साडी नेसायची असो किंवा घागरा, अगदी पंजाबी ड्रेस घालायचा असेल तरी हल्ली तरुणी त्यावर मोठे मोठे लांबलचक कानातले घालणे पसंत करतात. कोणताही सण-समारंभ असो किंवा एखादे लग्न नाहीतर कार्यक्रम असो कोणत्याही कपड्यांवर हेवी कानातले घातले की आपला लूक खुलून येतो. इतकेच काय पण मोठे कानातले घातले की इतर कोणतीही ज्वेलरी नाही घातली तरी चालते. वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या कानातल्यांमध्ये आपण एकदम हटके आणि स्टायलिश लूक मिळवू शकतो. वेस्टर्न कपड्यांवरही आपण हेवी कानातले कॅरी करुन स्टायलिश लूक मिळवू शकतो. मात्र या हेवी कानातल्यांचा कानाला त्रास होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायला हवी. त्यासाठी मोठे असले तरी हलक्या वजनाचे कानातले निवडणे, हे कानातले जास्त काळ कानात राहणार नाहीत याची काळजी घेणे, शक्य असेल तर कानातल्यांना एखादा वेल लावणे जेणेकरुन कानावर कानातल्यांचा भार येणार नाही आणि आपण परफेक्ट लूक कॅरी करु शकू.
झुमके
मागच्या काही वर्षांपासून झुमक्यांना तरुणींची बरीच पसंती असल्याचे दिसते. वेगवेगळ्या आकारातील आणि पॅटर्नचे हे झुमके आपला पारंपरिक लूक सेट करु शकतील. गोल्डन आणि सिल्व्हर रंगाच्या झुमक्यांबरोबरच ऑक्सिडाइज, मोत्याचे असे वेगवेगळे झुमक्यांचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. एक झुमका किंवा एकाखाली एक असे दोन किंवा तीन झुमके, त्याखाली एखादा मोती असेही छान खुलून दिसते. त्यामुळे आपण आपल्या ड्रेसप्रमाणे त्याला मॅचिंग असा एखादा झुमक्याचा प्रकार निवडू शकतो. आपल्याकडे काही ठराविक झुमक्यांचे प्रकार असायलाच हवेत जेणेकरुन ऐनवेळी पटकन ते घालता येऊ शकतात.
स्टोन किंवा डायमंड
हल्ली डायमंडमध्येही कानातल्यांचे बरेच प्रकार उपलब्ध असतात. तुम्ही एखाद्या पार्टीला किंवा नाईट फंक्शनला जाणार असाल तर रात्रीच्या वेळी असे कानातले मस्त दिसतात. रात्री डायमंड किंवा खडे चमकत असल्याने तुमचा पार्टी लूक परफेक्ट होईल. या कानातल्यांमुळे आपण अगदी लाईट मेकअप केला आणि इतर काहीही ज्वेलरी कॅरी केली नाहीत तरी सगळ्यांमध्ये उठून दिसू शकतो. मात्र हे कानातले घेताना ते खूप जास्त चमकणारे आणि जड असतील असे घेऊ नका. एखादा पार्टी गाऊन किंवा घागरा यावर हे कानातले अतिशय सुंदर दिसतात.
इमिटेशन ज्वेलरी
इमिटेशन ज्वेलरीमध्ये हल्ली बाजारात बरेच प्रकार पाहायला मिळतात. अगदी मण्यांपासून ते वेगवेगळ्या धाग्यांचा वापर करुन केलेले हे कानातले घातल्यावर उपस्थितांचे तुमच्याकडे लक्ष जाते. ही ज्वेलरी दिसायला आकर्षक असल्याने प्रसिद्ध अभिनेत्रींपासून ते अगदी सामान्य तरुणींपर्यंत सगळेच या ज्वेलरीला प्राधान्य देतात. यामध्ये विविध रंगाचे पर्याय उपलब्ध असल्याने आपण आपल्या कपड्यांच्या रंगानुसार कानातले घेऊ शकता. या कानातल्यांवर एखादी बिंदी किंवा हातात एखादे ब्रेसलेट घातले तरी छान दिसते.
मोत्यांचे पारंपरिक दागिने
मोती हा मागील अनेक वर्षांपासून तरुणी आणि महिलावर्गात आवडीचा प्रकार आहे. काठापदराची साडी असो किंवा कॉटनची साधीशी साडी. मोत्याचे दागिने सगळ्यावर अतिशय उठून दिसतात. मोत्याच्या पारंपरिक कुड्यांपासून ते मोठमोठ्या झुब्यांपर्यंत अनेक प्रकार पाहायला मिळतात. बारीक मोत्याचे झुबे किंवा अगदी खांद्यापर्यंत येणारे कानातले तुम्हाला छान लूक देतात. यामध्ये पेस्टल रंगाचे बरेच पर्याय उपलब्ध असले तरी पारंपरिक मोती रंगाला महिला वर्गाची जास्त पसंती असल्याचे दिसते.
इतर पर्याय
याशिवाय सध्या पेपर क्विलिंग, मातीचे कानातले, ग्लास पेंटींग केलेले कानातले, खणाच्या कापडाचे किंवा अगदी दोऱ्याने विणलेले असे अनेक हटके प्रकार पाहायला मिळतात. हे कानातले हाताने तयार केलेले असल्यामुळे याच्यावरली कलाकारीची किंमत जास्त असते. पण त्या कानातल्यांमध्ये आपण सगळ्यांमध्ये उठून दिसू शकता आणि उपस्थित प्रत्येक जण तुम्हाला तुमच्या या आगळ्यावेगळ्या फॅशनविषयी विचारतो. त्यामुळे मोठे कानाले घालायला आवडत असतील आणि इतर पारंपरिक पर्याय नको असतील तर हे पर्यायही आपण नक्की वापरु शकतो.