Join us  

केस गरम पाण्याने धुवावेत की गार? ऐका तज्ज्ञांचा सल्ला ऐका; सावरा केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 6:37 PM

हेअर स्पेशलिस्ट म्हणतात आपला सर्वांचा एक गैरसमज आहे, तो म्हणजे गरम कडकडीत पाण्यानं आंघोळ केल्यानंच त्वचा स्वच्छ आणि निरोगी होते. हाच समज केस धुण्याच्या बाबतीतही बाळगला जातो आणि केसांचं नुकसान होतं.

ठळक मुद्देकेस धुण्यासाठी पाणी कसं आणि कोणतं वापरता हा इतर सर्व मुद्यांपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे.गरम पाण्याने केस स्वच्छ होत नाही उलट ते खराब होतात.आंघोळ करण्यासाठी गरपाणी आणि केस धुण्यासाठी थंड पाणी ही पध्दत केसांसाठीच नाही तर आरोग्यासाठीही घातक असते.

 केसांची निगा राखणं हे सोपं काम नाही . केसांवर परिणाम करणारे घटक केवळ बाहेर वातावरणात असतात असं नाही तर आपल्या शरीरात होणार्‍या रासायनिक बदलांचा परिणामही केसांवर होतो. तसेच आपल्या सवयी या देखील केसांवर प्रभाव टाकतात.

आहार योग्य आहे, केसांसाठी वापरलं जाणारं तेल नैसर्गिक आणि उत्तम दर्जाचा आहे, शाम्पू सौम्य आणि तोही नैसगिक गुणधर्म असलेला आहे. हे सर्व योग्य असतांनाही केसांच्या समस्या असतील, केस गळत असतील, केसांचं सौंदर्य हरवलं असेल तर मग जावेद हबीबसारखे हेअर स्पेशलिस्ट एकच प्रश्न विचारतात की तुम्ही केस कोणत्या पाण्यानं धुता? गरम की गार? की दोन्ही

जावेद हबीब यांच्या मते आपण केसांची इतर पध्दतीने कितीही काळजी घेतली तर केस स्वच्छ करण्याचा मुख्य स्त्रोत  पाणी आहे. त्यामुळे पाणी कोणतं वापरता हे केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला सर्वांचा एक गैरसमज आहे, तो म्हणजे गरम कडकडीत पाण्यानं आंघोळ केल्यानंच त्वचा स्वच्छ आणि निरोगी होते. हाच समज केस धुण्याच्या बाबतीतही बाळगला जातो आणि गरम कडकडीत पाण्यानं केस धुण्याची सवय अनेकजण जोपासतात. जावेद हबीब म्हणतात की, असा समज आणि सवय जपणार्‍यांचे केस कामातून जातात.

Image: Google

केसांसाठी कोणतं पाणी योग्य?

जावेद हबीब म्हणतात, थंड पाण्यानं केस धुणं हे सगळ्यात फायदेशीर आहे. यामुळे केसातील घाण, कचरा, दूषित घटक आणि केसांना लावलेला शाम्पू नीट निघून जाऊन केस स्वच्छ होतात. गरम पाण्याने केस स्वच्छ होत नाही उलट ते खराब होतात. केसांसाठी अति गरम पाणी वापरल्यास केस स्वच्छ तर होत नाहीत पण केसांच्या मुळांना गरम पाण्यामुळे इजा होते. टाळूची त्वचा कोरडी पडते.  तेथील आणि केसातील नैसर्गिक तेल निघून जातं. डोक्यात कोंडा होतो. केस कमजोर होतात आणि तुटतात. तसेच केस रुक्ष आणि कोरडे दिसतात. त्यामुळे केस धुण्यासाठी आधी गरम पाण्यावर फुली मारावी.

 केवळ पाणी गरम की गार हा मुद्दा केसांसाठी महत्त्वाचा नाही तर पाण्याची गुणवत्ता ही देखील महत्त्वाची बाब आहे. पाणी बोअरिंगचं असल्यास ते प्रकृतीनं जड होतं, कारण त्यात जास्त क्षार असतात. अशा क्षारपट पाण्यानं केसांचा पोत खराब होतो. केस रुक्ष होतात. अशा केसात गुंता होवून केस जास्त तुटतात.

Image: Google

थंड नको ? तर मग कोमट पाणी योग्य!

थंड पाणी केसांसाठी योग्यच असतं. मग कोणताही ऋतू असो. पण थंड पाणी सोसवत नसेल, थंड पाण्यानं आंघोळ करण्याची सवय नसेल तर मग कोमट पाणी केस धुण्यासाठी वापरावं असं जावेद हबीब म्हणतात. कोमट पाण्यानं आंघोळ करणं आणि केस धुणं फायदेशीर असतं. पण आंघोळ गरम पाण्यानं आणि केस गार पाण्यानं धुतल्यास त्याचा फायदा नाही तर तोटाच होतो. आंघोळ करताना पाण्याच्या तापमानात बदल केल्यास त्याचा तोटा आरोग्यास होतो. त्यामुळे थंड पाणी नको असेल तर कोमट पाण्यानं केस धुवावेत असं जावेद हबीब सांगतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स