काम करताना फार सुटेबल होत नाही, म्हणून अनेक जणी ऑफिसमध्ये साडी नेसून जाणं टाळतात. पण सणावाराचे दिवस आले की हमखास ऑफिसमध्ये साडी नेसून जाण्याचा मोह होतो. यात अजिबात काहीच गैर नाही. आपण काम करतो तिथेही जर सणासुदीला फेस्टीव्ह वातावरण राहिले, तर ते निश्चितच आनंददायी असते. त्यामुळे सणवार असले की ऑफिसला जाताना जरूर साडी नेसा. पण थोडी काळजी घेऊन.
कधी कधी साडी नेसल्यावर नटताना अनेक जणींना आपण ऑफिसला जाण्यासाठी तयार होत आहोत, याचे भानच राहत नाही. किंवा मग साडी नेसल्यावरही तिचा लूक फॉर्मल कसा ठेवावा, हे समजत नाही. मग सगळाच गोंधळ होतो. आपण केलेला खूप सारा मेकअप पाहून समोरच्याला समजतच नाही की आपण ऑफिसला जात आहोत की लग्नाला. म्हणूनच तर ऑफिससाठी साडी तुमच्या लूकला फाॅर्मल टच देणारे काही नियम नक्की पाळा.
photo credit- google
१. साडीची निवड योग्य असावी
मान्य आहे की तुम्ही सणावाराच्या निमित्ताने ऑफिसला साडी नेसणार आहात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही भडक रंगाच्या, मोठ्या काठपदराच्या साड्या नेसून ऑफिसला जावं. आपण सण साजरा करणार आहोत, पण तो ऑफिसमध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे ऑफिससाठी सिल्कची साडी नेसणार असाल, तर तिचा रंग अजिबातच गॉडी नसावा. सोबर रंगाच्या साड्या नेसा. तसेच खूप मोठा काठ असणाऱ्या साड्याही ऑफिसला अजिबात नेसू नका. शक्यतो ऑफिससाठी कॉटन, लिनन अशा फॉर्मल टच असणाऱ्या साड्या निवडाव्या.
photo credit- google
२. मोठ्या पाठीचे ब्लाऊज टाळा
ही गोष्टी प्रत्येकीने अगदी कटाक्षाने लक्षात ठेवावी. मोठ्या पाठीचे ब्लाऊज घालून ऑफिसला जाणे अजिबातच चांगले वाटत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये आपण विनाकारण गॉसिपचा विषय ठरू शकतो. ऑफिसचे ब्लाऊज अतिशय फॉर्मल असावेत. स्लिव्हलेस असतील तरी चालतील. पण पुन्हा स्लिव्हलेस ब्लाऊज म्हणजे खांद्यावर नुसतीच एक पट्टी दिसेल असे नको. स्लिव्हलेस ब्लाऊजही व्यवस्थित आणि बरोबर मापाचं असेल, असंच असावं. बंद गळ्याचे, स्टँण्ड कॉलर ब्लाऊज ऑफिसमध्ये छान दिसतात. पण तसे नसतील तर कमी गळ्याचे ब्लाऊज घाला.
३. ज्वेलरी टाळा
दागदागिणे घालून ऑफिसमध्ये जाणं टाळा. अर्थातच याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही कोणतेही दागिने न घालता ऑफिसला जावं. साडी नेसली म्हणजे हमखास दागिने आलेच. पण मग हातभर बांगड्या, कानात मोठे झुमके, मोठं, लांब आणि अगदीच डोळ्यात भरेल असं ठसठशीत गळ्यातलं असं काही करू नका. साडीवर मॅचिंग दागिने घाला आणि ते ही अगदीच सोबर, नाजूक असतील असे निवडा. मोठी प्लेन टिकली ऑफिसला छान वाटते. पण खूप जास्त खड्यांची टिकली लावून जाणं टाळा.
photo credit- google
४. नॉर्मल मेकअप करा
साडी नेसली की हमखास आपण नेहमीपेक्षा थोडा अधिक मेकअप करतो. ऑफिसला जाताना असं करणं टाळा. तुमचा मेकअप शक्य तेवढा नॉर्मल ठेवा. ऑफिसला डार्क, भडक लिपस्टिक लावणं टाळा. ब्लशर, आयशॅडो यांचा वापरही अगदीच हलका असावा. त्यामुळे तुमचा मेकअप अधिक फॉर्मल पण तेवढाच जबरदस्त कॅची दिसेल. तसेच भसाभस परफ्यूम मारणेही टाळा. हलका सुगंध दरवळत राहील, एवढाच परफ्यूम ऑफिसमध्ये गरजेचा असतो.
photo credit- google
५. हेअरस्टाईल कशी असावी
अंबाडा, त्यावर माळलेली फुलं अशी टिपिकल केशभुषा करून ऑफिसला कधीच जाऊ नका. तुमची नॉर्मल जी हेअरस्टाईल असते, तशीच साडीवर करा. साडी नेसली म्हणून खूप काहीतरी वेगळी वेशभुषा करणं टाळा. कारण आधीच साडी नेसल्यामुळे तुमचा लूक बदललेला असतो आणि त्यात हेअरस्टाईलही नेहमीपेक्षा वेगळी असेल, तर उगाच त्याची चर्चा होते. नॉर्मल क्लचर लावणं अशावेळी सगळ्यात उत्तम पर्याय आहे.