Join us  

सुंदर दिसायचंय? बदाम तेलाचे 3-4 थेंबही करतील जादू, बघा कसा करायचा वापर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 4:51 PM

तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये आवर्जून असायला हवा असा घटक

ठळक मुद्देबदाम खाण्यासाठी जसे फायदेशीर असतात, तितकेच त्याचे तेल त्वचेसाठी उत्तम असतेचिकट नसणारे बदामाचे तेल लावल्याने त्वचा आणि केस मुलायम होण्यास मदत होते

सौंदर्य म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर चेहऱ्याचे सौंदर्य येते. त्यातही फेसवॉश आणि क्रिम या दोनच गोष्टी प्रामुख्याने आपल्याला दिसतात. पण तसे नाही. सौंदर्याचा विचार करता त्यामध्ये चेहऱ्याबरोबरच शरीराची त्वचा, केस अशा इतरही गोष्टींचा समावेश होतो. इतकेच नाही तर सौंदर्यप्रसाधनांमध्ये मॉइश्चरायझर, सिरम, शाम्पू, कंडीशनर अशा एकाहून एक गोष्टींचा समावेश असतो. वेगवेगळ्या केमिकलचा वापर केलेली उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक घटक असलेली उत्पादने वापरणे केव्हाही चांगले. यातही सौंदर्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बदामाचे तेल. बदाम ज्याप्रमाणे खाण्यासाठी पौष्टीक असतात, त्याचप्रमाणे बदामाचे तेल सौंदर्या खुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन इ हे घटक असतात. तसेच त्यामध्ये ओमेगा ६ फॅटी अॅसिडही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बदाम तेल त्वचा आणि केसासाठी पोषणाचा उर्जास्रोत असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

१. त्वचेला मिळेल उत्तम पोषण -

थंडीच्या दिवसांत त्वचा खूप कोरडी पडते. ही रुक्षता घालवण्यासाठी तसेच एरवीची त्वचेचा पोत चांगला होण्यासाठी चेहऱ्याला नियमित काही थेंब बदाम तेलाने मसाज केल्यास उपयुक्त ठरतो. त्वचेतील आर्द्रता टिकून राहत असल्याने चेहऱ्याची त्वचा नितळ दिसावी यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

२. डोळ्यांखाली लावण्यास चांगला उपाय -

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन इ असल्याने डोळ्याखाली येणारे डाग तसेच सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी डोळ्याखाली बदाम तेल लावणे फायद्याचे ठरते. अनेकींना विविध कारणांनी डार्क सर्कलची समस्या असते, ही समस्या दूर होण्यासाठी बदामाचे तेल अतिशय उपयुक्त ठरते. 

३. ओठ मऊ राहण्यासाठी फायदेशीर -

थंडीच्या दिवसांत ओठ खूप कोरडे पडतात आणि ओठांवरची त्वचा निघते. बदामाच्या तेलात असणाऱ्या फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन इ मुळे ते ओठांवर लावल्यास ओठ मुलायम होण्यासाठी त्याची चांगली मदत होते. 

४. मेकअप रिमूव्हर म्हणून उपयोग -

बाहेर जाताना आपण चेहऱ्यावर वेगवेगळी उत्पादने लावतो. पण या उत्पादनांमध्ये असणाऱ्या केमिकल्सचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशावेळी काही थेंब बदाम तेल हातावर घेऊन ते हातावर चोळूनच थोडे गरम करावे. हे तेल चेहऱ्यावर लावल्यास मेकअप रिमूव्हर म्हणून त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

५. नखांच्या बाजूच्या पातळ त्वचेला लावण्यासाठी -

आपल्या नखांच्या बाजूची त्वचा अतिशय पातळ असते. अनेकदा नखांच्या बाजूची ही त्वचा खूप कोरडी, खराब झालेली असते. अशावेळी नखे आणि त्याच्या बाजूची त्वचा मऊ राहण्यासाठी त्यांना बदामाच्या तेलाने मसाज करायला हवा.

६. बॉडी मसाजसाठी अतिशय उत्तम पर्याय -

बॉडी मसाजसाठी बदाम तेल हा उत्तम उपाय आहे. त्वचा मऊ आणि टवटवीत होण्यासाठी या तेलाने नियमित मसाज करणे फायद्याचे ठरते. कोरडेपणा आणि रुक्षपणापासून त्वचेला वाचवण्यासाठी बदाम तेलाचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

७. केस वाढण्यासाठी आणि मुलायम होण्यासाठी फायदेशीर -

केस दाट आणि मजबूत व्हावेत यासाठी बदामाचे तेल अतिशय उपयुक्त असते. बदाम तेलाने केसांच्या मूळांशी मसाज केल्यास केसांना पोषण मिळण्यास मदत होते. बदामाच्या तेलाने केसांत गोलाकार मसाज करुन २ तासांनी केस धुतल्यास त्याचा अतिशय चांगला इफेक्ट दिसून येतो. आपले केस जास्त कोरडे आणि भुरभुरीत असतील तर केसांना बाहेरच्या बाजूनेही बदाम तेल लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. बदाम तेल इतर तेलांइतके ते केसांना वरुन लावले तरी तितके चिकट वाटत नाही.