Join us

उन्हाळ्यात अचानक त्वचा ड्राय होते? तुमच्या 'या' सवयीच करत आहेत त्वचेचं कायमचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:01 IST

Dry skin problem in summer: महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही ऋतुमध्ये त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. अशात उन्हाळ्यात ड्राय त्वचा होण्याची काही कारणं जाणून घेऊ, जेणेकरून तुम्हाला योग्य ते उपचार करता येतील.

Dry skin problem in summer: सामान्यपणे हिवाळ्यात शुष्क वातावरण असतं, पण ही समस्या उन्हाळ्यातही होऊ शकते. ज्यामुळे त्वचा ड्राय होण्याची समस्या होते. पण त्वचा ड्राय होण्यामागे तुमच्या काही सवयी सुद्धा कारणीभूत असू शकतात. बरेच लोक हिवाळ्यात त्वचेची खूप जास्त काळजी घेतात, पण उन्हाळ्यात फार काही करत नाहीत. महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही ऋतुमध्ये त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. अशात उन्हाळ्यात ड्राय त्वचा होण्याची काही कारणं जाणून घेऊ, जेणेकरून तुम्हाला योग्य ते उपचार करता येतील.

पाणी कमी पिणं

स्कीन एक्सपर्ट सांगतात की, उन्हाळ्यात लोक भरपूर पाणी पिण्यावर लक्ष देत नाहीत. ज्यामुळे डिहायड्रेशन होतं. उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवं. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी केवळ पाणीच नाही तर तुम्ही लस्सी, ताक, ज्यूस किंवा नारळ पाणीही पिऊ शकता. या पेयांमुळे शरीरात पाणी संतुलित राहतं. शरीरात पाणी कमी झालं तर त्वचा ड्राय होते.

सतत घाम पुसणे

उन्हाळ्यात शरीरातून भरपूर घाम जातो. अशात लोक सतत रूमाल किंवा टिश्यू पेपरनं घाम पुसत राहतात. महिला चेहऱ्यावर घाम येऊ नये म्हणून फेस पावडर लावतात. यामुळे त्वचेवरील नॅचरल ऑइल नष्ट होतं, ज्यामुळे त्वचा ड्राय होते. त्याशिवाय पुन्हा पुन्हा पाण्यानं तोंड धुणं किंवा हात धुतल्यानंही त्वचा ड्राय होते. त्यामुळे दिवसातून केवळ एक किंवा दोन वेळाच आंघोळ करावी.

एसीमध्ये जास्त राहणं

तापमान वाढलं की, लोक घरांमध्ये एसी सुरू करतात. घरच काय तर ऑफिसमध्येही एसीशिवाय काम भागत नाही. सतत एसीमध्ये राहिल्यानं त्वचेमधील ओलावा नष्ट होतो आणि त्वचा ड्राय होते. त्यामुळे एसीमध्ये जास्त राहणं टाळलं पाहिजे.

मॉइस्चरायजर न लावणं

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात त्वचेवर मॉइस्चरायजर लावतात. पण उन्हाळ्यात याचा वापर कमी करतात. आंघोळ केल्यानंतर मॉइस्चरायजर लावणं गरजेचं असतं. त्यानंतर सनस्क्रीन लावणंही गरजेचं असतं. असं केलं नाही तर सूर्याच्या नुकसानकारक किरणांमुळे त्वचा कोरडी होते.

काय कराल उपाय?

ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी रात्री खोबऱ्याच्या तेलानं मालिश करा. यासाठी खोबऱ्याच्या तेलात मध मिक्स करून ड्राय त्वचेवर 20 मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर पाण्यानं धुवून घ्या. यानं त्वचेमधील ओलावा कायम राहील. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफडीचा गरही लावू शकता. यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स