Join us  

१० कारणांमुळे डोळ्यांखाली होतात काळी वर्तुळं; उपाय करण्यापूर्वी बघा नेमकं काय बिनसलं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 5:40 PM

डार्क सर्कलवर ( dark circle) केवळ उपाय करता, पण कारणं माहिती आहेत का? 10 कारणांमुळे डोळ्यांखाली होतात काळी वर्तुळं डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होण्यास एखादं विशिष्ट कारणच कारणीभूत असतं असं नाही तर अनेक कारणं डार्क सर्कलची समस्या ( causes of dark circles under eyes) निर्माण करतात. यातील बरीचशी कारणं ही जीवनशैली आणि सवयींशी निगडित असतात. ती समजून न घेता केवळ उपाय करत राहिल्यास कधीच अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही.

ठळक मुद्देआनुवांशिकतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण झाल्यास ती पूर्णपणे घालवणं अशक्य असतं, पण ती पुसट मात्र करता येतात. मेकअप करताना अति काॅस्मेटिक्स वापरणं, सनस्क्रीन टाळणं या चुकांमुळे काळी वर्तुळं येतात. पाणी कमी पिणं , आहारत मीठ जास्त असणं या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी डार्क सर्कलला कारणीभूत ठरतात. 

डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होणं (dark circles)  ही मोठी सौंदर्य समस्या आहे. ही का तयार होतात हे समजून न घेता त्यावर फक्त काॅस्मेटिक उपाय केले जातात. पण यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या सुटत नाही उलट ती आणखीनच तीव्र होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होण्यास एखादं विशिष्ट कारणच कारणीभूत असतं असं नाही तर अनेक कारणं (causes of dark circles under eyes)  डार्क सर्कलची समस्या  निर्माण करतात. यातील बरीचशी कारणं ही जीवनशैली आणि सवयींशी निगडित असतात. ती समजून न घेता केवळ उपाय करत राहिल्यास कधीच अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. 

Image: Google

डोळ्यांखाली काळी वर्तुळं का येतात?

1. अनेकांमध्ये डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्यामागे अनुवांशिकता हे कारण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीत काळी वर्तुळं पूर्णपणे घालवणं अवघड होतं. अनुवांशिकता हे कारण असल्यास ही काळी वर्तुळं थोडी पुसट करता येतात, पूर्ण घालवता मात्र येत नाही. 

2. टीव्ही, मोबाइल जास्त बघणं ही सवय डार्क सर्कलसाठी कारणीभूत ठरते. स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्यानं डोळ्यांवर ताण येतो. त्याचा परिणाम म्हणूनही डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. 

3. झोप पूर्ण न होणं, थकवा यामुळे काळी वर्तुळं येतात. साधारणत: 7-8 तासांची झोप आवश्यक असते. पण कामांची गर्दी, डिजीटल साधनं हाताळण्यात जाणारा वेळ यामुळे झोपेकडे दुर्लक्ष होतं. त्याचा परिणाम म्हणजे झोप पूर्ण होत नाही आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळ पडतात. 

4. मेकअपची अती हौसही सौंदर्यसमस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. अनेक काॅस्मेटिक्स असे असतात ज्यामुळे त्वचेला ॲलर्जी होते आणि नंतर त्यामुळे डार्क सर्कल्स पडतात. तसेच डोळ्यांना केलेला मेकअप चुकीच्या पध्दतीनं पुसणं हे डार्क सर्कल होण्यास कारणीभूत ठरतं.  रेटिनाॅलयुक्त ब्यूटी प्रोडक्टस ॲण्टि एजिंग असतात मात्र त्याचा अति वापर केल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात.  सनस्क्रीनमुळे चेहेऱ्याच्या त्वचेच सूर्याच्या अती नील किरणांपासून संरक्षण होतं. हेच सनस्कीन डोळ्यांखालील नाजूक त्वचेचं संरक्षण करण्यासाठीही महत्वाचं असतं. पण सनस्क्रीन वापरण्यास टाळाटाळ केल्यास डोळ्याखालील त्वचेचं संरक्षण होत नाही आणि काळी वर्तुळं पडतात. 

5. गरम पाण्यानं चेहेरा धुण्याची सवय त्वचेसाठी घातक असते. गरम पाण्यानं चेहेरा धुताना तेवढ्यापुरती छान वाटतं. पण त्यामुळे त्वचा खराब होते. त्वचेचा पोत बिघडतो.

Image: Google

6. आहारात मिठाचं प्रमाण जास्त असल्यास शरीरातील पेशी पाणी धरुन ठेवतात. यामुळे डोळ्याखालील त्वचा अधिकच पातळ होते आणि काळी पडते.

7. पाणी कमी प्रमाणत प्यायल्यास डिहायड्रेशन होतं. त्यामुळे पेशी संकुचित होतात, आकसात. डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडण्यास पाणी कमी पिणं कारणीभूत ठरतं. 

8. जास्त काळ उन्हात राहिल्यानं चेहेऱ्यावर काळे डाग पडतात आणि डोळ्यांखालची त्वचाही काळी पडते. 

9. धूम्रपानाची सवय असल्यास कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो, त्यामुळे त्वचा काळी पडते, खराब होते. त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेखालील रक्तप्रवाह बिघडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात. 

10. आजारपणामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात. आजारपणात नीट जेवण जात  नाही. त्यामुळे शरीरास पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम शरीर अशक्त होतं. चेहेरा काळवंडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होतात. 

टॅग्स :डोळ्यांखाली काळी वर्तुळंब्यूटी टिप्सत्वचेची काळजी