वर्षातील दुसरा महिना म्हणजेच प्रेमाचा महिना. फेब्रुवारी महिन्यातील ७ तारखेपासून व्हॅलेंटाईन्स डेला सुरुवात होते. १४ तारखेला प्रेमीयुगुल एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत साजरा करतात. या दिवशी महिला खास दिसण्यासाठी खूप काही गोष्टी करतात. शॉपिंग, व्यायाम अथवा पार्लरमध्ये जाऊन स्वतःवर मेहनत घेतात. खास करून चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी महिला महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र, महागड्या, केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा आपण घरगुती पद्धतींचा वापर करून चेहऱ्यावर ग्लो आणू शकता. व्हॅलेंटाईन्स डेला आपला चेहरा चमकदार दिसावा असं तुम्हाला वाटत असेल तर, काही स्किन केअर टिप्स फॉलो करा. जेणेकरून १४ फेब्रुवारी रोजी आपला चेहरा ग्लोइंग आणि सुंदर दिसेल यात शंका नाही.
५ घरगुती स्कीन केअर टिप्स
शरीर हायड्रेटेड ठेवा
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचाही निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. त्वचेवरील पोत सुधारण्यासाठी आपण दररोज नारळ पाणी पिऊ शकता. याव्यतिरिक्त आपण नारळाच्या पाण्यानेही चेहऱ्याची मालिश करू शकता. नारळाच्या पाण्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम येण्यापासून रोखतात. यासह त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते.
फेस मास्क वापरा
स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंचा वापर करून आपण चमकदार त्वचा मिळवू शकता. यासाठी आपण हळदचा वापर करू शकता. हळदमध्ये मलाई मिक्स करून चेहऱ्यावर लावा, आणि १५ मिनिटानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. हा मास्क लावल्याने चेहऱ्यावरील ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत मिळेल. हळदमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, याच्या नियमित वापरामुळे त्वचेचा टोन सुधारेल.
स्क्रबची मदत घ्या
नैसर्गिक स्क्रब वापरून आपण मृत त्वचेच्या पेशींपासून मुक्त होऊ शकता. यासाठी आपण कॉफी आणि मधापासून स्क्रब तयार करू शकता. एका भांड्यात एक चमचा कॉफी पावडर घ्या, त्यात एक चमचा मध घाला. त्यानंतर या मिश्रणाने चेहरा स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक उठून दिसेल.
कोरफड जेल वापरा
कोरफडीचा गर केस व त्वचेसाठी वरदान समजला जातो. त्वचेवर कोरफडीचा गर लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या कमी होतात. दररोज झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला एलोवेरा जेलने मसाज करा, ते त्वचेला हायड्रेट करते. याच्या नियमित वापराने आपल्याला पिंपल्सपासून सुटका मिळू शकते.
दिवसातून दोनवेळा फेसवॉश करा
चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी फेसवॉश महत्वाचे. नियमित फेसवॉश केल्याने चेहरा तुकतुकीत होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोनदा फेसवॉश करा. ज्यामुळे तुमची त्वचा चमकेल. मेकअप काढल्यानंतर देखील फेसवॉश महत्वाचे.