Join us  

दुधासारखी कोमल त्वचा हवी, मग ५ प्रकारे लावा चेहऱ्याला दूध, पाहा नितळ ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 7:56 PM

Get Soft - Healthy Skin By Using Milk दूध शरीरासाठी नाही तर चेहऱ्यासाठी देखील मदतगार, दुधासारखी मऊ - कोमल त्वचेसाठी, करा असा वापर..

हेल्थसोबतच त्वचेची देखभाल करण्याचे काम दूध करते. चेहऱ्यासाठी दूध एक वरदान आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नियमित दूध प्यायल्याने शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. यासह चेहऱ्याचे रंग सुधारण्यापासून ते चमक वाढवण्यापर्यंत दूध किफायतशीर आहे. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी दूध मदतगार ठरेल. काही लोक कच्च्या दुधाचा वापर डीप क्लीन करण्यासाठी देखील करतात. दुधाचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी किंवा फेस मास्क म्हणून केला जाऊ शकतो. असे केल्याने मुरुमांवर उपचार करण्यात मदत होऊ शकते. याने चेहरा तजेलदार आणि सुंदर दिसू लागते.

दूध आणि बेसन

जेव्हा त्वचा जास्त कोरडी पडते तेव्हा ती आपली चमक गमावते. अशा स्थितीत कच्च्या दुधाचा फेस पॅक लावल्यास चमक वाढण्यास मदत मिळते. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक बाऊल घ्या, त्यात 2 चमचे बेसन घाला. या बेसनामध्ये आवश्यकतेनुसार कच्चे दूध यासह 2 ते 4 थेंब गुलाबजल टाकून त्याची पेस्ट बनवा. हा तयार केलेला फेस मास्क 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि धुवा. याने त्वचेवर चमक येईल.

क्लिन्झर म्हणून वापर

कच्चं दूध थेट चेहऱ्यावर क्लिन्जर म्हणूनही लावता येईल. यासाठी एका बाऊलमध्ये कच्चे दूध घ्या. या दुधात कापूस बुडवून चेहऱ्यावर चोळा. काही वेळ दूध चेहऱ्यावर लावल्याने घाण निघताना दिसेल. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी दूध प्रभावी आहे.

दूध आणि केसर

चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी केसर मदत करेल. कच्च्या दुधात केसर टाका. त्यात चिमूटभर हळदही टाका. दुधाला केसराचा रंग आल्यावर कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा. चेहरा चमकेल.

दूध आणि दही

त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी कच्चे दूध मदत करेल. एका बाऊलमध्ये दूध आणि दही एकत्र मिक्स करा. दोन्ही फक्त २ - २ चमचे घ्या. हे मिश्रण बोटांनी किंवा कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा, अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून २ वेळा करा.

दूध आणि मध

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी दुधात मध मिसळून लावा. यामुळे त्वचेवरील हरवलेली चमक परत येईल. ही रेसिपी वापरण्यासाठी दोन चमचे कच्च्या दुधात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. त्वचेचा कोरडेपणा कमी होताना दिसेल.

टॅग्स :दूधब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी