सौंदर्याच्या बाबतीच चेहरा, हात, केस आपला बांधा अशी आपली प्रत्येक गोष्ट सुंदर दिसायला हवी असे आपल्याला वाटत असते. चेहरा आणि केसांसाठी आपण सतत काही ना काही प्रयोग करत असतो. पण आपल्या टॅन झालेल्या, नखांची अवस्था झालेल्या हातांकडे आपले म्हणावे तितके लक्ष जात नाही. अभिनेत्रींची एकसारखी छान टोकदार नखं पाहिली की आपलीही नखं अशीच सुंदर असावीत असं आपल्याला वाटतं खरं. पण प्रत्यक्षात कधी काम करताना ती तुटतात, तर कधी आपल्याला त्याला छान शेप द्यायलाही वेळ होत नाही. कित्येकदा तर आपण काही दिवसांपूर्वी लावलेले नेलपेंटही त्यावर अर्धवट राहीलेले असते ते काढायलाही आपल्याला जमत नाही. पण हीच नखं छान शाईन करणारी, एकसारख्या आकारातील आणि स्वच्छ असतील तर ती सुंदर दिसतात. नखं कापणे हे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असले तरी सौंदर्याची योग्य ती काळजी घेऊन नखं कापायला हवीत. पाहूयात नखं कापताना कोणत्या चुका आवर्जून टाळायला हव्यात...
१. कोरडी नखं कधीच कापू नका
नथं ही थोडी जाडसर आणि कडक असल्याने ती कापताना आपल्याला अनेकदा त्रास होऊ शकतो. कोरडी नखे निघणे काहीवेळा अवघड होते आणि ही नखे कापताना त्याच्या आजुबाजूची त्वचा दुखावली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नखे नीट एकसारखी आणि चांगली कापली जायची असतील तर हात नेहमी ५ मिनीटे कोमट पाण्यात भिजवून ठेवायला हवेत. त्यामुळे नखे मऊ होतात आणि पटकन नीट कापली जातात.
२. थेट नखं कापू नका
आपण नेलकटर घेतो आणि थेट नखं कापायला सुरुवात करतो. पण असे करणे चुकीचे आहे. आधी नखं ट्रीम करुन मग त्याला आकार दिला तर ते सोपे जाते. तसेच नखांच्या कडेचा भाग घाईने न कापता हळूहळू कापायला हवा.
३. नखांना वेगवेगळे आकार देऊ नका
बऱ्याचदा आपण इतरांचे बघून किंवा फॅशन म्हणून नखांना वेगवेगळे आकार देतो. पण त्यामुळे नखं खराब होण्याची शक्यता असते. नखांना पुढे टोकदार केले तरी कडेने गोलाकार द्यायला हवा. त्यामुळे नखं तुटण्यापासून वाचू शकतात. नखांना वेगवेगळे आकार देणे त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचे असते.
४. मॉईश्चरायजर लावायला विसरु नका
नखं आणि त्यांच्या बाजूचा भाग अतिशय नाजूक असतो. नखं कापल्यानंतर हा भाग दुखण्याची शक्यता असते. त्यामुळे नखं कापून झाल्यावर ती बाजूने मऊ पडावीत यासाठी त्यांना आवर्जून मॉईश्चरायजर लावायला हवे. त्यामुळे नखांच्या बाजूची त्वचा मुलायम राहण्यास मदत होते आणि नखंही दुखत नाहीत.
५. नेलकटर किंवा इतर साधने कोणाशी शेअर करु नका
नखांमध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरीया असण्याची शक्यता असते. एकमेकांची साधने वापरल्यास हे बॅक्टेरीया दुसऱ्यांच्या हाताला लागण्याची शक्यता असते. आपण हाताने जेवतो, डोळे साफ करतो. अशाप्रकारे एकमेकांचे बॅक्टेरीया आपल्याला लागले तर आपण आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने नेलकटर किंवा इतर साधने वेगवेगळी वापरायला हवीत.