थंडीत कोरडेपणामुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. मग ही त्वचा मुलायम दिसावी यासाठी आपण चेहऱ्याला मॉईश्चरायजर, सिरम किंवा काही ना काही लावतो. यामुळे त्वचा काही प्रमाणात मुलायम होण्यास मदत होते. पण हवेतील कोरडेपणामुळे आलेला कोरडेपणा विशेष कमी होत नाही. बाजारात मिळणारे विविध ब्रँडचे प्रॉडक्ट किमतीने तर महाग असतातच पण त्यामुळे आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होण्याचीही शक्यता असते. मुख्यत: चेहऱ्याची त्वचा प्रदूषण, धूळ, सूर्यप्रकाश, घाम यांमुळे खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी चेहरा खराब होऊ नये म्हणून घरच्या घरी काही सिरम तयार करता आले तर (Home Made Serum For Different Skin Types)?
घरगुती सिरममुळे केवळ त्वचा मुलायम राहते असं नाही तर त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र त्वचा मुलायम राहावी यासाठी घरच्या घरी स्कीन सिरम कसे तयार करायचे याविषयी सांगतात. पाहूयात घरच्या घरी सिरम तयार करण्याच्या सोप्या पद्धती...
१. कोरड्या त्वचेसाठी
कोरड्या त्वचेसाठी सिरम कसे बनवायचे ते पाहूया. १ चमचा मध, १ चमचा खोबरेल तेल आणि १ चमचा कोरफडीचा गर एकत्र करावा. कोरफडीचा गर हा नैसर्गिक मॉईश्चरायजर असल्याने त्याचा चेहऱ्यासाठी चांगला उपयोग होतो. तर खोबरेल तेल हे नैसर्गिक सनस्क्रीनप्रमाणे काम करत असल्याने सिरम म्हणून त्याचा वापर उपयुक्त ठरतो.
२. तेलकट त्वचेसाठी
१ चमचा टोमॅटो प्युरी आणि १ चमचा मध एकत्र करुन त्याचे सिरम तयार करावे. टोमॅटोमुळे तेलकट त्वचा उजळ दिसण्यास मदत होते. मधामुळे पिंपल्स आणि पुरळ कमी होण्यास चांगला उपयोग होतो. ३ ते ४ थेंब सिरम बोटांवर घेऊन मग ते चेहऱ्यावर लावावे.
३. सेन्सिटीव्ह स्कीनसाठी
१ चमचा साखर आणि ३ चमचे कच्चे दूध एकत्र करुन ते सिरम म्हणून चेहऱ्याला लावावे. दूधामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. तर साखरेमुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये अडकलेली घाण किंवा धूळ निघून जाण्यास मदत होते.
सिरम कधी, कसे लावावे?
सिरम हे दररोज सकाळी आणि संध्याकाळी चेहऱा धुतल्यावर लावायला हवे. त्यानंतर त्यावर आपण कोणतेही मेकअप प्रॉडक्ट लावू शकतो. सिरम लावताना चेहऱ्याला खूप जोर न लावता हलक्या हाताने सिरम लावायला हवे. त्यामुळे ते त्वचेमध्ये चांगल्याप्रकारे मुरते आणि त्वचेला इरीटेशन होत नाही. सिरम लावल्यानंतर चेहऱ्यावर हळूवार टॅप करावे म्हणजे त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते.