिनिकमध्ये जाऊन करावा लागतो. पण ही ट्रीटमेंट चांगल्या प्रकारची असेल याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. यामध्ये जर्मन आणि स्पेन बनावटीची ब्रँडेड मशिन असतील तर तुमचा उपचार चांगला होऊ शकतो. पण चायनिज बनावटीच्या मशिनने टॅटू रिमूव्ह केल्यास त्याचा त्वचेला त्रास होऊ शकतो. टॅटू कशाप्रकारचा आहे यावर लेझरचे किती सिटींग लागणार हे ठरते पण साधारपणे १० ते १२ सिटींग लागतात. ज्यांना ही लेझर ट्रीटमेंट परवडणारी नसते किंवा इतर काही कारणांनी करु शकत नाहीत त्यांच्यासाठी आहे त्याच टॅटूवर आधीचा टॅटू दिसणार नाही असा दुसरा टॅटू काढण्याचा एक पर्याय असतो. लेझर उपचारांनी कर्करोग होण्याचीही शक्यता असते, त्यामुळे टॅटू काढतानाच योग्य तो विचार करुन काढावा. हल्ली फॅड वाढल्याने योग्य प्रकारचे साहित्य न वापरता कमी पैसे घेऊन टॅटू काढून दिले जातात. पण ते त्वचेसाठी घातक ठरु शकतात.

टॅटूच्या प्रकारावरुन ठरते उपचारांची दिशा 

याबाबत प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. ज्योस्ना देव म्हणाल्या, टॅटू काढण्यासाठी प्लॅस्टीक सर्जरी किंवा घासून काढण्याचे वैद्यकीय उपाय उपलब्ध आहेत. पण त्यामध्ये त्वचेवर डाग किंवा टाके दिसू शकतात. पण लेझर ट्रीटमेंटमध्ये तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होत नसल्याने नको असलेला टॅटू रिमूव्ह करण्यासाठी लोक आमच्याकडे येतात. टॅटू कशाप्रकारचा आहे त्यानुसार त्यासाठी कशा प्रकारचे, किती क्षमतेचे लेझर मशीन वापरायचे हे ठरते. साधे गोंदवून घेतले असेल तर ते काढून टाकणे तुलनेने सोपे असते. पण स्टुडिओमध्ये जाऊन काढलेले टॅटू इरेज करणे काहीसे आव्हानात्मक असते. याशिवाय यामध्ये लाल, पिवळा असे रंग वापरले असल्यास टॅटू पूर्णपणे निघायला वेळ लागतो, हेच निळा, हिरवा असे रंग असतील तर तो लवकर निघतो. मुख्यत: टॅटू रिमूव्ह करताना त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. तसेच तुमच्या त्वचेचा पोत, टॅटू शरीराच्या नेमक्या कोणत्या भागावर आहे यावरही या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.  

 

 

 

 

 

टॅग्स :वीणा जगतापब्यूटी टिप्सशीव ठाकरे