सणवार असो किंवा एखादे लग्न, अगदी लहानसे फंक्शन असले तरी साडी नेसायचा मोह अनेकींना आवरत नाही. मात्र आपली उंची कमी आहे, मग आपण साडी नेसली की अजून बुटके दिसतो असे अनेकींना वाटते त्यामुळे आवडत असूनही साडी नेसणे टाळले जाते. पण उंची कमी असली म्हणून काय झालं. साडीतही तुम्ही उंच दिसू शकता, इतकंच नाही तर सगळ्यांमध्ये परफेक्ट लूक मिळवू शकता. मात्र यासाठी काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. यामध्ये साडी खरेदीपासून ते ब्लाऊजची स्टाईल, हेअरस्टाइल, साडी नसेण्याची पद्धत यांसारख्या सगळ्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. पाहूयात साडी नेसल्यावरही उंच दिसावं यासाठी काही खास टिप्स...
१. ज्यांची उंची कमी आहे अशांनी साडीची निवड करताना शिफॉन, जॉर्जेट, सॅटीन अशा कापडाची साडी खरेदी करावी. या साड्या अंगाला चोपून बसतात, त्यामुळे आपण नकळत त्यात बारीक आणि उंच दिसतो. कॉटनसारख्या कापडात आपण आहोत त्यापेक्षा जास्त जाड दिसतो त्यामुळे अशाप्रकारची साडी नेसणे कमी उंचीच्या मुलींनी टाळावे. हलक्या आणि अंगाला चोपून बसणाऱ्या कापडाची साडी नेसायला हवी.
२. जाड किंवा उंच काठ, बॉर्डर असलेल्या साड्या उंची कमी असलेल्या मुलींनी नेसणे टाळावे. त्यामुळे उंची आणखी कमी दिसते. साडी खरेदी करतानाच तिचा काठ बारीक असेल याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
३. साडीचा रंग गडद असला तर पाहणाऱ्याचे आपल्यापेक्षा साडीकडे जास्त लक्ष जाते, त्यामुळे लठ्ठ आणि उंचीला कमी असणाऱ्यांनी शक्यतो गडद रंगाची साडी नेसावी. त्यामुळे पाहणाऱ्याचे साडीचा रंग आणि डिझाइन याकडे लक्ष जाते.
४. उंच दिसायचे असेल तर मोठे आणि हेवी प्रिंट टाळावेत. तुम्हाला प्रिंटेड किंवा डिझायनर साड्या नेसायला आवडत असतील तर अगदी लहान प्रिंट किंवा नाजूक डिझाइनची साडी घ्या. त्यामुळे तुम्ही नक्की बारीक दिसाल.
५. प्रिंटपेक्षा उंची कमी असलेल्यांना प्लेन साड्याही जास्त चांगल्या दिसतात. प्लेन साडीमुळे नकळत तुम्ही बारीक आणि उंच दिसायला मदत होते.
६. उंची कमी असलेल्यांनी कोणत्याही प्रकारच्या साडीवर ब्लाऊज शिवताना किंवा खरेदी करताना लहान बाह्यांचे न शिवता कोपराइतके किंवा थ्री फोर्थ बाह्यांचे शिवावे. फूल स्लीव्हज आवडत असेल तर तसेच चांगले वाटते.
७. साडीवर हेअरस्टाइल करताना केस मोकळे सोडणार असाल तर जास्त केस पुढच्या बाजुला येतील असे बघा. त्यामुळे तुमचा छातीकडील भाग जास्त दिसणार नाही आणि लठ्ठपणा काही प्रमाणात झाकला जाईल.
८. अनेकींना साडी कंबरेवर म्हणजे नाभीच्या वर नेसायचीच सवय असते. त्यामुळे पोटाचा घेर आणखी जास्त दिसतो आणि आपण आणखी जाड दिसतो. त्यामुळे साडीत उंच दिसायचे असेल तर नाभीच्या खाली साडी नेसल्यास आपण बारीक दिसतो.
९. साडीवरील दागिन्यांची निवड करताना काळजी घ्या. एकदम गळ्याशी येतील असे नेकलेस किंवा लहान आकारातील कानातले टाळा. त्यापेक्षा जास्तीत जास्त लांब असलेले गळ्यातले घाला. त्यामुळे तुम्ही उंच दिसाल. तसेच कानातलेही उंच असतील असे बघा.
१०. साडीवर हिल्स घातल्यास तुमचा लूक उठून येतो. मात्र हिल्स वापरणे जमत नसेल तर अगदी फ्लॅट चप्पल न घालता तुम्ही प्लॅटफॉर्म हिल्सचा वापर करु शकता.